Home » Blog » गिल पहिल्या कसोटीस मुकणार

गिल पहिल्या कसोटीस मुकणार

गिल पहिल्या कसोटीस मुकणार

by प्रतिनिधी
0 comments
Shubman Gill file photo

पर्थ, वृत्तसंस्था : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल हा भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यास मुकणार आहे. शनिवारी सरावादरम्यान गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली होती. या अंगठ्यास फ्रॅक्चर असल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले असून गिलला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान १५ दिवसांची विश्रांती आवश्यक आहे. (Shubman Gill)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. याच मैदानावर संघांतर्गत सराव सामना खेळत असताना क्षेत्ररक्षणादरम्यान गिलच्या अंगठ्यास दुखापत झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप गिलच्या दुखापतीबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. पर्थनंतर मालिकेतील दुसरा सामना अडलेड येथे ६ डिसेंबरपासून सुरू होणार असून, या सामन्यापूर्वी दुखापतीतून सावरण्याचे आव्हान गिलसमोर आहे. दरम्यान, गिलच्या अनुपस्थितीत तिसऱ्या स्थानावरील फलंदाजाची तजवीज भारतीय संघाला करावी लागेल. अगोदरच भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळण्याबाबत अनिश्चितता असल्याने यशस्वी जैस्वालसोबत सलामीला कोण जाणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. रोहित न खेळल्यास लोकेश राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन सलामीवीराची जबाबदारी पार पाडेल, असे भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, भारत अ संघातर्फे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेला फलंदाज देवदत्त पडिक्कल यालाही ऑस्ट्रेलियातच थांबण्याच्या सूचना भारतीय संघ व्यवस्थापनातर्फे देण्यात आली आहे.

राहुलकडून पुन्हा सरावास सुरुवात

कोपराला चेंडू लागल्याने शुक्रवारी सरावसत्र अर्ध्यातून सोडून गेलेला भारताचा फलंदाज लोकेश राहुल रविवारी सरावास परतला. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले असून, भारतीय संघ व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाचा चेंडू कोपरावर आदळून राहुलला दुखापत झाली होती. संघांतर्गत सराव सामन्यादरम्यान रविवारी राहुलने फलंदाजी केली. रोहित पहिल्या सामन्यात खेळण्याबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच गिलला दुखापत झाल्यामुळे राहुलचा अंतिम अकराच्या संघामधील प्रवेश निश्चित समजला जात आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00