-डॉ. श्रीरंग गायकवाड
इंद्रायणीकाठच्या तुकोबारायांना तब्बल चारशे वर्षांनी या सगुण-निर्गुण ऐक्याचा साक्षात्कार झाला. ‘सगुण निर्गुण एकु गोविंदु रे’ असा निर्वाळा त्यांनी दिला. वारकरी विचारांच्या नाळेनं संत कसे जोडले गेले होते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘नामदेव-जनाबाई’ आणि ‘तुकाराम-बहिणाबाई’ हे नातं. वाल्मिकींप्रमाणे शतकोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या संत नामदेवांचे अभंग अपुरेच राहिले. ते पुढं तुकाराममहाराजांनी पूर्ण केले. त्याबाबत ‘संत नामदेवच आपल्या स्वप्नात आले. सोबत पांडुरंग होते. त्यांनीच अभंग लिहिण्यास आपल्याला सुचवलं’, असं एका अभंगात तुकाराममहाराज सांगतात. यावेळी नामदेव आणि देवासोबत संत जनाबाईही असल्या पाहिजेत. कारण वारकरी संप्रदायाचा पाया रचताना आणि त्याचा विस्तार करताना जनाबाई त्यांच्या अखंड सोबत होत्या. पुढं या वारकरी विचारांवर ‘कळस’ चढवणाऱ्या तुकोबारायांसोबत ‘फडकती ध्वजा’ बनून संत बहिणाबाई उभ्या होत्या. ‘ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस’ या अभंगात हे चित्र लख्खपणे दिसलं आहे. जनाबाई नसत्या तर नामदेवांच्या वारकरी विचारांचा विस्तार होणं कठीण होतं आणि संत बहिणाबाई नसत्या तर इंद्रायणीच्या डोहातून तुकोबांचे बुडविलेले अभंग वर आले नसते! नामदेव-तुकोबांप्रमाणंच जनाई-बहिणाईचं नातं होतं.
वारकऱयांची समता ही बौद्ध परंपरेतून आल्याचं भान या दोघींना होतं. म्हणून तर ‘आता बौद्ध झाला सखा माझा’ असं जनाबाई म्हणतात, तर ‘कलियुगी बौद्धरुप धरी हरी। तुकोबा शरिरी प्रवेशला।।’ असं संत बहिणाबाई सांगतात. बहिणाबाई तर बौद्ध विचारवंत अश्वघोषाच्या वज्रसूचीचा अनुवाद बहिणाबाई करतात. संत नामदेव आणि संत जनाबाईंच्या अभंगांचा मोठा प्रभाव तुकोबांच्या अभंगांवर पडलेला दिसतो. पक्षी, कुत्रा, मांजर काहीही कर पण आम्हाला पुन्हा जन्म दे, असं संत जनाबाई म्हणतात. तर त्याच प्रकारे मोक्ष नाकारताना ‘तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी’ असं तुकाराम महाराज म्हणतात. ‘नाठाळाच्या माथी’ सोटा हाणायला निघालेले तुकोबा पाहिले की, अंगणात उभे राहून थेट देवाला शिव्या घालणाऱ्या जनाबाई दिसतात.
वृक्ष लागले अंबरी। डोलतात नानापरी।।
फणस कर्दळी गंभेरी। आंबे नारळ खर्जुरी।।…असं निसर्गाचं, वृक्षवेलींचं जनाबाईंनी केलेलं मनोहारी वर्णनाचं प्रतिबिंब तुकोबारायांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरें…’ या अभंगात पडलेलं दिसतं. संत जनाबाईंच्या कवितेची दाट सावली ‘जन खेळकर’ करणाऱ्या संत एकनाथांच्या रचनांवरही पडली. ‘माझे अचडे बछडे। छकुडे गं राधे रुपडे।।…’ अशी अंगाईगीतासारखी जनाबाईंची अभंगशैली नाथमहाराजांनी अनेक अभंगांमध्ये वापरली. तर
‘खंडेराया तुज करिते नवसू। मरूं दे रे सासू खंडेराया।।…’
या जनाबाईंच्या रचनेसारख्या भारुडरचना एकनाथांनी विपुल केल्या. त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे, आपली समीक्षकाची भूमिका बजावताना जनाबाईंनी ज्ञानेश्वरीवरही भाष्य केलं. त्या काळात संतांच्या काव्यात आपलं काव्य घुसडण्याचा अश्लाघ्य प्रकार सुरू होता. किमान ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीत तरी असा प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना
गीतेवरील आन टीका। त्यांनीं वाढीयेली लोकां।।
रत्नकटक ताटामाजीं। त्यानें ओगारिलें कांजी।। असं जनबाईंनी म्हटलं.
