मुंबई; जमीर काझी : विक्रमी बहुमत मिळूनही गेल्या आठवड्याभरापासून रखडलेल्या महायुती सरकार -२ च्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार असून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारतील. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे स्पष्ट झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थित राहणार असून देशभरातील भाजपाचे वरिष्ठ नेते व अनेक राज्याचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ एक्स’ वर पोस्ट करून शपथविधी बाबतच्या कार्यक्रमाची माहिती दिली.
राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी तब्बल २३६ जागा जिंकून महायुती मोठ्या ताकतीने सत्तेवर आली आहे. मात्र, मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याने त्याबाबतची निवड व शपथविधी रेंगाळला होता. मात्र, सर्वाधिक १३२ जागा जिंकलेल्या भाजपा ने मुख्यमंत्री पद आपल्याकडेच ठेवण्याचे निश्चित केले असून शिंदे यांची समजूत काढण्यात यश मिळविले आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासह दोन्ही पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री व काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळ शपथविधी ५ डिसेंबरला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी सायंकाळी साताऱ्यातील दरे या गावातून परत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून मंत्रिमंडळाच्या फॉर्मुलाचा निश्चिती करणार आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. २३ नोव्हेंबर रोजी एकत्रित निकाल जाहीर झाले. २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत २३६जागा महायुतीच्या वाट्याला गेल्या. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले .परंतु, निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापनेकरता उशीर करण्यात आला. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदाकरता जोरदार रस्सीखेच अद्यापही सुरू आहे. त्यामुळे राज्यात नवं सरकार कधी स्थापन होणार असा प्रश्न सातत्याने विचारला गेला. दरम्यान, आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स पोस्ट करून शपथविधीबाबत महत्त्वाची माहिती दिली. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा सोहळा रंगणार असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही येणार आहेत.
मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू
राज्यात मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून अद्याप तिन्ही पक्षांमध्ये सहमती झालेली नाही. महायुती सरकारच्या रचनेबाबात अमित शहा यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी तीन तास बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच असतील, हे स्पष्ट करण्यात आले. पण काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी गृह खाते शिवसेनेकडे रहावे, यासाठी आग्रही राहिले. त्यामुळे मंत्रिमंडळ याचा फॉर्मुलाबाबत मुंबईत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र, शिंदे अचानकपणे आपल्या गावी निघून गेल्याने ही बैठक रखडली आहे. ते रविवारी परतल्यानंतर रात्री उशिरा किंवा सोमवारी ही बैठक घेऊन खाते वाटपाची निश्चिती केली जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.
फडणवीसांच्या नेते पदावर शिक्कामोर्तब करणार
माहितीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाने आपले विधिमंडळातील नेते यापूर्वी निवडले आहेत मात्र सर्वाधिक १३२ जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या विधिमंडळातील नेत्याची अद्याप निवड झालेली नाही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यावर सहमत दर्शविल्याने आता नवनिर्वाचित आमदारांची सोमवारी बैठक घेऊन नेता निवडला जाईल त्यामध्ये फडणवीस यांची एकमताने नियुक्ती जाहीर करण्यात येईल असे भाजपातील गोटाकडून सांगण्यात आले.