-मुकेश माचकर
तुर्कस्तानात जन्मलेला एपिक्टेटस हा तत्त्वज्ञ मुळात गुलाम होता. ‘ज्याचं मन स्वतंत्र आहे, त्याला कोणी गुलाम बनवू शकत नाही,’ असा त्याचा सिद्धांत होता. त्याचा एक पाय अधू होता. काही चरित्रकार, संशोधक मानतात की तो जन्मजात अधू होता. काहींच्या मते त्याच्या मालकाने त्याचा पाय पिरगळून तोडला होता. त्यातूनच ही कथा जन्माला आली असावी.
एपिडेक्टस कलंदर फकिरासारखा रानोमाळ भटकत असताना दरोडेखोरांच्या एका टोळीने त्याला घेरलं. हा धट्टाकट्टा देखणा नवजवान गुलामांच्या बाजारात चांगली किंमत मिळवून देईल, हे त्यांच्या लक्षात आलं. ते त्याचे हातपाय बांधून नेऊ लागले. तो म्हणाला, हातपाय कशाला बांधताय? मी तुमच्याबरोबर येतो म्हणालोय तर येईनच. त्यांनी त्याला गुलामांच्या बाजारात नेऊन उभा केला. तर हा ओरडू लागला. गुलामांच्या बाजारात स्वतंत्र माणूस खरेदी करण्याची संधी चुकवू नका. एका माणसाने खरोखरच ती चुकवली नाही. त्याला खरेदी करून घेऊन आला.
एपिक्टेटस त्याला सांगायचा की जो माणूस मनाने स्वतंत्र असतो, तो कोणाचाही गुलाम नसतो. मी तुझा गुलाम नाही. मालकाने त्याला धडा शिकवून त्याचा साक्षीभाव निपटून काढण्यासाठी इतर गुलामांना त्याचा पाय पिरगळून तोडायला सांगितला.
एपिक्टेटस त्याला म्हणाला, हे बघ. तू मला चांगली किंमत देऊन खरेदी केलंयस. माझ्याकडून काम करून घ्यायचं असेल, तर माझा पाय मोडून तू स्वत:चंच नुकसान करून घेणार आहेस.
मालकाने गुलामांकरवी पाय मुरगळून तोडला, तेव्हा एपिक्टेटस जराही न कण्हता शांतपणे म्हणाला, तोडलास ना माझा पाय, करून घेतलंस ना आपलंच नुकसान?