म्हणजे कुणी ज्ञानेश्वरीत प्रक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्याने ‘रत्नजडीत सोन्याच्या ताटात कांजी ओतल्यासारखे’ अभद्र वाटेल. जनाबाईंची हीच भूमिका पुढं संत एकनाथांनी निभावली. नंतरच्या काळात त्यांना ज्ञानेश्वरीतले प्रक्षेप काढून ज्ञानेश्वरी शुद्ध करावी लागली. त्यानंतर जनाबाईंच्याच शब्दात
ज्ञानेश्वरी पाठी। जो ओवी करेल मऱ्हाटी।।
तेणे रत्नखचिताचिया ताटी। जाण नरोटी ठेविली।।
असं एकनाथमहाराज बजावतात. जनाबाईंचा प्रभाव असा वर्षानुवर्षे दिसत राहतो.
ज्ञानदेव सर्व संतांना आदरस्थानी. ज्ञानामृत पान्हावणाऱ्या या विश्वाच्या माऊलीला ‘माऊली’ असं नामदेव-जनाबाईंनीच पहिल्यांदा संबोधलं.
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली।
जेणे निगमवल्ली प्रगट केली।।
असं नामदेव म्हणतात, तर
मायेहूनि माय मानी। करी जिवाची ओंवाळणी।। असं जनाबाई माऊलींविषयी म्हणाल्या. संतांमध्येही भेद निर्माण करू पाहणाऱ्यांनी ‘माऊली’ या संबोधनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. वारकऱ्यांना तो समजलाय. म्हणून तर ते परस्परांना ‘माऊली’ म्हणत एकमेकांच्या पायाशी वाकतात.
जनाबाईंनी सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैत, भक्ती-ज्ञान, शैव्-वैष्णव, सवर्ण-शूद्र स्त्री-पुरुष, यांची यशस्वी सांगड घातली. हे सगळं करून जनाबाई रमल्या त्या खेडोपाड्यातल्या निरक्षर, कष्टकरी बायाबापड्यांमध्ये. ज्ञानदेवांना माऊली, विठ्ठलाला विठाबाई, पंढरीचे आई, अचडे बछडे म्हणणाऱ्या, गाईला गाऊली म्हणणाऱ्या, हरिणी-पाडसाची आणि गाय-वासराच्या प्रतिमा वापरत पंढरपूरला माहेर संबोधणाऱ्या जनाबाईंचं गाणं मऱ्हाटमोळ्या भोळ्या महिलांना फार फार आवडतं. जनाबाईंचे स्वानंदाचे डोल ऐकताना
जशी मोहोळाशी लुब्ध माशी। तशी तूं सखी माझी होसी।।
सुख दु:ख सांगेन तुजपाशी। माझा जीव होईल खुषी।। अशी जनाबाईंप्रमाणेच त्यांची अवस्था होते.
आपल्याला काम करु लागणाऱ्या देवाचं अत्यंत लोभस चित्र जनाबाईंनी अभंगांतून रेखाटलं आहे. जनाबाईंना झाडलोट करू लागणारा, गोवऱ्या वेचू लागणारा, सडा सारवण करू लागणारा, चारी हातांनी जनाबाईंचं धुणं धुवून टाकणारा, साळी कांडून देणारा, तुळशीच्या वनात डोईला लोणी लावून देणारा, अंघोळीसाठी पाणी आणून देणारा, वेणी घालून देणारा विठुराया जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो.
अशी अलवार अभंगरचना करणाऱ्या जनाबाईंचे शब्द प्रसंगी पेटते पलिते होऊन येतात. मग त्या नामदेवाला आणि प्रत्यक्ष देवालाही सोडत नाहीत.
राजाई, गोणाई। अखंडित तुझ्या पायी।।
मज ठेवियले द्वारी। नीच म्हणोनि बाहेरी।।
अशी त्यांना सांभाळणाऱ्या नामदेव कुटुंबाची अब्रू त्या वेशीवर टांगतात. तर अंगणात उभे राहून
अरे अरे विठ्या।… तुझी रांड रंडकी झाली।।
तुझे गेले मढे। तुला पाहूनि काळ रडे।।
अशा विठोबाला कचाकचा शिव्या घालते.