Home » Blog » प्रेषित आणि धर्मगुरू

प्रेषित आणि धर्मगुरू

प्रेषित आणि धर्मगुरू

by प्रतिनिधी
0 comments
file photo

-मुकेश माचकर

काही हजार वर्षांपूर्वी समाजाने प्रेषिताचा अंत घडवून आणला होता…

तलवारीने वार केले होते, गोळ्या घातल्या होत्या की सुळावर चढवलं होतं की विष प्यायला लावलं होतं की आणखी काही, हे फजूल आहे… अंत घडवून आणला होता, हे महत्त्वाचं.

प्रेषिताच्या मृत्यूनंतर त्याच्या बंडखोरीचे सगळे काटे छाटून टाकून, सगळे अंगार विझवून, त्याची एक गोंडस, परमेश्वरी आभाधारी प्रतिमा बनवून त्याची पूजा सुरू झाली. मंदिरं उभी राहिली. पुजारी तयार झाले. प्रेषिताने अतिशय साध्या, सोप्या, थेट भाषेत सांगितलेल्या गोष्टी अवघड करून, त्यातून गहन अर्थ काढून सांगणाऱ्या पोथ्या आल्या, प्रवचनकार आले, विचारवंत तयार झाले. भाविकाला गिऱ्हाईक बनवणारी एक महाकाय यंत्रणा तयार झाली, अर्थव्यवस्था उभी राहिली.

काही हजार वर्षांनी प्रेषिताला पुन्हा अवतरण्याची दुर्बुद्धी झाली. तो त्याच्या जुन्याच वेषात अवतरला, तेव्हा हलकल्लोळ माजला. येता जाता सगळ्यालाच नमस्कार करण्याची सवय जडलेल्या भाविकांनी त्यालाही नमन केलं, काहींना तो नाटक-सिनेमातला कलावंत वाटला, काहींना सोंगाड्या. साक्षात प्रेषितासारखा वेश परिधान करून या माणसाने प्रेषिताची, धर्माची, मानवजातीची, विश्वाची घोर विटंबना केली आहे, असा ओरडाही झाला. प्रेषिताला फरपटत धर्मगुरूंसमोरर आणण्यात आलं. त्यांनीही त्याची निर्भर्त्सना केली आणि या पापाचरणाबद्दल प्रभूच्या पायावर त्याला लोटण्यासाठी ते गर्भगृहात घेऊन गेले त्याला.

तिथे गेल्यावर दरवाजे बंद झाले आणि धर्मगुरूंनी गुडघ्यावर बसून प्रेषिताला वंदन केलं आणि म्हणाले, प्रभू, आम्ही तुम्हाला ओळखलं. तुम्ही तेच आहात, याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. पण, आता तुमच्या अवताराची गरज उरलेली नाही, आम्ही आहोत सगळं सांभाळायला. खूप कष्टांनी आम्ही ही सगळी घडी बसवलेली आहे, ती तुमच्या नुसत्या येण्यानेच उचकटून जाईल. तुमचा मूळ स्वभाव घड्या विस्कटण्याचा आहे, बंडखोरीचा आहे, पाखंडाविरुद्ध लढण्याचा आहे, तो आम्हाला परवडणार नाही. आम्ही तेव्हा जसे होतो, तसेच आजही आहोत. तुम्हाला तेव्हा मिळाली, त्यापेक्षा वेगळी वागणूक आज मिळणार नाही. क्षमा करा, पण, काही हजार वर्षांपूर्वी जे घडलं, त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असं वाटत असेल, तर आपण जिथून आलात तिथे स्वेच्छेने परत जावं, हेच श्रेयस्कर आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00