संगीत क्षेत्रात एखाद्या वाद्याशी नाव जोडलेले आणि त्या वाद्याबरोबरच संगीतकला लोकप्रिय करणारे कलावंत फार मोजके आहेत. त्यासंबंधित वाद्याशीच त्यांचे नाव जोडले जाते. बिस्मिल्ला खाँ यांची सनई, उस्ताद अल्लारखाँ आणि झाकिर हुसेन यांचा तबला, हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी अशी काही नावे आपल्याला आठवतात. त्याच परंपरेतले एक मोठे नाव म्हणजे पंडित रामनारायण. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांनी सारंगीला एकल वाद्य म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सारंगी आणि पंडित रामनारायण असे समीकरण बनले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. शास्त्रीय संगीतासाठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस दुनियेचा त्याग करणारे संगीतकार म्हणून पंडित रामनारायण यांना ओळखले जात होते. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने त्रस्त असलेले पंडितजी दीर्घकाळ आजारी होते. शुक्रवारी रात्री वयाच्या ९६ व्या वर्षी मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण या देशातील दुस-या क्रमांकाच्या नागरी सन्मानाने सन्मानित केलेल्या पंडित रामनारायण यांनी मुगल-ए-आजम, मधुमती, पाकिजा, गंगा जमुना, कश्मीर की कली अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये सारंगीची धून वाजवली होती.
राजस्थानमध्ये उदयपूरजवळच्या आमेर गावात शास्त्रीय संगीताची परंपरा असलेल्या एका कुटुंबात २५ डिसेंबर १९२७ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा बागाजी बियावत गायक होते. ते उदयपूरच्या दरबारात गात होते. रामनारायण यांची मातृभाषा राजस्थानी होती, नंतरच्या काळात ते हिंदी आणि पुढे इंग्रजीही शिकले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या हाती सारंगी आली आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना सारंगी वादनाचे तंत्र शिकवले. प्रारंभीच्या काळात वडिलांच्या मार्गदर्शनाखालीच ते शिकत होते, पुढे वडिलांनी त्यांना जयपूरचे सारंगीवादक मेहबूब खान यांच्याकडे शिकायला पाठवले. १९४४ साली लाहोर आकाशवाणीवर त्यांनी संगीतकार म्हणून काम सुरू केले. १९४७ ला फाळणीनंतर ते दिल्लीला आले. संगीताच्या क्षेत्रात त्यांना पुढे जायचे होते, मात्र तशी संधी दिल्लीत मिळत नसल्याने १९४९ साली ते मुंबईत दाखल झाले.
मदनमोहन यांच्यासारखे दिग्गज संगीतकार पंडित रामनारायण यांच्या सारंगीचा आवर्जून वापर करून घेत. चित्रपट सृष्टीत देदीप्यमान यश मिळत असतानाही केवळ शास्त्रीय संगीताच्या प्रेमापोटी ते चित्रपटसृष्टीपासून लांब गेले आणि देश-विदेशात संगीत महोत्सवांमध्ये सारंगी वाजवण्याचा निर्णय घेतला. आपले मोठे बंधू तबलावादक चतुर लाल याच्यासोबत त्यांनी १९६४ मध्ये युरोप आणि अमेरिकेचा दौरा केला. संगीत शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली, त्यांच्याकडे अनेक शिष्य तयार झाले. संगीत क्षेत्रातील त्यांच्या कारकीर्दीची दखल घेऊन १९७६ मध्ये पद्मश्री, १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००५ मध्ये पद्मविभूषण या किताबांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना संगीत नाटक अकादमी, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान तसेच आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार आदी पुरस्कारही मिळाले. त्यांच्या जीवनावर ‘पंडित रामनारायण-सारंगी के संग’ या नावाचा चित्रपटही बनवण्यात आला असून २००७ सालच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित झाला होता. पंडित रामनारायण यांना भावपूर्ण आदरांजली!