Home » Blog » पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप

पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप

पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप

by प्रतिनिधी
0 comments
modern tribe

-संजय सोनवणी

राष्ट्रे ही समान भाषा, इतिहास, परंपरा, धर्म, भौगोलिक आस्था, अन्यजनांशी शत्रुत्वाची वा परकेपणाची भावना, राजकीय समान संकल्पना इत्यादींचा समुच्चय आहे असे वरकरणी पाहता दिसेल. या बाबी टोळीवादातून वेगळ्या काढता येत नाहीत. असे असले तरी भारतासारख्या राष्ट्राला “राष्ट्र” या संकल्पनेत टोळीवादाला काही प्रमाणात का होईना बगल द्यावी लागते.

राष्ट्रवाद हा पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप आहे काय हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पुरातन टोळीवाद हा समान उद्दिष्टे, वंश आणि भाषेच्या आधारावर उभारलेला होता. म्हणजे प्रत्येक टोळी स्वतंत्र वंश असे नाही तर समवंशीयांच्याही अनेक टोळ्या बनत असत. समान भाषिक गटांच्याही वेगवेगळ्या टोळ्या असत. मग त्या वेगळ्या का होत? तर उद्दिष्टांतील भिन्नता व टोळीनायकांची सत्ताकांक्षा यामुळे एका टोळीतून अनेक टोळ्या बाहेर फुटून निघालेल्या आपल्याला दिसतात. ऋग्वेदाचाच दाखला घेतला तर किमान ४८ टोळ्या नोंदल्या गेलेल्या दिसतात. या टोळ्या समानभाषिक-समान वंशीय व समान प्रदेश वाटून घेणा-या असल्या तरी त्यांच्यातील वेगळेपण हे त्यांच्या उद्दिष्टांत पहावे लागते. 

यात राजकीय उद्दिष्टे जशी सामील आहेत तशीच धार्मिक उद्दिष्टेही सामाविष्ट आहेत. ऋग्वेदाची रचना झाली ती मूळच्या भरत टोळीतून फुटून निघालेल्या तुत्सू नामक टोळीमध्ये. भरत टोळी त्याही पूर्वी पुरु टोळीचा भाग होती. पण तुत्सुंनी सुदासाच्या नेतृत्वाखाली खुद्द पुरू संघाशी युद्ध करुन त्यांना पराजित केले असा ऋग्वैदिक इतिहास सांगतो. या युद्धाचे तत्कालीन कारण धार्मिक स्वरुपाचे होते. (सुदास-शत्रू वैदिक यज्ञधर्मास मानत नव्हते.) असो. यावरून दिसणारी बाब ही की, नवी टोळी बनणे हे आधीच्या टोळीतील राजकीय/धार्मिक महत्वाकांक्षी व्यक्तींच्या भिन्न उद्दिष्टांमुळे होते. शत्रुत्व जपायला समान भाषा अथवा वंश आडवे येत नाहीत हा पुरातन इतिहास आहे.

म्हणजे उद्दिष्टांनी टोळ्यांना अलग अस्तित्व दिले असे म्हणता येईल. राष्ट्रांना हाच टोळीवाद लागू पडेल काय यावर विचार करायला हवा.

राष्ट्रे ही समान भाषा, इतिहास, परंपरा, धर्म, भौगोलिक आस्था, अन्यजनांशी शत्रुत्वाची वा परकेपणाची भावना, राजकीय समान संकल्पना इत्यादींचा समुच्चय आहे असे वरकरणी पाहता दिसेल. या बाबी टोळीवादातून वेगळ्या काढता येत नाहीत. असे असले तरी भारतासारख्या राष्ट्राला “राष्ट्र” या संकल्पनेत टोळीवादाला काही प्रमाणात का होईना बगल द्यावी लागते. कारण समान भाषा नाही. समान इतिहास नाही. (जो आहे तो उलट परस्परसंघर्षांचा इतिहास आहे.) समान परंपरा अथवा समान धर्म नाही. संस्कृतीबाबतही तसेच गोंधळ आहेत. म्हणजे सर्वजण पाळतात ती संस्कृती वैदिक कि अवैदिक यावर गेले दीड शतक तरी गंभीर विवाद आहेत. भौगोलिक आस्था ही प्रत्यक्षात स्थानिक पातळीपुरती मर्यादित आहे. मग हे कोणते राष्ट्र आहे?

