Home » Blog » नव्या पिढीचा `कंट्रोल`

नव्या पिढीचा `कंट्रोल`

नव्या पिढीचा `कंट्रोल`

by प्रतिनिधी
0 comments
New Generation file photo

-निळू दामले

दिल चाहता है (२००१) हा सिनेमा काळाच्या नव्या पोषाखात आला होता. त्यातली तरूण मुलं काळाची भाषा बोलत होती. सैगल, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, वगैरेंचा काळ मागं टाकून सैफ अली खान इत्यादी पोरं सिनेमात आली. आपल्या पेक्षा किती तरी मोठ्या स्त्रीच्या प्रेमात पडलेला तरूण तिथं दिसला. प्रेमाची व्याख्याच चित्रपटात बदलली. धम्माल करणारी मुलं तिथं दिसली. वाढदिवसाचे किंवा अन्य नाच करून आनंद व्यक्त  करण्याच्या पद्धतीला दिल चाहता हैनं फाटा दिला. त्यानंतर वेक अप सिड (२००९) आला. त्यात श्रीमंत घरातला खुशालचेंडू मुलगा दिसला. वेक अप सिडच्या टोकाला मिळालेलं वळण तद्दन जुन्या जमान्याचं होतं तरीही त्यातला रणबीर मात्र या जमान्यातला होता. दोन्ही सिनेमातली गाणी नव्या जमान्यातली होती.

 कंट्रोल नेटफ्लिक्सवर आलाय. नेला आणि जो या तरुणांचं सारं जगणं ऑनलाईन असतं. त्यांचे निर्णय ऑन लाईन होतात. नेला, जो; त्यांचे सहकारी; सर्वांचंच जगणं, विचार,सारं आभासी; यंत्रावर अवलंबून. आजची पिढी कंट्रोलमधे आहे. 

माणसांना मॅनिप्युलेट करा. माणसांची माहिती गोळा करा, माणसाला वस्तू वापरणारं यंत्र करा. तुम्ही काय खायचं, काय प्यायचं, तुम्ही सेक्स कसा करायचा, तुम्ही सण कसे साजरे करायचे, तुम्ही पूजाअर्चा कशा करायच्या, तुम्ही कपडे कसे वापरायचे हे कंपन्या ठरवणार. तुमची वर्तणूक कशी आहे, तुमचा आर्थिक स्तर काय आहे इत्यादी  सर्व माहिती कंपन्या गोळा करणार. ती माहिती मॅनिप्युलेट करून तुम्हाला वस्तू खरेदी करायला लावणार. बँका, कर्ज देणाऱ्या संस्था, मॉल, दुकानं, जाहिराती, तुम्हाला दिले जाणारे बोनस व सवलती, सारं सारं अशा रीतीनं घडवणार की तुमची मेंढरं व्हावीत. 

सध्या ॲलेक्सा नावाची एक बाई तुमच्या आमच्या घरात शिरलीय. तुम्ही मागाल ते फोनवर ऐकवते, घडवून आणते. ॲलेक्सा ही बाई हा एक कंप्यूटरनं तयार केलेला बॉट आहे. तुम्ही सांगाल ते संगीत ऐकवते. तुम्ही विचाराल त्या प्रश्नाला उत्तर देते. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवरून आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांवरून ॲलेक्सा तुमच्या व्यक्तिमत्वाचे तपशील एकत्र करते. ॲलेक्सा तुम्हाला ओळखू लागते. तुमच्या हो ला हो म्हणू लागते. 

कंट्रोलमधे ॲलेक्साचाच एक भाऊ असतो. तो पडद्यावर दिसतो. तो नेल्लाला सल्ले देत असतो. हा मित्र कुठल्या तरी कंपनीनं मॅनिप्युलेट केलेला असतो, तो नेल्लाच्या आयुष्याची वाट लावतो.  

चित्रपटाचा सुरवातीच्या भागात पडद्यावर कंप्यूटरचा स्क्रीन दिसतो, सेल फोनवरचा स्क्रीन दिसतो. स्क्रीनवर अनेक माणसं, त्यांचे मेसेजेस एकाच वेळी उगवतात. दृश्य आणि शब्दांचे बुडबुडे येतात, फुटतात, नवे येतात, सेकंदात फुटतात. हे सारं वेगानं चालतं. मल्टि टास्किंग नावाची तरूणांची कामाची पद्धत पडद्यावर दिसते. एकाच वेळी अनेक माणसांशी बोलणं चाललेलं असतं.

