सातारा : प्रशांत जाधव : कोरेगाव हा राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारा मतदारसंघ आहे. माजी विधानसभा सभापती स्वर्गीय शंकरराव जगताप, मराठा आरक्षणाची ठिणगी पेटवणाऱ्या माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील, खासदार शरद पवारांचे विश्वासू शशिकांत शिंदे, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी आजवर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. येथील बहुतांशी प्रतिनिधींची विधानसभा सभापती, मंत्री आदी पदावर वर्णी लागल्यामुळे येथील लोकप्रतिनिधींना लाल दिव्याची भुरळ कायमच राहिली आहे.
राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा मात्र विस्तार अद्याप झालेला नाही. १९७८ सालच्या निवडणुकीत या मतदारसंघात शंकरराव जगताप यांना काँग्रेस पक्षाने संधी दिली होती. त्यांच्याविरोधात अपक्ष पांडुरंग माने यांनी जोराची टक्कर दिली होती. या निवडणुकीत शंकरराव जगताप यांनी माने यांचा ६ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर राज्यात १९८० साली पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आणि शंकरराव जगताप पुन्हा अर्स काँग्रेसकडून मैदानात उतरले. यावेळी त्यांची लढाई इंदिरा काँग्रेसचे दत्ताजीराव बर्गे यांच्यासोबत होती. यामध्ये शंकरराव जगताप यांचा ११ हजार मतांनी विजय झाला.
१९८५ सालच्या निवडणुकीत शंकरराव जगताप यांनी शिवाजीराव महाडिक यांचा १४ हजार ८८४ मतांनी पराभव केला. या विजयानंतर त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाला राज्यात ओळख मिळाली. १९९० साली झालेल्या निवडणुकीत शंकरराव जगताप (काँग्रेस) यांच्यासमोर माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे जनता पक्षाकडून तगडे आव्हान होते. मात्र या निवडणुकीतही शंकरराव जगताप यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांचा सुमारे १२ हजार मतांनी पराभव केला.
१९९५ सालातील निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा शंकरराव जगताप व अपक्ष उमेदवार डॉ. शालिनीताई पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली. यावेळी शंकरराव जगताप यांचा ४ हजार मतांनी निसटता विजय झाला होता. १९९९ सालातील निवडणुकीत नव्याने निर्मिती झालेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत झाली होती. यावेळी काँग्रेसकडून शंकरराव जगताप आणि राष्ट्रवादीकडून डॉ. शालिनीताई पाटील रिंगणात होत्या. या निवडणुकीत डॉ. शालिनीताई पाटील यांनी शंकराव जगताप यांचा तब्बल २५ हजार ६०० मतांनी पराभव केला होता. कोरेगाव मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केलेले शंकरराव जगताप यानंतर सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते.
२००४ सालातील निवडणुकीत डॉ. शालिनीताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी एकहाती विजय मिळवला होता. त्यानंतर आलेल्या २००९ सालच्या निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचनेत जावळीचे तत्कालीन आमदार असलेले शशिकांत शिंदे यांनी डॉ. शालिनीताई यांचा ३१ हजार ७५३ मतांनी पराभव केला होता. शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीने थेट जलसंपदामंत्री केले. २०१४ सालातील निवडणूक शिंदे यांनी मोठ्या मतधिक्याने जिंकली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच आ. महेश शिंदे यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली. या मतदारसंघाचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर येथील जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांना साथ दिली आहे. आताच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांच्यातच सरळ लढत होणार आहे.