Home » Blog » अफगाणिस्तानचा मालिका विजय

अफगाणिस्तानचा मालिका विजय

तिसऱ्या ‘वन-डे’त बांगलादेशवर ५ विकेटनी मात

by प्रतिनिधी
0 comments
BAN vs AFG

शारजा, वृत्तसंस्था : रहमानुल्ला गुरबाझचे शतक आणि अझमतुल्ला ओमरझाईच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात ५ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने ही मालिका २-१ अशी जिंकली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत ८ बाद २४४ धावा केल्या. सुरुवातीच्या विकेट झटपट गेल्यामुळे बांगलादेशची अवस्था पंधराव्या षटकात ४ बाद ७२ अशी झाली होती. तथापि, महमदुल्ला आणि कर्णधार मेहदी हसन मिराझ यांनी पाचव्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी रचत बांगलादेशला दोनशेपार मजल मारून दिली. बांगलादेशचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज महमदुल्लाने ९८ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ९८ धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. कर्णधार मेहदी हसन मिराझने ४ चौकारांसह ११९ चेंडूंमध्ये ६६ धावा करून त्याला साथ दिली. अफगाणिस्तानकडून ओमरझाईने ३७ धावांत ४ विकेट घेतल्या.

बांगलादेशचे आव्हान अफगाणिस्तानने ४८.२ षटकांत ५ विकेटच्या मोबदल्यात पार केले. अफगाणिस्तानचा सलामीवीर गुरबाझने ५ चौकार व ७ षटकारांसह १२० चेंडूंमध्ये १०१ धावा फटकावल्या. त्याचे हे आठवे वन-डे शतक ठरले. त्याने ओमरझाईसोबत शतकी भागीदारीही रचली. ओमरझाईने ७७ चेंडूंमध्ये ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. गुरबाझ बाद झाल्यानंतर ओमरझाईने महंमद नबीच्या साथीने अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश – ५० षटकांत ८ बाद २४४ (महमदुल्ला ९८, मेहदी हसन मिराझ ६६, सौम्य सरकार २४, अझमतुल्ला ओमरझाई ४-३७, महंमद नबी १-३७) पराभूत विरुद्ध अफगाणिस्तान – ४८.२ षटकांत ५ बाद २४६ (रहमानुल्ला गुरबाझ १०१, अझमतुल्ला ओमरझाई नाबाद ७०, महंमद नबी नाबाद ३४, नाहिद राणा २-४०, मुस्तफिझूर रहमान २-५०).

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00