Home » Blog » स्वप्नाचा अर्थ

स्वप्नाचा अर्थ

स्वप्नाचा अर्थ

by प्रतिनिधी
0 comments
Dream interpretation file photo

-मुकेश माचकर

एका माणसाला आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ वाचायचा नाद होता. त्या सततच्या वाचनातून प्रत्येक साध्याशा गोष्टीतून गहन अर्थ काढण्याची सवय त्याला जडू लागली. त्याला तशीच स्वप्नंही पडू लागली. 

एका स्वप्नात तो एका जंगलात गेला. वाट चुकला. संध्याकाळ होत आली. त्याने एका झाडावर चढून बसून रात्र काढायची, असं ठरवलं. त्या झाडाखाली दोन दगडांच्या बेचक्यात एकही पाय नसलेला एक कोल्हा लोळागोळा स्थितीत पडलेला आढळला त्याला. 

त्याच्या मनात विचार आला, एकही पाय नसलेला हा कोल्हा जिवंत कसा राहिला असेल? तो झाडावर चढून बसला. रात्र झाली आणि तिथे चक्क तोंडात मांस घेऊन सिंह आला. त्याने ते मांस कोल्ह्यापाशी ठेवलं. 

धार्मिक माणूस जागा झाला. तो सद्गतित झाला होता. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर आपण कसलेही प्रयत्न करायची गरज नाही. स्वत:ला संपूर्णपणे परमेश्वराच्या हातात सोपवायचं. तोच आपली काळजी वाहतो, असा या स्वप्नाचा अर्थ काढून त्याने दुसऱ्या दिवसापासून हातपाय हलवणंच बंद केलं. सर्व प्रकारचा कामधंदा बंद करून तो ‘दे रे हरी खाटल्यावरी’ म्हणून स्वस्थ बसून राहिला. 

दोन आठवड्यांत तो पूर्णपणे खंगला. भुकेने व्याकूळ अवस्थेत ग्लानी आली आणि त्याला स्वप्न पडलं… त्यात साक्षात् परमेश्वरच समोर आला आणि म्हणाला, मी तुला एवढा दृष्टांत दिला, तरी तुझी ही अवस्था? 

धार्मिक माणूस म्हणाला, प्रभू, तुमच्या दृष्टांतामुळेच ही अवस्था झाली माझी. 

परमेश्वर कपाळावर हात मारून म्हणाला, स्टोरी बदलायला हवी बहुतेक आता या दृष्टांतस्वप्नाची. ते पाहणारा प्रत्येक अडाणी इसम या गोष्टीतल्या कोल्ह्याच्याच जागी जाऊन बसतो, मी सिंह बनायचा संदेश दिलाय, हे एकाही मूर्खाच्या लक्षात येत नाही.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00