चित्रपट तंत्राचा एक मंत्र एकेकाळी होता. कुठलंही दृश्य किमान सहा ते दहा सेकंद टिकलं तरच त्या दृश्याचा अर्थ कळतो. हा मंत्र नव्या पिढीनं धुडकावलाय. कंट्रोलच्या पडद्यावर सेकंदा सेकंदाला दृश्य, मेसेज बदलत रहातो. डोळे फिरून फिरून दुखतात. तरूण पिढीच्या  ते सवयीचं झालंय.

नायक, नायिका, मित्रमंडळी काय करतात ते कळल्यानंतर उत्तर भागात चित्रपटातलं थरार नाट्य सुरु होतं. एक खून झालाय. दुसरा होतोय. होतो. इत्यादी.  हा भाग सिनेमाच्या प्रस्थापित तंत्रानुसार सरकतो, एका ओळीत सरकत जातो.

विक्रमादित्य मोटवानीनं वापरलेलं तंत्र तसं पश्चिमी चित्रपटात अनेक वेळा वापरलं गेलेलं आहे. आपल्याकडं ते मोटवानीनं प्रभावी रीतीनं या चित्रपटात वापरलं आहे.

चित्रपट आजच्या पिढीचा आहे, पण तो मागल्या पिढीचाही आहे. दोन तीन पिढ्यांनी एकत्र पहावा असाही आहे. कारण चित्रपट खूप मूलभूत मुद्द्यांना हात घालतो.

माणसांचं जगणं कसं नियंत्रित होतं? गेल्या कित्येक पिढ्या, कित्येक शतकं ते कसं नियंत्रीत होत होतं? माणसानं कसं वागावं, काय करावं, काय योग्य आणि काय अयोग्य हे माणसाला कोण सांगत होतं? निर्णयाचा आधार असणारी माहिती माणसाकडं कशी गोळा होत होती?

देव, धर्म, गुरु, वयस्क, परंपरा इत्यादी गोष्टी माणसाला नियंत्रित करत होत्या. ते सारं माणसाच्या नकळत घडत होतं. त्याचं विश्लेषण त्या काळात झालं नाही, आता होतय.

कंप्यूटर माणसाला नियंत्रित करू पहातोय. हा कंप्यूटरही नियंत्रितच आहे. देव, धर्म, विधी, परंपरा इत्यादी साऱ्या गोष्टी धूसर होत्या, त्यांचा जन्मदाता कोण ते कळत नसे. आता जेफ बेझोज किंवा इलॉन मस्क किंवा तत्सम कोणी तरी त्याच्या लहरीनुसार, त्याच्या आर्थिक नफ्यानुसार आपल्याला नियंत्रित करतोय, हे कळू लागलंय.

मोटवानीनं कहाणी चांगली गुंफलीय. त्यात वास्तव भरपूर आहे पण ते रंगवताना मोटवानीनं त्याची गोष्ट केलीय. चित्रपटात नुसती माहिती किवा मतं भरलेली नाहीत, त्यात पात्रं आहेत. ती आपल्या आसपासची आहेत. चित्रपटातलं मुख्य पात्र एक तरुणी आहे. ती हताश आहे, हरलेली आहे. 

आज आपण पेपरात बातम्या वाचतो. तरूण आत्महत्या करतात. तरूणांचे हृदय बंद पडून मृत्यू होतात. तरूण व्यसनाधीन झालेले दिसतात. एकूणच जीवनाची वीण उसवली की काय असं वाटतं. 

तरूण म्हणतात की  वीण उसवलेली नाही, ते सुखात आहेत; मागच्या पिढीतले लोकच काळात थिजले आहेत.

मागल्या पिढीचं म्हणणं बरोब्बर उलटं आहे. 

घरा घरात वाद आहेत, घराघरात तणाव आहेत.

मोटवानी, त्यांचे कलाकार वरील साऱ्या गोष्टी प्रभावीपणानं दाखवतात. गाणीही आजची आहेत. चांगलीच आहेत. नव्या जमान्यातला ऱ्हिदम आहे, नव्या जमान्यातले शब्द आहेत. 

सिनेमा आजचा आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00