विधानसभा निवडणुकीसाठी उच्चांकी मतदान केल्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! कोणत्याही निवडणुकीतील मतदान साठ टक्क्यांच्या आसपास घुटमळत असताना यावेळी मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात जे राजकारण झाले त्याचे परिणाम संपूर्ण राज्याला भोगावे लागले. विकावू लोकप्रतिनिधींचे राज्य म्हणून देशभर नव्हे, तर जगभरात महाराष्ट्राचा डंका वाजला. लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब पडले, परंतु विधानसभेला ते पडणार की लोक सगळे विसरून गेले, हेही पाहावे लागणार आहे. मतदान पार पडल्यामुळे मतदारांची भूमिका तूर्तास तरी संपली आहे. त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले, जबाबदारी पार पाडली. आता खरी कसोटी निवडून येणा-या लोकप्रतिनिधींची असेल. सत्ता असो किंवा विरोधात असो, ज्या पक्षाच्या नावावर निवडून दिले आहे त्याच पक्षात राहणार की वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न काही लोक करणार हेही पाहावे लागणार आहे. कारण मतदान कोणत्याही पक्षाला आणि उमेदवाराला दिले तरी तो उमेदवार त्याच पक्षात राहील याची खात्री नसल्याची महाराष्ट्रातील मतदारांची धारणा बनली आहे. मोठ्या फाटाफुटीनंतर आणि सगळीकडे छी थू झाल्यानंतर तरी लोकप्रतिनिधी सुधारणार आहेत किंवा नाही, हा खरा प्रश्न आहे. या सगळ्याची चर्चा मतदानानंतर आणि निकालाच्या आधी करण्याचे खरेतर काही कारण नव्हते. परंतु मतदान पूर्ण झाल्यानंतर विविध संस्थांचे जे एक्झिट पोलचे आकडे आले आहेत, ते सगळ्यांचाच संभ्रम वाढवणारे आहेत. एक्झिट पोलकडे पाहताना ते एक्झिट पोल आहेत, ते निकाल नाहीत, हे विसरून चालत नाही. परंतु अनेकदा एक्झिट पोलचे आकडे हाच निकाल असल्याचे समजून लोक व्यक्त होतात. ज्यांच्या पारड्यात हे निकाल असतात ते जणू आपल्याला कौल मिळाला आहे अशा भ्रमात बोलतात आणि ज्यांच्या विरोधात असेल ते लोक हा कसा बनावटगिरीचा धंदा आहे, असे बोलत असतात.
निवडणुकीसाठीचे मतदान झाल्यानंतर मतमोजणीपर्यंत दोन दिवसांपासून आठ-दहा दिवसांपर्यंतचा अवधी असतो. निकालाची उत्सुकता असतेच, परंतु ते काय असू शकतील हे जाणून घेण्याची उत्कंठा असते आणि ती उत्कंठा एक्झिट पोल पूर्ण करतात. मतदान संपल्यापासून मतमोजणीपर्यंतचा कालावधी रिकामा असतो. रिकामे डोके सैतानाचे घर असते असे म्हणतात, तशीच काहीशी अवस्था असते. रिकाम्या वेळेत डोक्याला काही खाद्य किंवा हाताला काही काम नसेल तर लोक भ्रमिष्ट होतील. अगदी लहान मुलांनासुद्धा रिकाम्या वेळेत हाती काहीतरी असावे लागते. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या खेळण्यांची व्यवस्था असते. त्यात ती रमून जातात. इथे आधीचा एक-दीड महिना पूर्णपणे निवडणुकीच्या वातावरणात घालवल्यानंतर जेव्हा सगळे संपते तेव्हा करायचे काय असा प्रश्न असतो. अशा काळातले खेळणे एवढाच एक्झिट पोलचा अर्थ असतो. एक्झिट पोलचा आणखी एक उपयोग असतो, तो म्हणजे काठावरचे बहुमत असणा-यांना पुढच्या जोडण्या लावणे. तशी वेळ आलीच तर छोट्या पक्षांचे किंवा अपक्ष कोण निवडून येऊ शकतात त्यांच्याशी संधान बांधण्याचे काम करता येते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे संमिश्र स्वरुपाचे आहेत, मात्र बहुतांश संस्थांच्या पोलमधून महायुतीचे सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. त्याअर्थाने महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंना कमीअधिक प्रमाणात समाधान देणारे हे कौल आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीतील एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकले होते. छत्तीसगड, हरियाणा विधानसभा असेल किंवा अलीकडची लोकसभा निवडणूक. अंदाज सपशेल चुकल्यामुळे नामांकित संस्थांनी यावेळी एक्झिट पोलपासून स्वतःला दूर ठेवले. वारंवार अंदाज चुकले तरी पुन्हा पुन्हा तेच करायचे, याची लाज वाटल्यामुळे हे घडले असावे. तरीसुद्धा अनेक संस्थांनी ते धाडस केले आणि आपले अंदाज सादर केले आहेत. ते इतके भिन्न स्वरुपाचे आहेत की कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सोयीचा एक्झिट पोल कुठला आहे, त्यावर विश्वास ठेवण्याची मुभा प्रत्येकाला मिळाली आहे. जो जे वाछिल तो ते लाहो… असेच एकूण एक्झिट पोलचे आकडे आहेत. मतमोजणीपर्यंत मतदारांच्या हातातले खेळणे यापलीकडे त्याला फारसा अर्थ नाही.