Home » Blog » ऑर्थोग्नॅथिक सर्जरी

ऑर्थोग्नॅथिक सर्जरी

ऑर्थोग्नॅथिक सर्जरी

by प्रतिनिधी
0 comments
Orthognathic surgery file photo

काही लोकांच्यात जबड्याची रचना ही चुकीची असते. यामुळे चेहऱ्याचा आकार बदलतो. चेहरा खराब दिसतो. याशिवाय घास चावण्यास, बोलण्यास यासह श्वसनास त्रास होऊ शकतो. अशावेळी जबड्याची शस्त्रक्रिया (ऑर्थोग्नॅथिक सर्जरी) हा एकमेव पर्याय असतो. शस्त्रक्रियेद्वारे पुढे किंवा मागे सरकलेला जबड्याची रचना ठीक केली जाते. या शस्त्रक्रियेमुळे व्यवस्थित जुळत नसलेले दातांची रचनाही योग्य होते. ऑर्थोग्नॅथिक सर्जरी काय आहे, ती कोणावर केली जाते, त्याचा फायदा काय या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करु

ऑर्थोग्नॅथिक सर्जरी म्हणजे काय?

ऑर्थोग्नॅथिक सर्जरी म्हणजे जबडा आणि चेहऱ्याच्या हाडांशी संबंधित एक विशेष शस्त्रक्रिया. काही लोकांच्या जबड्याची रचना वेडीवाकडी व चुकीची असते. यामुळे त्यांचा चेहरा फार पुढे अथवा फार मागे दिसतो. जबड्याची रचना चुकीची असल्याने चावण्यास किंवा बोलण्यास त्रास होतो. पुढे जाऊन श्वसनाच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. जबड्याची बिघडलेली रचना सुधारण्यासाठी ऑर्थोग्नॅथिक सर्जरी केली जाते.

 ऑर्थोग्नॅथिक सर्जरी कधी करावी लागते?

१. जबड्याची चुकीची रचना: जबडा पुढे किंवा मागे सरकलेला व चेहऱ्याचा बॅलन्स बिघडलेला असल्यास.

२. तोंडातील वरचे व खालचे दात व्यवस्थित जुळत नसल्याने चावण्यास अडचण निर्माण होत असल्यास, अन्न खाताना किंवा बोलताना त्रास होत असल्यास.

३. श्वसनाच्या समस्या : झोपेत श्वास अडकणे (स्लीपअप्निया), श्वसनात अडथळा जाणवत असल्यास.

४. जबड्याच्या दुखापती : अपघातामुळे जबड्याची ठेवणीत बदल झाल्यास, जबड्याच्या हाडांची वाढ योग्यरीत्या न झाल्यास.

५. दात व जबड्याचा समतोल नसणे : तोंड व्यवस्थित बंद न होणे. हसताना त्रास होणे वरच्या व खालच्या दातांमध्ये मोठा गॅप दिसत असल्यास.

६. चेहऱ्याचा लूक सुधारण्यासाठी : चेहरा सौंदर्यपूर्ण बनवण्यासाठी किंवा चेहऱ्याचा लुक बदलण्यासाठी देखील अशी शस्त्रक्रिया केली जाते.

ऑर्थोग्नॅथिक सर्जरीची प्रक्रिया

तपासणी आणि नियोजन: डॉक्टर तुमच्या जबड्याचा थ्री डी एक्स-रे, सीटी स्कॅन, आणि दातांचे मॉडेल बनवून समस्या तपासतात. जबडा कुठे हलवायचा आहे आणि कसा सुधारायचा, याविषयी बारीक नियोजन केले जाते.

ऑर्थोडॉन्टिक उपचार (ब्रेसेस लावणे):

सर्जरीपूर्वी किंवा नंतर, दात योग्य रचनेत आणण्यासाठी ब्रेसेस लावले जातात. यामुळे सर्जरीचा परिणाम अधिक चांगला होतो.

सर्जन जबड्याच्या हाडांना त्याच्या मुळ जागेवरुन हालवून योग्य ठिकाणी हलवतो. हाडांना एका जागेवर स्थिर ठेवण्यासाठी लहान प्लेट्स आणि स्क्रू चा वापर केला जातो. ही संपुर्ण प्रक्रिया सामान्यतः पूर्ण भूल देऊन केली जाते. सर्जरीनंतर रुग्णाला १ ते २ दिवस रुग्णालयात राहावे लागते. सर्जरीनंतर सुरुवातीचे काही दिवस फक्त द्रव आहार घ्यावा लागतो. हळूहळू मऊ अन्न घेऊ शकतो. या शस्त्रक्रियेनंतर नियमित फॉलो-अपला आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असते.

————–

सध्या अनेकांना जॉ लाईन अर्थात जबड्याच्या आकाराची क्रेझ आहे. हा जबड्याचा योग्य आकार आणण्यासाठी व लुक सुधारण्यासाठी देखील ही सर्जरी केली जाते. ही सर्जरी तज्ज्ञ ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन करतात. जे तोंड, जबडा, आणि चेहऱ्याच्या हाडांचे तज्ञ असतात. जर तुमच्या चेहऱ्याच्या किंवा जबड्याच्या हाडांमध्ये काही समस्या असतील, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करणे फायदेशीर ठरते.

-डॉ. अम्रिता शिंदे, एमडीएस, ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00