-निळू दामले
माणसानं ८० वर्षं जगणं म्हणजे कायच्या कायच मोठी आणि आनंदाची गोष्ट होती त्या काळात. देवाभोवती सारं जग फिरत असे. देव रुसला तर खलास. देव खूश झाला तर चैन. पापं केली तर देव रुसतो, पुण्य केलं तर देव खूश होतो. पापं केली तर पुढला जन्म कुठल्या तरी बेकार प्राण्याचा. पुण्यं केली तर पुढला जन्म चांगल्या माणसाचा किंवा कदाचित थेट स्वर्गातच. देवाला खूश ठेवलं की काम साधतं असा हिशोब होता.
आपल्याकडं सहस्र चंद्र दर्शन नावाचा एक विधी म्हणा, सोहळा म्हणा, आहे. माणूस ऐंशी वर्ष जगतो म्हणजे तो एक हजार चंद्र पहातो.
हिंदू परंपरेनुसार सहस्र चंद्र दर्शन विधी केला की त्या माणसाला मरेपर्यंत बळ प्राप्त होतं, त्याच्यातला अहं कमी होतो. एवढंच नव्हे तर पुढला जन्म घेताना त्या व्यक्तीला आईच्या गर्भातच बळ प्राप्त होऊन पुढला जन्मही ती व्यक्ती बलवान होते.
आज भारतातल्या माणसाचं सरासरी जीवनमान ७२ वर्षाचं झालं आहे. माणसं ८० वर्ष अगदी सहजपणे जगतात. शंभर वर्षापूर्वी सरासरी जीवनमान ५० च्या आतच होतं. आजही महाराष्ट्रात हजारी २८ मुलं बालवयात मरण पावतात. आज आरोग्यव्यवस्था चांगली आहे, स्त्रीला तुलनेनं चांगलं खायला मिळतं, औषधं मिळतात तरीही इतके मृत्यू. कल्पना करा की शंभर वर्षांपूर्वी किंवा त्याही पूर्वी काय स्थिती असेल. घरोघरची वृद्ध माणसं सांगतात की त्यांच्या घरात त्यांच्या पाठची आणि पुढची किती भावंडं लहान वयात गेली.
मूल टिकलं तर मोठं होता होता त्याला नाना त्रासांचा सामना करावा लागत असे. सार्वजनिक आरोग्य वाईट. रोगांचा सुळसुळाट. आजच्यासारखी प्रभावी औषधं नव्हती. माणूस साठेक वर्षाचा होणं ही केवढी मोठी घटना. भारतात ( आणि जगातही ) जंतू मारण्याची सोय नव्हती. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं एवढीच एक गोष्ट त्या काळातलं आरोग्यशास्त्र करू शकत असे. सरासरी जगणं तीस पस्तीस वर्षाचं होतं. काही माणसं मात्र यावर मात करून शंभर वर्षंही जगत असावीत. परंतु तो नियम नव्हता, तो अपवादातला अपवाद होता.
माणसानं ८० वर्षं जगणं म्हणजे कायच्या कायच मोठी आणि आनंदाची गोष्ट होती त्या काळात. देवाभोवती सारं जग फिरत असे. देव रुसला तर खलास. देव खूश झाला तर चैन. पापं केली तर देव रुसतो, पुण्य केलं तर देव खूश होतो. पापं केली तर पुढला जन्म कुठल्या तरी बेकार प्राण्याचा. पुण्यं केली तर पुढला जन्म चांगल्या माणसाचा किंवा कदाचित थेट स्वर्गातच. देवाला खूश ठेवलं की काम साधतं असा हिशोब होता. पूजा, नैवेध्य, अर्घ्य, वस्तू-प्राणी-दारू अर्पण करणं इत्यादी गोष्टी माणसानं ठरवल्या. देवही खूप. कुटुंबाचा देव वेगळा. गावाचा देव वेगळा. कुळाचा देव वेगळा. रीजनल आणि राष्ट्रीय आणि वैश्विक देवही होते. नाना कामांसाठी वाहिलेले देवही होते. रक्षण करणारा, विद्या देणारा, पोरंबाळं देणारा, पाऊस पाडणारा, शत्रूचा नाश करणारा इत्यादी इत्यादी. थोडक्यात काय तर माणसाच्या जगण्याच्या प्रत्येक घटनेशी आणि क्षणाशी देव जोडलेले होते.
