महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बांगला देशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेडेन सिल्सने घरच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगला देशचा पहिला डाव १६४ धावांवर आटोपला. गोलंदाजीमध्ये जेडेन सिल्सने महत्वाची भूमिका बजावली. गोलंदाजीत त्याने १५.५ षटकात फक्त ५ धावा देत ४ बळी घेतले. यात त्याने १० षटके निर्धाव टाकली.
१९७८ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सिल्स पहिलाच गोलंदाज ठरला आहे. गोलंदाजी करताना त्याने ०.३ च्या सरासरीने गोलंदाजी केली. याआधी हा विक्रम भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या नावावर होता. २०१५ साली द.आफ्रिकाविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ०.४२ च्या सरासरीने गोलंदाजी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम भारताच्या बानू नाडकर्णी यांनी हा विक्रम केला होता. १९६४ मध्ये त्यांनी चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकूण ३२ षटकांमध्ये २७ षटके निर्धाव टाकली होती. यात त्यांनी फक्त पाच धावा दिल्या होत्या.
सामन्यात फलंदाजी करताना बांगला देशची सुरूवात खराब झाली. सलामीवीर महमुदुल हसन जॉय (३) मोमिनुल हक (०) दोघे १० धावांवर तंबूत परतले. यानंतर शादमान इस्लाम व शहादत होसिन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसाअंती शहादत होसिनने आपले अर्धशतक पुर्ण केले. बांगला देशने पहिल्या दिवशी २ बाद ६९ अशा धावा उभारल्या, पण दुसऱ्या दिवशी बांगल देशचा डाव घरंगळला. दुसऱ्या दिवशी अवघ्या ३ खेळाडूंनी दुहेरी धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव १६४ धावांवर गुंडाळला. यात जेडेन सिल्स (४), शामर जोसेफ (३), केमार रोच (२), अल्झारी जोसेफ (१) विकेट्स घेतल्या.