वृत्तसंस्था : बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. नुकताच दुसऱ्यांदा पिता झालेला रोहित काही दिवस कुटुंबासोबत भारतातच थांबणार असल्याचे त्याने निवड समितीस कळवले आहे. पाच कसोटींच्या या मालिकेतील उर्वरित चार कसोटींमध्ये खेळण्यास आपण उपलब्ध असून पहिल्या कसोटीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर इलेव्हन या संघांदरम्यान ३० नोव्हेंबरपासून अडलेड येथे रंगणाऱ्या दोनदिवसीय दिवस-रात्र सराव सामन्यातही आपण खेळणार असल्याचे रोहितने कळवले आहे. अडलेड येथे ६ डिसेंबरपासून या मालिकेतील दुसरी कसोटी सुरू होत आहे. दरम्यान, रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल, असे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
रोहितने फेरविचार करावा : गांगुली
रोहित शर्माने पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळायला हवे, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे. ‘रोहितने याबाबत फेरविचार करावा. संघाला नेतृत्वाची गरज आहे. तो पिता होणार असल्यामुळे संघासोबत ऑस्ट्रेलियाला न जाता मागे थांबला होता. तो आता पिता बनला असून आता तो ऑस्ट्रेलियासाठी निघू शकतो. मी त्याच्याजागी असतो, तर पर्थ कसोटीत खेळलो असतो,’ असे गांगुली म्हणाला. या कसोटीला आता सात दिवसही उरलेले नाहीत. भारताच्या दृष्टीने ही महत्त्वाची कसोटी मालिका असून रोहितचे वय पाहता तो या मालिकेद्वारे अखेरच्या वेळी ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. तो खूप चांगला कर्णधार आहे. मालिकेच्या सुरुवातीस भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाची गरज आहे, अशी पुस्तीही गांगुली यांनी जोडली.