Home » Blog » प्रजेची सहनशक्ती

प्रजेची सहनशक्ती

प्रजेची सहनशक्ती

by प्रतिनिधी
0 comments
King file photo

-मुकेश माचकर

बादशहाने वजीराला विचारलं, राज्यकर्त्याची सगळ्यात मोठी ताकद कशात असते?

वजीर म्हणाला, प्रजेच्या सहनशक्तीत… आणि चतुर राज्यकर्ता ती नेहमीच मधूनमधून तपासून पाहात असतो हुजूर.

बादशहा म्हणाला, नेहमीप्रमाणे मला तुझं उत्तर पटलेलं नाही.

वजीर म्हणाला, हुजूर, जे आपल्याला कळत नाही, ते आपल्याला पटलेलं नाही, असं म्हणणं सोपं असतं आणि त्यातून फुकाचा आबही शिल्लक राहतो. तुम्हाला कार्यानुभवातूनच समजवावं लागेल. मी सांगतो तसा एक फतवा काढा.

बादशहाने अतिशय शंकाकुल मनाने तो फतवा काढला. राजधानीच्या मधोमध एक नदी होती. तिच्यावर एकच पूल होता. तो राज्यातला सगळ्यात महत्त्वाचा पूल होता. जवळपास सगळ्या प्रजाजनांना त्याचा वापर करावा लागत होता. त्या पुलाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला दोन अशर्फींचा कर द्यावा लागेल, असा तो फतवा होता. असा फतवा निघाला, तर प्रजेत प्रचंड असंतोष निर्माण होईल, अशी राजाला भीती वाटत होती. पण, तसं काही झालं नाही. लोक निमूटपणे कर भरू लागले.

बादशहा चकित झाला. वजीराला म्हणाला, तुझा मुद्दा खरा ठरतोय बहुतेक.

वजीर म्हणाला, हुजूर, खेळ आत्ता कुठे सुरू झालाय. आता हा कर दहापट करा. उद्यापासून २० अशर्फी द्यायला सांगा प्रत्येकाला.

बादशहा म्हणाला, तू माझं सिंहासन उलथायला निघालायस की काय?

वजीर गालातल्या गालात हसला.

कर दसपट झाला. लोकांनी खळखळ करत का होईना, तो भरायला सुरुवात केली. अत्यावश्यक काम असेल, तेव्हाच लोक पुलाचा वापर करायला लागले. नदीतल्या नावाड्यांना बरकत आली.

काही दिवसांनी हा कर चाळीस अशर्फींवर गेला. तरीही लोक रांगा लावून कर भरत होते. त्यानंतर वजिराने बादशहाला भयंकर भासणारा हुकूम काढायला लावला… पूल वापरणाऱ्याला चाळीस अशर्फींचा कर द्यावा लागेल, शिवाय जोड्याचे दहा फटके खावे लागतील, असा तो हुकूम होता.

तो अंमलात येऊन एक दिवस होतो ना होतो, तोच राजवाड्यासमोर प्रजाजनांची प्रचंड गर्दी गोळा झाली. बादशहा सचिंत मनाने बसला होता.

वजीर आला. बादशहा म्हणाला, हे तू काय करून ठेवलंयस? पाहतोस ना, बाहेर सगळ्या राज्यातली प्रजा गोळा झालीये. कर भरा आणि वर दहा जोडे खा, हे कोणती प्रजा सहन करील?

वजीर म्हणाला, हुजूर, ते काय म्हणतायत ते न ऐकताच तुम्ही मला बोल का लावताय? मी त्यांची मागणी आत्ताच ऐकून आलोय आणि ती पूर्ण करण्याचं आश्वासनही देऊन आलोय.

बादशहा थरथरत म्हणाला, काय होती ती मागणी?वजीर हसून म्हणाला, हुजूर, त्यांची फक्त इतकीच तक्रार होती की पुलावर दोन्ही बाजूला एकेकच कर्मचारी आहे. तोच कर घेतो, तोच जोडे मारतो. त्यात खूप वेळ जातो. मोठ्या रांगेत खूप वेळ थांबावं लागतं. जोडे मारण्यासाठी दोन्ही टोकांना वेगळा कर्मचारी नेमला, तर आमचा खोळंबा होणार नाही.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00