-सुरेश खोपडे
जगातील गुलामांना आत्मसन्मानाचे नैतिक मूल्य नसते. स्वतः जिवंत राहणे व पुढील पिढ्या जिवंत राहाव्यात यासाठी तरतूद करणे म्हणजे अस्तित्व टिकविणे हीच महत्त्वाची प्रेरणा असते. म्हणून ते फक्त आपला फायदा काय होईल हेच पाहत असतात. आपल्याला या दोन्ही आघाड्यांकडून आलेल्या रेवडीच्या निमंत्रणावरून हेच दिसून येते. सामान्य माणूस काय आणि कोट्यवधी मालमत्ता मिळवलेले पण गद्दार झालेले राजकीय नेते काय… त्यांची मानसिकता एकच असते आणि म्हणून अनेक सुधारणावादी नेते गुलामांना आपल्या गुलामीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत होते.
महायुती व महाविकास आघाडी यांचे निवडणूक जाहीरनामे हे रेवडी बनविण्याचे घाऊक कारखाने का व कसे काय बनले? निवडणुकीतील जाहीरनामे फारसे कुणी वाचत नाही व त्यावर कोणाचा भरोसा ही नसतो. तरीपण त्यातून त्या पक्षाचा व मतदारांचा दृष्टिकोन समजून येतो. महायुतीतर्फे २५ लाख रोजगार निर्माण करणार, दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्या वेतन देणार, जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित करणार असे आश्वासन दिले. महाविकास आघाडी कृषी धोरण नव्याने आखणार, पाच महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार. यासारख्या काही मोजक्या योजना सोडल्यास बाकी सर्व रेवडीप्रमाणे फुकट देण्याच्या योजना आहेत. गरजू लोकांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे याबद्दल दुमत नसावे. पण या अशा तुटपुंज्या मदतीने आपले दारिद्र्य कमी होणार नाही हे माहीत असूनही मतदार रेवडीला का भुलतात व राजकारणी पारधी अशा रेवडीचे जाळे का फेकतात ?
रेवड्यांना फसलेल्या मतदारांना चार दोन वाईट शब्द बोलून त्यांचे नैतिक अधःपतन झाले असा सोपा निष्कर्ष काढून आपण आपले समाधान करून घेतो पण त्याचे कारण वरवरचे नाही. त्याचे उत्तर मानव उत्क्रांतीमध्ये शोधावे लागेल असे ‘ फ्रेडरिक नीच्या ‘ नावाचा अभ्यासक सांगतो. चिंपांझी माकडा पासून साऊथ आफ्रिकेत उत्क्रांत झालेला आदिमानव हा टोळ्या टोळ्यांनी जगभर पसरला. भारताप्रमाणे तो जपान, चीन या जवळच्या देशातही गेला. चीनमध्ये माओच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली व तेथील अभिजन वर्गाचे उच्चाटन करण्यात आले. जपानमध्ये देखील ‘माजी क्रांती‘ घडवून आणली गेली. तेथील सामुराई जमातीने आपला उच्चत्वाचा दर्जा सोडून दिला. समानता आणली गेली. त्यानंतर चीन, जपान हे महासत्ता बनले. भारतामध्ये सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी आर्य ब्राह्मण भारतात आले त्यांनी स्थानिक अनार्यांना जिंकून आपले गुलाम बनविले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. आम्हा गुलामांनी देशात आधुनिकता, विज्ञानवाद आणणाऱ्या ब्रिटिशांना येथून हाकलून लावले पण परंपरागत प्रतिगामी विचाराच्या ब्राह्मणांच्या वर्चस्वाला हात लावला नाही. राज्यघटना आली तरी आम्ही सगळेजण गुलामगिरीमध्ये जगत आहोत. कसे ते मी अनेक वेळा लिहिलेले आहे.
जपान चीन त्यांच्या तुलनेत भारत कोठे आहे? जागतिक हंगर इंडेक्स मध्ये १२७ देशांमध्ये भारताचा नंबर १०५वा लागतो. बांगलादेश, नेपाळ यापेक्षा वाईट. जागतिक हॅपिनेस इंडेक्स म्हणजे सुखी समाधानी जगणे यामध्ये १४३ देशात भारताचा क्रमांक १२३वा आहे. पाक, बांगला देश या पेक्षा वाईट. देशाचा जीडीपी दरडोई उत्पन्न, सुरक्षिततेची भावना, आयुर्मान व आरोग्य, भ्रष्टाचार,जगण्याचे स्वातंत्र्य, एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती इत्यादी घटकावर अवलंबून असतो. ते घटक सुधारण्यासाठी कोणतीही उपाययोजना या दोन्ही जाहीरनाम्यामध्ये नाही. मानवी क्षमतेवर काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांनी हे दाखवून दिलेले आहे की, प्रत्येक माणसांमध्ये एक सुपरमॅन असतो त्याला जागृत केले पाहिजे व ते काम फक्त सत्ताधारी नेते सुसंगत व्यवस्था निर्माण करून बदलू शकतात. इथं मात्र या जाहीरनाम्याद्वारे मूठ मूठ रेवड्या फेकून प्रत्येक जण एक सामान्य दर्जाचा गुलाम प्रवृत्तीचा, ऐतखाऊ (lazy, mediocre) माणूस बनविण्याचे काम चालू आहे.
