Home » Blog » विनोद तावडे, राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल

विनोद तावडे, राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल

भाजपाचे विनोद तावडे लाखोंच्या रोकडीसह रंगेहाथ सापडले

by प्रतिनिधी
0 comments
Vinod Tawde file photo

मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील हॉटेल विवांतामध्ये लाखोंच्या रोकडीसह सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलला घेराव घालून, तर सुमारे चार तास तावडे व नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांना कोंडून ठेवत हॉटेलला घेराव घातला. त्यांच्याजवळील बॅगेतून कोट्यवधीची रोकड मिळाली आहे. पैशाचा हिशेब असलेली डायरी सापडली आहे. या प्रकरणाने संतप्त झालेल्या बविआ कार्यकर्ते व भाजपाचे समर्थक यांच्यात जोरात राडेबाजी झाली. तुळीज पोलिसांनी याबाबत तावडे आणि भाजपा उमेदवार नाईक यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तावडे हे पाच कोटी रुपये घेऊन वाटण्यासाठी आले होते, अशी माहिती आपल्याला भाजपाच्या एका नेत्याकडून मिळाली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेत त्यांना पकडले असल्याचा आरोप बविआचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला.

तावडेंच्या ‘विरार कॅश’ प्रकरणाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा व महायुतीवर कडाडून टीका केली आहे. सोशल मीडियावरून त्याबाबत व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सर्वस्तरांतून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. राजकीय नेत्यांनी मतदानाच्या ४८ तासांपूर्वी मतदारसंघ सोडणे अपेक्षित असते, मात्र तरीही विनोद तावडे मतदारसंघात काय करीत होते, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

नालासोपारा मतदारसंघात ‘बविआ’चे आमदार क्षितीज ठाकूर आणि भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांच्यात लढत होत आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये पोहोचले. त्यावेळी तेथे भाजपाचे महासचिव विनोद तावडे, नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक आणि अन्य पदाधिकारी बसले होते. बविआच्या समर्थकाने हॉटेलमध्ये शिरून त्यांच्या बॅगा तपासल्या. त्यामध्ये लिफाफ्यामध्ये रोकड होती. तसेच त्यांच्याकडील बॅगेतील डायऱ्याही ताब्यात घेतल्या. त्यामध्ये व्यक्तींची नावे आणि आकडे असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला.

दोन हजार कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेराव घालत हे पैसे कुठून आले, अशी विचारणा केली. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी घोषणाबाजीही सुरू केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हॉटेलबाहेर सुमारे २ हजारावर कार्यकर्त्यांचा जमाव होता. भाजपा आणि तावडेंविरोधात जमावाने जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे तावडे यांना बाहेर पडणे अशक्य  होते. ते तेथेच बसून राहिले. आमदार क्षितीज ठाकूर त्यांना डायरी दाखवत त्याबाबत जाब विचारू लागले. यावेळी हॉटेलमध्ये पैसे घेण्यासाठी काही महिलाही आल्या होत्या. त्या वरच्या मजल्यावर थांबून राहिल्या.

नऊ लाखांची रोकड सापडली

कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक आयोगाचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी हॉटेलची झडती सुरू केली. त्यामध्ये ४०९ क्रमांकाच्या रूममध्ये नऊ लाख ९३ हजार रुपयांची रोकड सापडली. कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या सर्व खोल्यांची तपासणी करून पंचनामा करण्याची मागणी केली. थोड्या वेळात ‘बविआ’चे प्रमुख हितेंद्र ठाकूरही हॉटेलमध्ये पोहोचले. तावडे यांच्यासमवेत त्यांनी घडलेला प्रकार पत्रकारांना सांगितला. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात तावडे हे ठाकूर यांच्या गाडीत बसून निघून गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा दिल्या.

भाजपच्या नेत्याकडून टीप : हितेंद्र ठाकूर

हॉटेल विवांता येथे विनोद तावडे हे पाच कोटी रुपये घेऊन आले असल्याची माहिती मला भाजपाच्या एका नेत्यानेच दिली होती. कार्यकर्त्यांच्या गराड्यात सापडल्यानंतर विनोद तावडे यांनी मला २५ वेळा फोन करून माझी चूक झाली, मला सोडवा, अशी विनंती केली होती. मात्र मी याबाबत निवडणूक आयोग आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी यासाठी ठाम आहे, असे ‘बविआ’चे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, ‘विनोद तावडे यांनी रात्रीतून अनेक कार्यकर्त्यांना पैसे वाटले. त्यानंतर उरलेल्या कार्यकर्त्यांना पैसे वाटण्यासाठी आज विवांतामध्ये बैठक घेण्यात आली होती. त्यांच्याजवळ सापडलेल्या डायरीमध्ये कुणाला किती रक्कम दिली याची आकडेवारी देण्यात आली आहे. तसेच हॉटेलमध्ये पैसे घेण्यासाठी काही महिला आल्या होत्या, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये घेतलेले व्हिडिओ दाखवले. त्यामध्ये काळ्या रंगाची बॅगही दिसून येत आहे. याशिवाय एक डायरीही दिसते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी आलो होतो : तावडे

दरम्यान, मतदानादिवशी कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम करावे, हे सांगण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी येथे आलो होतो, मात्र मी पैसे वाटण्यासाठी आलो असल्याचा क्षितीज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा समज झाला. निवडणूक आयोगाने हॉटेलमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि योग्य ती कारवाई करावी, असे विनोद तावडे या प्रकरणावर म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00