Home » Blog » राजा, प्रजा आणि योद्धा

राजा, प्रजा आणि योद्धा

राजा, प्रजा आणि योद्धा

by प्रतिनिधी
0 comments
King file photo

-मुकेश माचकर

एका ग्रीक राजाची त्याच्याच एका महापराक्रमी योद्ध्यावर खप्पामर्जी झाली. 

सम्राटाने नेहमीप्रमाणे सगळ्या नगरवासीयांना मनोरंजनासाठी ॲरेनामध्ये पाचारण केलं. गोलाकार ॲरेनामध्ये सर्व बाजूंना चेकाळलेले प्रेक्षक चित्कारत असताना या योद्ध्याला साखळदंड बांधलेल्या अवस्थेत ॲरेनाच्या मध्यभागी भिरकावून देण्यात आलं आणि चहूबाजूंनी दारू पाजून मत्त केलेले हत्ती त्याच्यावर सोडण्यात आले. 

ते महाकाय हत्ती त्याचा चेंदामेंदा करणार इतक्यात त्या चपळ योद्ध्याने अदमास घेऊन क्षणार्धात दोन हत्तींच्या मधून झेप घेतली आणि साखळदंडासकट स्वत:ला गुंडाळत गुंडाळत तो हत्तींच्या हल्ल्यातून सुटला. प्रेक्षागृहातून चित्कार उमटले. राजाच्या कपाळावर आठी उमटली. आता योद्धा साखळदंडांमधून मुक्त करण्यात आला होता. चहूबाजूंनी भुकेलेले सिंह त्याच्यावर सोडण्यात आले. पण, योद्धा बलदंड होता. जगण्याच्या प्रबळ ऊर्मीने त्याच्यात प्रचंड ताकद निर्माण केली होती. त्याने एकेका सिंहाला दोन्ही कानांनी धरून मांजरांसारखं भिरकावून दिलं. चार सिंहांची ही अवस्था झाल्यावर बाकीचे शेपूट घालून पळून गेले.

प्रेक्षागृहात आता हर्षोत्फुल्ल हलकल्लोळ माजला होता. राजाच्या कपाळावर दुसरी आठी आली. आता योद्ध्याला जमिनीत मानेपर्यंत पुरलं होतं. राज्यातले पाच सर्वश्रेष्ठ तलवारबाज त्याच्याभोवती उभे होते. ते सपासप वार करत होते आणि तो फक्त मान इकडेतिकडे वळवून, वाकवून त्या वारांपासून बचाव करत होता. 

प्रेक्षागृह आता उसळून, दारं तोडून ॲरेनामध्ये प्रवेश करायचंच राहिलं होतं…

तेवढ्यात राजा उठून उभा राहिला… त्याबरोबर सगळे बसले… वार करणाऱ्यांचे हात थबकले… राजाने सगळ्या प्रेक्षागृहावर संथपणे एक थंडगार नजर फिरवली… टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता निर्माण झाली… राजाने आपल्याला अंतर्बाहय निरखून पाहिलं आहे, असं प्रेक्षागृहातल्या प्रत्येकाला वाटलं… 

राजा खाली बसला… वार करणाऱ्यांच्या तलवारी सपासप चालू लागल्या… योद्धा जिवाच्या कराराने ते वार चुकवू लागला… प्रेक्षागृहातली पाळीव प्रजा ओरडू लागली, डोकं हलवण्याची चलाखी करणाऱ्या बदमाष, बेईमान, नामर्द इसमा, हिंमत असेल, खऱ्या आईचं दूध प्यायला असशील, तर डोकं स्थिर ठेवून लढून दाखव मर्दासारखा.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00