तर देवाला खूश ठेवण्यासाठी विधी. काळमानानुसार ते एलॅबरेट होत गेले. किती आणि कोणती धान्य. कोणत्या झाडाची पानं आणि फुलं. तूप कुठलं आणि दूध कुठलं. प्राणी बळी द्यायचा तर तो कुठला. बळी द्यायचा नसेल तर त्या जागी सबस्टिट्यूट काय. अग्नी कोणत्या प्रकारचा. विधीला किती ब्राह्मण. विधीचा होम केवढा मोठा, त्यात काय काय टाकायचं. तपशीलवार. आणि हे सारे विधी मंत्राच्या रुपात लिहून ठेवलेले. त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगणारा एक स्वतंत्र वेदही लिहून ठेवला. काळमानानुसार हे घडत गेलं. काळात जे जे ज्ञान प्राप्त झालं त्या नुसार माणसाचं जगणं आणि देव यातले संबंध ठरवले गेले.
एकोणिसाव्या शतकानंतर स्थिती बदलू लागली. विसाव्या शतकात तर ती अमूलाग्र बदलली. ज्ञान आणि माहितीतलं खरं काय आणि खोटं काय ते विज्ञानानं माणसाला शिकवलं. देव मानणाऱ्या माणसालाही कळू लागलं की माणसाच्या दीर्घ जगण्यात सभोवतालची ऐहिक व्यवस्था, औषधं, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांचा वाटा मोठा आहे. ज्या गोष्टीची संगती लागत नाही ती गोष्ट माणूस देवावार सोडतो. औषधानं, चांगल्या खाण्यानं माणूस बरा झाला की माणूस विज्ञान आणि जगणं यातला संबंध मान्य करतो. पण सगळी औषधं देऊनही एकादा माणूस न कळलेल्या कारणानं मरतो तेव्हां ते मरण त्याला कुठल्या तरी खुंटीवर टांगायचं असतं. देव ही खुंटी त्याला सापडते.
देव ही खुंटी. घरात असली तर बिघडतं कुठं ? वाटल्यास काही बाही टांगावं. खुंटी रिकामी राहिली तरी बिघडत नाही. एकविसाव्या शतकात बहुतांश लोकांना देव ही खुंटी न उलगडलेल्या गोष्टी टांगण्यासाठीच उरली आहे.
तर अशा या पार्श्वभूमीवर सहस्रचंद्र दर्शन. लोकांना सारं कळलंय. विधीच्या निमित्तानं माणसं जमतात. भेटतात. चांगलं खाता पितात. छान वाटतं. मंत्र कानाला बरे वाटतात. छान जेवण मिळतं. सजावट छान असते. शेकडो दिव्यांनी ओवाळतांना छान वाटतं. आपलं माणूस खूप जगतंय आणि जगणार आहे यात आनंद असतो. आपलं माणूस पुढं खूप आणि निरामय जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सोहळ्यात सामील होणारी माणसं ती इच्छा सूर, धूर, प्रकाश, चव, वस्त्रं इत्यादी गोष्टींमधून व्यक्त करतात.
थोडक्यात असं की सहस्रचंद्र दर्शन असो किंवा तत्सम विधी असोत ते देवाभोवती न रहाता सांस्कृतिक विधी होत आहेत, इव्हेंट होताहेत. पुरोहित हे त्या इव्हेंटमधले कलाकार असतात. काही दिवसांनी हे पुरोहीत एका विशिष्ट जातीतून न येता कुठल्याही जातीतले असतील. स्त्रिया पौरोहित्य करतील. पुरोहितांचे कपडेही बदलतील. पुरोहित जीन्स आणि टी शर्टमधे येतील. सोहळ्यासाठी जमा झालेली शेंड्या ठेवून, बुचडे बांधून, पूर्ण मुंडण करून येतील. मुंडण अभद्र नसेल, ती एक फॅशन असेल. फ्युजन संगीताप्रमाणं मंत्रही फ्यूजन मंत्र होतील. विधी व्हर्चुअल जगात होऊ लागतील.
मुख्य हेतू आनंद आणि सदिच्छा. नाना वाटांनी ते हेतू व्यक्त होऊ लागतील. काही वर्षानं त्यातही बदल होतील.
तर असं सहस्र चंद्र दर्शन. छान आहे की. गडे हो ८० वर्षं जगलात, आणखी वीस वर्षं जगा. विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप वेगानं पुढं चाललंय. येत्या शतकाच्या शेवटी माणूस दीडेकशे वर्षं जगणार आहे. तेव्हां दोन सहस्र दर्शन साजरं होईल.