Home » Blog » दिल्ली विद्यापीठाच्या हरिणी श्रीलंकेच्या पंतप्रधान

दिल्ली विद्यापीठाच्या हरिणी श्रीलंकेच्या पंतप्रधान

तिसऱ्यांदा महिलेकडे पंतप्रधानपद; शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे काम

by प्रतिनिधी
0 comments
Harini Amarasuriya file photo

कोलंबो;  वृत्तसंस्था : श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून हरिणी अमरसूर्या यांची नियुक्ती केवळ श्रीलंकेतच नाही, तर भारतात आणि जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. ५४ वर्षीय हरिणी या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत आणि त्यांनी या पदापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणादायी प्रवास केला आहे. आपल्या शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिणी अमरसूर्या यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण दिल्ली विद्यापीठातून घेतले. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेतील शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

अमरसूर्या यांचा शैक्षणिक प्रवास श्रीलंकेपासून भारतापर्यंतचा आहे. १९८८-८९ मध्ये श्रीलंकेत तमिळ आंदोलनादरम्यान परिस्थिती इतकी हिंसक झाली, की शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली. अशा परिस्थितीत हरिणी यांनी उच्च शिक्षणासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९० मध्ये प्रतिष्ठित हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला आणि समाजशास्त्र (१९९१-१९९४) मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. अमरसूर्या यांना भारतीय समाजातील विविध पैलू आणि विचारधारा समोर आल्या. त्यांनी नंतर त्यांचा राजकीय दृष्टिकोन आणि नेतृत्व घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते इम्तियाज अली आणि प्रसिद्ध पत्रकार अर्णव गोस्वामी हे देखील त्यांच्यासोबत अभ्यास करत होते. हिंदू कॉलेजच्या प्राचार्या अंजू श्रीवास्तव यांनी आपल्या माजी विद्यार्थिनीबद्दल अभिमान व्यक्त करताना सांगितले, की हरिणी पंतप्रधान होणे ही आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. तिचा संघर्ष आणि यश आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.

दिल्ली विद्यापीठातून बॅचलर पदवी पूर्ण केल्यानंतर हरिणी यांनी स्कॉटलंडच्या एडिनबर्ग विद्यापीठातून सामाजिक मानवता या विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी श्रीलंका विद्यापीठात समाजशास्त्र आणि मानवता विषयांवर संशोधन केले आणि शिकवले. श्रीलंकेत प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी सामाजिक समस्यांचे सखोल ज्ञान विकसित केले आणि अनेक संशोधन कार्ये केली. त्यांच्या अभ्यासाने आणि संशोधनाने त्यांना एक प्रभावी विद्वान म्हणून स्थापित केले. हरिणी यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात सामाजिक कार्यात सक्रियता दाखवली. त्या अनेक वर्षांपासून आरोग्य-संबंधित स्वयंसेवी संस्थेशी संबंधित होत्या. त्यांनी त्सुनामीमुळे प्रभावित झालेल्या मुलांना मदत केली. या कामातून त्यांची माणुसकी आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलता दिसून येते. या वेळी त्यांनी मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर काम केले.

हरिणी अमरसूर्या यांनी २०१९ मध्ये श्रीलंकेच्या मुख्य राजकीय पक्ष ‘जनता विमुक्ती पेरामुनुवा’ (डेव्हीपी) मध्ये सामील होऊन राजकारणात प्रवेश केला. शिक्षण आणि सामाजिक कार्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या देशाच्या राजकारणात प्रभावी स्थान निर्माण केल्यामुळे त्यांच्यासाठी हे एक नवे वळण होते. २०२० मध्ये त्या श्रीलंकेच्या संसदेत निवडून आल्या. त्यांच्या या निर्णयामुळे सप्टेंबर २०२४ मध्ये हरिणी यांना श्रीलंकेच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले. हे पद भूषवणाऱ्या त्या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आणि हे त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि बुद्धिमत्तेचे परिणाम आहे.

भारताशी संबंध सुधारणार

हरिणी पंतप्रधान झाल्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंधांना नवे वळण मिळू शकते आणि दोन्ही देशांमधील व्यापार, संस्कृती आणि राजकारणातील सहकार्याला चालना मिळू शकते. त्यांच्या पंतप्रधानपदी निवडीने श्रीलंकेच्या अंतर्गत घडामोडी सुधारण्याच्या आशा तर वाढल्याच; पण भारत आणि श्रीलंकेच्या संबंधांना नवा आयामही मिळाला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00