Home » Blog » Maharashtra Government : भाजप करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Government : भाजप करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; फडणवीसांनी घेतली शिंदेंची भेट

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Government

मुंबई : जमीर काझी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाच्या विधिमंडळ नेत्याची बुधवारी निवड होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांची सकाळी दहा वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये बैठक होणार आहे. त्याची मते आजमावून घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे निरीक्षक म्हणून मुंबईत दाखल झाले आहेत. नेता निवडीनंतर लगेचच शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून सत्ता स्थापन करण्यासाठी दावा दाखल करणार आहे. (Maharashtra Government)

शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. आझाद मैदानावर सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी भाजपाचे देशभरातील ज्येष्ठ नेते व अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आज महायुतीच्या नेत्यांनी मैदानाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही दहा दिवस उलटूनही अद्याप सरकार स्थापन करण्यात आलेली नाही एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याने सुरुवातीची काही दिवस त्यांची समजूत काढण्यात गेले त्यानंतर त्यांनी गृह व अन्य महत्त्वाच्या खात्याची मागणी केल्याने भाजपाचा त्याला विरोध आहे. शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत न थांबता दोन दिवस साताऱ्यात त्यांच्या दरे या जन्मगावी विश्रांतीसाठी गेले होते. त्या ठिकाणी तब्येत बिघडल्याने त्यांनी कोणत्याही बैठकीत सहभाग घेतलेला नव्हता. रविवारी ठाण्यात परतल्यानंतर घशाचा संसर्ग व ताप असल्याने ते घरीच थांबून होते. त्यानंतर मंगळवारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व चाचण्या करून घेतल्या. त्यामध्ये सर्व काही नॉर्मल असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच वाजता शपथविधी होणार असल्याने सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यावर बुधवारी विधानसभेचा नेता निवडल्यानंतर शिक्कामोर्तब होईल असे भाजपाच्या गोटातून सांगण्यात आले. त्यासाठी भाजपाचे सर्व नवनिर्वाचित आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी १९ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रीत केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह केंद्रातील पाच मंत्रीही सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. (Maharashtra Government)

‘या’ मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

योगी आदित्यनाथ : उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू : आंध्र प्रदेश
नितीश कुमार : बिहार
प्रेमा खांडू : अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा : आसाम
विष्णूदेव साय : छत्तीसगढ
प्रमोद सावंत : गोवा
भूपेंद्र पटेल : गुजरात
नायब सिंह सैनी : हरियाणा
मोहन यादव : मध्य प्रदेश
कॉनराड संगमा : मेघालय
भजनलाल शर्मा : राजस्थान
मानिक साहा : त्रिपुरा
पुष्कर सिंह धामी : उत्तराखंड

निमंत्रित संत महंत

नरेंद्र महाराज : नानीज
नामदेव शास्त्री : भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज
गौरांगदास महाराज : इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
महानुभाव संप्रदायाचे विद्ध्वंस बाबा आणि मोहन महाराज
जैन मुनी लोकेश.

‘एक है तो सेफ है’चे १० हजार टी शर्ट

विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘एक है तो सेफ हैं,’चा नारा दिला होता. आता महायुतीच्या शपथविधीतही ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा लिहिलेले दहा हजार टी-शर्ट भाजप कार्यकर्ते परिधान करणार आहेत. यावेळी मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00