महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते महाराष्ट्रात येऊन प्रचाराचा धुरळा उडवू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते सभा, पत्रकार परिषदा घेऊ लागले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमी प्रचारात झोकून देत असतात, परंतु यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनीही महाराष्ट्रासाठी वेळ दिला आहे, यावरून काँग्रेसने महाराष्ट्राची निवडणूक किती गंभीरपणे घेतली आहे, हे दिसून येते. राष्ट्रीय नेते आले की स्थानिक प्रश्न मागे पडून राष्ट्रीय प्रश्न पुढे येतात, आणि प्रचाराला वेगळे वळण लागते हे यापूर्वीही अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पद्धतीने प्रचाराला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला असून बाकी सगळे मुद्दे मागे पडून `बटेंगे तो कटेंगे` हाच डायलॉग प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी मध्यंतरी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्यासाठी प्रयत्न केले, त्यासाठी ते मुंबईतही आले आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे नेते महाराष्ट्रात येऊन इथले उद्योग तिकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात, तसा प्रयत्न योगी आदित्यनाथ यांनी इथल्या बॉलीवूडच्या संदर्भाने केला. त्यात त्यांना यश आले नाही हे खरे असले तरी त्यांनी त्यासाठी धडका दिल्या, हे नाकारता येत नाही. योगी असले तरी चित्रपटांचे आकर्षण विलक्षण म्हणावयास हवे आणि त्याच आकर्षणातून ते जाहीर सभांमधून `बटेंगे तो कटेंगे` असा डायलॉग फेकत आहेत. त्यांच्या चिथावणीने चेकाळलेले श्रोतेही मग सामूहिकरित्या तो डायलॉग म्हणतात. नेते जे पेरतात तेच कार्यकर्त्यांच्या डोक्यात भिनते. आणि योगी आदित्यनाथांसारखे आगलावू नेते जेव्हा लोकांची माथी भडकावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम भयंकर स्वरुपाचे असतात. महाराष्ट्राने अशा प्रयत्नांना वेळोवेळी नाकारले आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी-शाह यांच्या भाषणांना नाकारले आहे. नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या १७ पैकी १४ ठिकाणी महायुतीचे उमेदवार पराभूत झाले होते, यावरून त्याची कल्पना येऊ शकते. तरीसुद्धा योगी पुन्हा त्याच मार्गाने निघाले आहेत. सत्ता मिळो न मिळो लोकांच्या मनात विष कालवणे हाच आपला मूळ उद्देश असल्यासारखे त्यांचे वर्तन आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या `बटेंगे तो कटेंगे` ला महाविकास आघाडीने `जुडेंगे तो जीतेंगे` अशा घोषणेने प्रत्त्युत्तर दिले आहे. त्याहीपुढची गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीच योगी यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेण्याबरोबरच त्यांचा खरमरीत समाचारही घेतला आहे. महाराष्ट्र ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची भूमी आहे. इथे सगळे समाजघटक गुण्यागोविंदाने नांदत असतात. बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी आपल्या राज्यातील संस्कृती इथे आणण्याची गरज नाही, अशा शब्दात अजितदादांनी योगींना सुनावले आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जात असताना त्याला शह देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला आहे. महायुतीत राहून त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत करायला हवे. त्यांचे भाजपसोबतचे राजकारण वेगळे आणि वैचारिक भूमिका वेगळी. कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता त्यांनी ती घेतली आहे. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सभा घेणार नसल्याची बातमी आहे. राजकीय फायद्या-तोट्याचा विचार न करता अजित पवार भूमिकेवर ठाम राहिले आहेत हे विशेष. काँग्रेस संस्कृतीत आणि शरद पवार यांच्या संस्कारात वाढलेले अजितदादा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये भाजपसोबत गेले असले तरी त्यांनी वैचारिक भूमिका सोडलेली नाही. त्याचमुळे भविष्यात ते पुन्हा स्वगृही किंवा महाविकास आघाडीकडे परतण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अजितदादांच्या भूमिकेचा विचार मात्र या राजकारणाच्या पलीकडे जाऊन करायला हवा. सामाजिक वीण उसवण्याची भाषा करणा-यांविरुद्ध त्यांनी घेतलेल्या भूमिकेच स्वागत करायला हवे.