जगातील प्रत्येक संस्कृतीमधील मालक व गुलाम गुलाम यांची नैतिक मूल्ये व जगण्याचा हेतू एक सारखा नसतो. मालक हा मालक असतो आणि तो स्वतःची नैतिक मूल्ये आपल्या गरजेनुसार निर्माण करतो, वापरतो व बदलतोदेखील. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस हे मालक जमातीचे नेते आहेत. त्यांचे राजकीय, धार्मिक व कौटुंबिक आयुष्य हे कोणत्याही गुलाम जमातीच्या नेत्यापेक्षा वेगळे असते. देवेंद्र फडणवीस यांचे प्रथम प्राधान्य हे मालक जमात म्हणून येनकेन प्रकारे आपले वर्ण श्रेष्ठत्व कायम राखणे हे असते.
काहीं अपवाद वगळता प्रत्येक ब्राह्मण हा भाजपपुरस्कृत उमेदवारालाच मत देतो. गुलाम जमातीच्या मतदाराची नैतिक निष्ठा तेवढी प्रखर नसते. आर्थिक प्रलोभन किंवा रेवडी या पेक्षा उच्च जातींना आपले श्रेष्ठत्व कायम राखणे हे नैतिक मूल्य महत्त्वाचे वाटते, तर गुलामांना उपयुक्तता म्हणजे फायदा काय या दृष्टीने कोणत्याही घटनेकडे व्यवहाराकडे पाहण्याची प्रेरणा त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते. त्यामुळे फुकट प्रवास, फुकट धान्य, लाडकी बहीण म्हणून मिळणारे पैसे याकडे पाहून लोक बदलतात. तर शाहू, फुले, आंबेडकर,यशवंतराव चव्हाण यांचा जप करणारे अजित दादा, महात्मा फुले यांच्या नावावर राजकारण करणारे छगनराव भुजबळ, ज्यांच्या धर्माचा प्रचंड तिरस्कार केला जातो ते हसन मुश्रीफ हे सगळे फडणवीस यांच्या पालखीचे भोई बनले. त्यात कोणतीच नैतिकता नाही. आहे ती उपयुक्तता, व्यक्तिगत फायदा.
प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये या मालक जमातीने गुलामांना या अश्या मुठभर रेवड्यावर नामोहरम केलेले आहे.
खूप पूर्वी वाचलेली एक बोध कथा आठवली. जुलमी मालक वृत्तीच्या राजाविरुद्ध गुलामांनी उठाव केला. क्रांती घडवून राजाला पदच्युत करून त्याला जेरबंद करण्याचा निर्धार केला. गुलामांचा मोर्चा त्वेषाने राजवाड्याकडे निघाला. राजाच्या सैन्याने मोठे रणगाडे जमावाच्या दिशेने उभे केले. तोफगोळे जमावावर डागले जातील असे वातावरण दिसत होते. तरीपण जमाव डगमगला नाही. मुर्दाबाद मुर्दाबाद म्हणत तो आगेकूच करत राहिला. मग तोफा धडाडल्या. कानठळ्या बसवणारे आवाज आले. आणि काय आश्चर्य ?तोफगोळ्यांच्याऐवजी त्या तोफा मधून नोटा आणि नाण्यांचा वर्षाव सुरू झाला! गुलामांचा जमाव गोंधळला. काय करावे ते सुचेना. राजवाड्याकडे चला राजवाड्याकडे चला असे त्यांचा नेता सांगत होता. पण लोक काय करत होते? ते आसपास पडलेली नाणी आणि नोटा जमा करण्यामध्ये गर्क राहिले. राजवाड्याकडे जायचे विसरले. जमेल तेवढा पैसा जमा करून ते आपल्या घराकडे परतले. ही बोध कथा असावी, पण त्यात मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य दिसून येते. जगातील गुलामांना आत्मसन्मानाचे नैतिक मूल्य नसते. स्वतः जिवंत राहणे व पुढील पिढ्या जिवंत राहाव्यात यासाठी तरतूद करणे म्हणजे अस्तित्व टिकविणे हीच महत्त्वाची प्रेरणा असते. म्हणून ते फक्त आपला फायदा काय होईल हेच पाहत असतात. आपल्याला या दोन्ही आघाड्यांकडून आलेल्या रेवडीच्या निमंत्रणावरून हेच दिसून येते. सामान्य माणूस काय आणि कोट्यवधी मालमत्ता मिळवलेले पण गद्दार झालेले राजकीय नेते काय.. त्यांची मानसिकता एकच असते आणि म्हणून अनेक सुधारणावादी नेते गुलामांना आपल्या गुलामीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत होते. आज ते सगळं बंद पडले. इथले जे मालक जमात म्हणून राहतात त्यांना सुरुवातीला समता, बंधुता देणारी राज्यघटना पाहून मोठा धक्का बसला होता. घटनाही नाकारली व तिरंगी ध्वजही नाकारला. पण त्यांच्या लक्षात आले की इथल्या गुलामांना नैतिकता देणाऱ्या राज्यघटनेऐवजी रेवडी महत्त्वाची वाटते, म्हणून त्यांनी सगळी राज्यघटनाच रेवडीच्या पोत्यावर अलगत तरंगत ठेवली. त्याची जाणीव गुलामांना जेव्हा होईल तो सुदिन असेल!