 वास्तव पाहिले तर लक्षात येईल की हे “राजकीय” राष्ट्र आहे. म्हणजे लोकशाहीप्रणित केंद्रवर्ती सत्ता व तिचे उतरत्या क्रमाने सत्ता विभाजन व कायद्यांची संरचना हा त्याचा पाया असून इतर सारे मुद्दे दुय्यम आहेत. प्रत्यक्षात दुय्यम मुद्देच समाजजीवनावर व्यापक प्रभाव टाकत आहेत हे भारतीय परिप्रेक्षात लक्षात येईल. भारतीय राष्ट्रवाद हा तुलनेने सौम्य असण्याची हीसुद्धा कारणे आहेत. पण आपण हाच प्रकार जगभरच्या सर्व राष्ट्रांत कमी-अधिक प्रमाणात, बदलत्या अग्रक्रमांनुसार पाहू शकतो. उदा. चिनी राष्ट्रवाद परंपारिक चिनी तत्त्वज्ञाने, अमेरिकेचा प्रागतिकतावाद, मार्क्सवाद, माओवाद, वंशवाद आणि परंपरेने साम्राज्यकाळापासून चालत आलेला विस्तारवाद यावर आधारीत आहे. तो इतका बहुविध आणि म्हणूनच गोंधळयुक्त आहे की ल्युसियन पायसारख्या विश्लेषिका “राष्ट्र म्हणून चिनी व्यक्तीमत्वात ठोसपणाचा अभाव आहे.” असे म्हणतात. राष्ट्रवादी म्हनूण जर्मन लोक कितीही कडवे मानले गेले तरी या राष्ट्रवादाचा जन्म खूप अलीकडचा, म्हणजे नेपोलियन च्या युद्द्धोत्तर काळातील आहे. नाझी काळानंतर जर्मनीचे विभाजन झाल्यानंतर “राष्ट्रवाद” हा विषयच लोकांच्या दृष्टीने नकारात्मक बनला. शीतयुद्धाच्या काळात काही प्रमाणात सौम्य राष्ट्रवाद पुन्हा उभा राहिला आणि जर्मनी एकत्रही झाला. द्वितीय महायुद्धपूर्व काळात जर्मन राष्ट्रवाद हा जवळपास काल्पनिक “आर्यन वंश” या संकल्पनेवर उभा करण्यात हिटलरला यश मिळाले. पण त्या यशामागे ढासळलेली अर्थव्यवस्थाही कारण होती. हा राष्ट्रवाद टिकला नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा राष्ट्रवाद पाहिला तर वेगळीच तत्त्वे सामोरी येतात. अर्थात १९१४ पूर्वी वांशिक भेद हा अमेरिकन राष्ट्रवादातील एक प्रभावी घटक होता. मुस्लिम राष्ट्रवादही प्रत्येक मुस्लिम राष्ट्रात वेगळ्या पद्धतीने राबवला गेला आहे. म्हणजे राष्ट्रे खूप आहेत पण प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रवाद इतके वेगवेगळे रंग घेऊन आहे की, शेवटी राष्ट्र ही संकल्पनाच अव्याख्येय बनून जावी. प्रत्येक राष्ट्र हे राजकीय दृष्ट्या स्वतंत्र रहावे, पर-आक्रमणाचा प्रतिकार करायला सज्ज रहावे, सीमा या संरक्षित तर राहाव्यातच, पण जमल्यास त्या विस्तारता याव्यात, देशांतर्गत नागरिकांना विकासाच्या व्यापक संध्या मिळव्यात व आर्थिक विकास दर वृद्धिंगत रहावा, कायद्याचे राज्य असावे इत्यादी अपेक्षा प्रत्येक नागरिकाच्या (राष्ट्र कोणतेही असो) आपापल्या राष्ट्राकडून असतात असे आपल्याला दिसते. 

