Home » Blog » एकविसावे शतक विरुद्ध मध्ययुगीन मानसिकता

एकविसावे शतक विरुद्ध मध्ययुगीन मानसिकता

एकविसावे शतक विरुद्ध मध्ययुगीन मानसिकता

by प्रतिनिधी
0 comments
mentality file photo

-आनंद शितोळे

साधारण सहा हजार वर्षांपूर्वी लाकडाच्या घरंगळत जाणाऱ्या ओंडक्यांपासून चाकाचा शोध मानवाला लागला.

युद्धात वापरली जाणारी तोफ १००० वर्षे जुनी, बंदूक-पिस्तुल ५०० वर्ष वयाचं, कागदावर छपाई करण्याचं तंत्रज्ञान ५०० वर्षापूर्वीचं.

सुरुवातीला असणारा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग काय होता ? एक एक सुधारणा होता होता शतकं जायची , काही पिढ्या जायच्या न मग बदल घडायचे.

१९०३ साली राईट बंधुंचं विमान आलं आणि आज आवाजाच्या वेगाला मागे टाकूनही जमाना झालाय, आपण थेट चंद्र आणि मंगळ मोहिमांवर निघालोय.

१९२० साली टीव्ही आला आणि १९२८ साली पहिलं टीव्ही स्टेशन सुरु झालं. हा भारतात आला १९५९ साली आणि आज भारतातल्या कुठल्याही घराची टीव्ही शिवाय आपण कल्पनाही करू शकत नाही.

टेलिफोन आला १८७६ ला आणि आज १४० वर्षांनी टेलिफोन मोडीत निघायच्या तयारीत आहे, तीच अवस्था टेलिग्रामची आधीच झालीय.

१९७३ साली जन्माला आलेल्या मोबाइल फोनची प्रगती डोळे दिपवणारी आहे. ४० वर्षांत आज माणसं श्वास घेणं विसरतील पण मोबाइल फोन नाही.

१९८३ साली इंटरनेट आलं आणि आज सगळ्या जगाच्या, आर्थिक व्यवहारांच्या नाड्या इंटरनेटवर आहेत.

१९९८ साली जन्मलेलं गुगल फक्त २५ वर्षाचं आहे आणि फेसबुक फक्त १९ वर्षाचं.

ही सगळी आकडेवारी देण्याचं कारण गेल्या १०० वर्षांपैकी पहिल्या ५० वर्षात जी तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात प्रगती झाली तिचा वेग अतिप्रचंड होता, पण मागच्या पन्नास वर्षातली प्रगती आणि वेग मात्र भोवंडून टाकणारा आहे.

ह्या तंत्रज्ञानात आलेल्या प्रचंड वेगानं जीवन सुखकर झालंय. आरोग्य, शिक्षण, दळणवळण कुठलंही क्षेत्र बघा.

सगळ्यात कळीचा मुद्दा असा आहे की ज्या प्रमाणात हा बदलाचा वेग आहे, त्या प्रमाणात माणसांची, मानवी मेंदूची, आपल्या आकलनाची प्रगती झालीय का ?

आपण या भोवंडून टाकणाऱ्या वेगानं कुठंतरी नको त्या ठिकाणी वाहवत जाणार तर नाहीत ना ?

कारण भवताली दिसणाऱ्या, घडणाऱ्या गोष्टी नेमक तेच आपल्यासमोर आणताहेत.

वेगवेगळ्या सुविधा, आयुष्य सुखकर करणाऱ्या गोष्टी जितक्या सहजतेनं हातात आल्यात तेवढी माणसांची माणुसकी, मानवी मूल्यं कुठंतरी हरवत चाललीत.

एकीकडे हि भौतिक प्रगती म्हणावी तर दुसरीकडं संकुचित राष्ट्रवाद, धर्मवाद, मूलतत्त्ववादी आणि परंपरागत विचारांना मोठ्या प्रमाणावर अनुयायी मिळताहेत.

जातीच्या अभिमानावरून आपल्याच लेकरांना, भावंडांना मारून टाकणारी माणसं तरी कशी म्हणावीत ?

स्त्रिया अगदी देशाच्या राष्ट्राध्यक्ष होत असताना, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं काम करत असताना दुसरीकडं अल्पवयीन बालिका, स्त्रिया आणि वयस्कर स्त्रियांवर होणारे अत्याचार ह्याची सांगड कुठेच बसत नाही.

धर्मवादी नेते, पुढारी ह्यांची वक्तव्यं असूद्यात की समाजावर बंधन लादणाऱ्या प्रवृत्ती असूद्यात ,त्यांची मानसिकता आणि त्यासमोर मान तुकवणारं समाजमन ह्याची सांगड कुठेच बसत नाही.

मग प्रश्न असा पडतो की हा बदलाचा, तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीचा वेग समजून त्याच्याबरोबर चालण्याला आपलं समाजमन, आपला मेंदू विकसितच झालेला नाही का ?

कारण तंत्रज्ञान २१ व्या शतकातलं आणि माणसांची मानसिकता मात्र मध्ययुगीन असली की मग प्रचंड मोठा घोळ आहे.

नवनव्या बदलाने, तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीने ज्याला समाजाचा विकास आपण म्हणतो जिथे सर्वांगीण प्रगती अपेक्षित असते. जिथं कला, साहित्य, नाट्य, शिक्षण, आरोग्य अशा सगळ्या थरात समाजाची प्रगती अपेक्षित असते. तिची शक्यताच अशा अडनिड समाजात उरत नाही.

ज्यांनी समाजाला हे आकलन द्यावं आणि समाजाला आपल्या जाणिवा नेणिवा ह्या बदलाला सुसंगत बदलाव्यात अशी राजकीय नेते मंडळी किंवा समाजधुरीण ह्याबद्दल जे भयानक मौन धरून बसले आहेत ते अतिशय कानठळ्या बसवणारं आहे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00