मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मतमोजणीत गडबड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी अधिकारी वर्ग गडबड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर पहारा द्यावा, असे ते म्हणाले. उद्या (ता. २३) संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत हे स्वतःच पक्षश्रेष्ठी असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचा टोला ठाकरे गटाला हाणला. पटोले म्हणाले, की निवडणूक आयोगाची यंत्रणाच चुकीची आहे. लोकसभा निवडणुकीतही मतदानाच्या टक्केवारीत मोठा गोंधळ झाला होता. निवडणूक आयोगाला तक्रार केली, तर त्यांनी आपणच बरोबर असल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळे तर सर्व उमेदवारांना फॉर्म नंबर १७ सी देणे बंधनकारक केले आहे. त्यांनी तो आमच्याकडे जमाही केला आहे. मतदान वाढीच्या प्रकियेत काही दोष आढळला, तर त्यास निवडणूक आयोग जबाबदार राहील.
प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटवर बोलणे योग्य नाही. निकाल काही तासांवर आला आहे. मी काल माहूरला देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याने कालच्या बैठकीला गेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पटोले म्हणाले, की काही ठिकाणी अधिकारीही गडबड करतील. रात्रभर आमचे लोक स्ट्रॉगरूमच्या बाहेर थांबतील. मतदान मोजणी केंद्रावर आमची टीम थांबणार आहे. आमचा कोणताही आमदार कुठेही जाणार नाही. आम्ही आमचे सर्व आमदार निकाल लागताच मुंबईत बोलावून घेणार असून सरकार स्थापनेसाठी दावा करणार आहोत. कारण सत्ता स्थापनेसाठी वेळ कमी आहे.
पटोले म्हणाले, की उद्या दुपारपर्यंत निकाल आले तर उद्याच सर्व आमदारांना बोलवून घेत त्यांच्या सह्यांचे पत्र घेऊन रात्रीच राज्यपालांकडे जाणार आहोत. कारण या सरकारचा २६ तारखेला शेवटचा दिवस आहे. महायुतीमध्ये गडबड सुरू आहे. ते काही पाप करू शकतात. भाजपचा काही अपक्षांना पाठिंबा असून शिंदे गटाच्या उमेदवाराला विरोध आहे. ते उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे.