-संजीव चांदोरकर
तरणतलावात पोहणारा तो स्पर्धक बक्षिसाची रक्कम ८० पट असते हे ऐकून तोंडाला पाणी सुटून, अटलांटिक महासागरातील पाण्यात पोहण्याच्या स्पर्धेत उतरला..
एक तरणतलाव होता. आहे देखील. चांगला मोठा. त्यात नेहमी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या स्पर्धा चालत. कधी कोणी हरत. कधी कोणी जिंकत.
तरण तलावात पाणी सोडणारा, पाण्याची पातळी कमी जास्त करणारा होता. स्पर्धांसाठी अंपायर होता. दोघे फार कार्यक्षम होते असे नव्हे. आळशीच होते. अधुनमधून चिरीमिरी घेत देखील असत. पण एकाच कोणा स्पर्धकाला सपोर्ट करणारे कोणीही नव्हते.
एक दिवस अचानक धूमकेतू सारखा एक स्पर्धक आला. त्याचे नाव फारसे माहित नव्हते. पण लै स्मार्ट निघाला.
त्याने पाणीवाल्याला पटवला, आणि पाणीवाला त्याच्या सोयीने पाणी सोडायचा, पाण्याची पातळी कमी जास्त करायचा.
त्याने अम्पायरला पटवला. अंपायरने स्पर्धेचे नियमच तोडून मोडून टाकले. अनेकांना स्पर्धेतून बाद केले. लहान मुलांसाठी जी उथळ जागा असते, त्याच जागेत पोहण्याच्या स्पर्धा भरवायला सुरुवात केली.
त्याने दर्शक गॅलऱ्या लावल्या आणि आपल्या चिअर लीडर्सची तेथे गर्दी राहील हे बघितले.
लहान मुलांसाठीच्या भागात, खाली पाय लावून लावून तो एका टोकाकडून दुसरीकडे वेगाने पोचू लागला. त्याने एका टोकाकडून सुरुवात केली न केली तर अंपायर त्याला विजेता घोषित करू लागला.
त्याला भरघोस बक्षिसे मिळू लागली. त्या रकमेतून तो पाणीवाला, अंपायर, चिअर लीडर्स, बाऊन्सर्स यांना देऊ लागला
हे सगळे अशा पद्धतीने होऊ लागले की तो नवीन धूमकेतू नेहमी जिंकून येऊ लागला. तो जिंकला की चिअर लीडर्स त्याच्या नावाचा जयजयकार करायचे.
हळूहळू त्या तरण तलावाचा तो अनभिषक्त सम्राट समजला जाऊ लागला. वाईट्ट म्हणजे तो स्वतःला तसे मानायला लागला; हे सर्वात वाईट्ट झाले.
त्याच्या चिअर लीडर्सपैकी काहींनी त्याला सांगितले की, या तरण तलावात काय पोहताय, खरे आव्हान समुद्रातील स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिंकायचे. तुम्ही जागतिक दर्जाचे जलतरणपटू आहात. तुम्ही समुद्रात पोहून दाखवा
अमेरिकेच्या अटलांटिकमध्ये खऱ्या जागतिक दर्जाच्या जलतरुण पटूंच्या स्पर्धा होतात. मुख्य म्हणजे इथे तुम्हाला बक्षिसाची जी रक्कम मिळते त्याच्या किमान ऐंशी पट रक्कम अटलांटिक स्पर्धेत मिळेल; त्यात भाग घ्या. तुम्ही जिंकणार हे नक्की. सारे जग तुम्हाला कुर्निसात करायला लागेल. आणि तो खरेच अटलांटिक समुद्रात पोचला देखील, तेथील स्पर्धेत उतरला.
त्याला वाटले दोन्हीकडे पाणीच तर आहे. आणि हात पाय मारायची आपल्या हातापायांना चांगली सवय आहे. माणसे इथून तिथून सारखी. प्रत्येक माणसाची एक किंमत असते. ती दिली की झाले.
पण समुद्राचे पाणी वेगळे असते. तरण तलावात येत नाहीत पण समुद्रात मोठ्या लाटा उठतात.
मुख्य म्हणजे अटलांटिक समुद्रातील स्पर्धेसाठी भाग घेतांना अर्हतेसाठी काही कडक नियम होते. किनाऱ्यावर टेहळणी टॉवर्स मध्ये शक्तिशाली दुर्बिणी घेऊन अंपायर प्रत्येक स्पर्धकांचे बारकाईने निरीक्षण करीत असतात. इतके पद्धतशीर की स्पर्धकाला माहित नसते.
आपल्या त्या धूमकेतू स्पर्धकाला वाटले आपल्या देशातील तरण तलावात जी चालूगिरी करतो तसेच काहीबाही करूया. त्याने आपल्या अर्हतेसाठी स्वतःच्या देशातून हवी तशी सर्टिफिकेट मिळवली. सबमिट केली आणि कपडे काढून पाण्यात उतरला देखील.
इथे अटलांटिक स्पर्धेतील अम्पायरनी नियमाप्रमाणे प्रत्येक स्पर्धकाची शहानिशा करायला सुरुवात केली आणि आपल्या धूमकेतूची चलाखी पकडली.
शिट्या वगैरे वाजवून त्याला पाण्यातून बाहेर यायला लावला आहे. आपला तो धूमकेतू लंगोटावर, पाण्याने निथळत किनाऱ्यावर आला आहे, ओलेता, अध नंगा तसाच उभा आहे, खरा आतून भांबावलाय. पण चेहऱ्यावर दाखवत नाहीये.
ताजा कलमः वरील काल्पनिक कथेचा संबंध न्यूयॉर्क टाइम्स मधील बातमीत दिलेल्या प्रमाणे अमेरिकन सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी आणि कंपनीला जारी केलेल्या आरोपपत्राशी जोडू नये