राष्ट्रवाद केवळ एवढ्याच ऐहिक बाबींपुरता मर्यादित राहत नसून तो धर्म, संस्कृती, भाषा, वंशवाद व आपल्या राष्ट्राची महत्ता इत्यादी अदृश्य पातळीवर वावरणा-या बाबींवर अधिक अवलंबून राहतो. प्रत्यक्षात राष्ट्रांची सार्वभौमता ही आधुनिक काळात गौण बनत चालली आहे. जगातील सर्व राष्ट्रे विरुद्ध एकच राष्ट्र असा वेडेपणा हिटलरनेही केला नाही. याचे महत्त्वाचे कारण केवळ सामरिक आहे असे नसून सर्वच बाबतीतील परस्परावलंबितता कधी नव्हे एवढी आधुनिक काळात वाढली आहे. संपर्काची साधने जशी विकसित होत आहेत, तसतशी जागतिक सांस्कृतिक सरमिसळीचा वेगही अत्यंत वेगाने वाढला आहे. राष्ट्रा-राष्ट्रांत संघर्ष असला तरी नागरिक मात्र त्या-त्या राष्ट्रांतील संस्कृतीतील तत्त्वांवर (अगदी वस्तुंवरही) बहिष्कार घालतात असे चित्र मात्र आता पुसट होऊ लागले आहे व पुढे ते कदाचित राहणारही नाही. 

टोळीवाद ही पुरातन काळातील एक अपरिहार्य मानवी निकड होती. त्यातून गणराज्ये, नगरराज्ये, राज्ये, साम्राज्ये ते राष्ट्रे अशी मजल गेल्या पाच हजार वर्षातील ज्ञात इतिहासाने मारली आहे. सत्तेचे उपजत भान ही मानवी प्रेरणा कालातीत राहिली आहे हेही आपण पाहतो. राजकीय गुलाम्यांविरुद्धचे स्वातंत्र्यलढे आजही जगात कोठे ना कोठे सुरु आहेतच. कोठे ते हिंसक आहेत तर कोठे अहिंसक…पण संघर्ष आहेत हे तर वास्तव आहे. यामुळे वैश्विक व्यवस्था सतत दोलायमान राहत अनिश्चिततेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत राहते आहे. राष्ट्रवाद, त्याची कोणतीही राजकीय व्यवस्था असो, प्रिय वाटला तरी त्याच्या प्रिय वाटण्यामागे सुरक्षिततेची आदिम भावना आहे हे तथ्य नाकारता येत नाही. भूमीवर मालकीची भावनाच नाही या काळापासून माणसाने भूमी, जल, आकाशावर मालकीहक्क प्रस्थापित करण्याची मजल गाठलेलीच आहे. प्रत्येक राष्ट्र त्यातील आपापला हिस्सा अधिकारवाणीने, युद्धखोर कृतीने अथवा करारान्वये मिळवायच्या प्रयत्नात आहे. जगातील सर्वच नागरिक आपापल्या अस्तित्व व भवितव्याच्या प्रश्नाने भेडसावलेलेच आहेत. कधी युद्ध होईल अथवा कधी अचानक दहशतवादी हल्ला होईल हे कोणत्याही राष्ट्रातील नागरिक सांगू शकत नाही. कोठे तणाव अधिक आहे तर कोठे कमी. पण तणाव आहेत हे वास्तव आहे. यात राष्ट्राचेच स्वातंत्र्य अबाधित नाही तर मग माणसाच्या समग्र स्वातंत्र्याचे काय होणार?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00