Home » Blog » अंतराळात भारत सर करणार नवे टप्पे

अंतराळात भारत सर करणार नवे टप्पे

अंतराळात भारत सर करणार नवे टप्पे

by प्रतिनिधी
0 comments
ISRO file photo

-संजय पाटोळे  

अवकाश संशोधन क्षेत्रात भारताची गणना आता अमेरिका, रशिया, चीन व युरोपियन अवकाश संशोधन संस्था या अग्रगण्य शक्तींच्या मालिकेत तोडीस तोड म्हणून केली जाते. भारतीय मोहिमांचे वैशिष्ट्य म्हणजे भारताने चंद्र, सूर्य, मंगळ या मोहिमा इतरांच्या तुलनेत अतिशय कमी खर्चात यशस्वी केल्या आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था हा देशाचा अभिमान ठरला आहे. नजीकच्या भविष्यात इस्रो जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार आहे, त्याविषयी साऱ्या देशवासीयांमध्ये खूप उत्सुकता आहे.

अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांनी आजवर केलेल्या कामगिरीची दखल साऱ्या जगाने घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर तर इस्रोने भारताला चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या जगातील मोजक्या चार देशांच्या पंक्तीत स्थान मिळवण्याचा बहुमान मिळवून दिला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा तर भारत पहिला देश ठरला. इस्रोच्या भविष्यातही अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमा नियोजित आहेत. त्यातील एक म्हणजे चांद्रयान-४ ही मोहीम. तीही यशस्वी करून पुढील टप्प्यात भारताचे स्वतंत्र ‘अंतराळ स्थानक’ उभारण्याचा इस्रोचा इरादा आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष सोमनाथ यांनी अलीकडेच यासंदर्भातील सविस्तर माहिती विषद केली आहे. सन २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय माणूस पाठवण्याचीही इस्रोची महत्त्वाकांक्षा आहे. ‘ह्यूमन स्पेस एक्सप्लोरेशन’ नावाची ही मोहीम निश्चितच भारतातील येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा देणारी असेल, असे सोमनाथ विश्वासपूर्वक सांगतात, तेव्हा भारतीयांचा अभिमान निश्चितच द्विगुणित होताना पाहायला मिळतो.

चांद्रयान- ४ मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून त्यासाठी सुमारे २१०० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. ही मोहीम प्रत्यक्ष मार्गी लागण्यासाठी साधारणपणे आणखी तीन वर्षांचा कालवधी लागेल. एक लाँच व्हेईकल, २ रॉकेट व डिझाईन यावर करावा लागणारा खर्च तूर्तास प्रकल्प खर्चात गृहीत धरला आहे. चांद्रयान- ४ मोहिमेचे एक वैशिष्ट्य असे असेल की, ते दोन टप्प्यांत लाँच केले जाईल. दोन मॉड्युल्स असतील. ती अंतराळात गेल्यानंतर एकमेकाशी जोडली जातील. वैज्ञानिक परिभाषेत याला डॉकिंग-अऩडॉकिंग म्हणतात. या तंत्रज्ञानाची यशस्वीतता महत्त्वाची यासाठी असेल की, भविष्यात अंतराळस्थानक उभारणीचे जे उद्दिष्ट आहे ते सफल होण्यासाठी हा प्रयोग महत्त्वाचा असणार आहे. अंतराळ स्थानक उभारणीचे जे नियोजन आहे त्यासाठी हे तंत्रज्ञान व त्याची यशस्वीतता महत्त्वाची ठरणार आहे. कारण अंतराळस्थानकासाठी  लागणारी सामग्री घेऊन पाच वेळा उड्डाण करावे लागणार आहे व त्या साधनसामग्रीची जोडणी अंतराळात होणार आहे.

चांद्रयान- ४ द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती व दगड यांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याचेही नियोजन आहे. त्या दृष्टीने ही मोहीम अनेक तांत्रिक कौशल्याचे मिश्रण असेल. थोडंस अधिक तपशिलाने सांगायचं झाल्यास त्याचे टप्पे असे असतीलः १) उपग्रहाद्वारे अंतराळात प्रक्षेपित केल्यानंतर दोन भागांची अंतराळातच जोडणी आणि विलगीकरण करणे. २) चंद्राच्या पृष्ठभागावर मानवरहित यानातील लॅन्डरचे लँडिंग होणार. ३) रोव्हर बाहेर निघून माती व दगड यांचे नमुने गोळा करणार. ४) गोळा केलेले नमुने घेऊन रोव्हर पुन्हा लॅन्डरला येऊन मिळेल. ५) लँडर पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावरून टेकऑफ करेल. ६) तो चंद्राच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या ऑर्बिटरला जोडेल. ७) यानंतर दोन्हींचा पृथ्वीवर परत येण्याचा प्रवास सुररू होईल. ८) ऑर्बिटर त्याच्याकडे असलेले नमुने घेऊन त्यातील कॅप्सुलद्वारे पृथ्वीवर ते परत पाठवेल.

भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी सन २०४७ ला साजरी होईल. तोपर्यंतचा रोडमॅप इस्रोकडे तयार आहे. ‘व्हिजन २०४७’ असे डॉक्युमेंट त्यासाठी इस्रो तयार करीत आहे. त्यानुसार भारताच्या अवकाश कार्यक्रमाला क्रांतिकारी आकार देण्याचा इरादा आहे. भविष्यात राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास यांसारख्या विषयांच्या संचलनातही अंतराळातील आपल्या वैज्ञानिक यंत्रणेची मदत घेता येणार आहे. भारताचा अंतराळ संशोधन कार्यक्रम आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण करण्यावरही कटाक्ष आहे. ‘मेक इन इंडियाचा’ मंत्र त्यासाठी आणखी बळकट करण्यावर भर राहील. प्रसंगी खासगी क्षेत्राचेही त्यासाठी सहकार्य घेतले जाईल. तसेही या घडीला सुद्धा भारतात ४५० खासगी कंपन्या अवकाश क्षेत्रात इस्रोला विविध माध्यमातून सहकार्य करीत आहेत. प्रामुख्याने उपग्रह बांधणी व त्यासाठी आवश्यक असलेले इतर सुटे भाग यांची निर्मिती व देखभाल या क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग आतापर्यंत मोलाचा राहिला आहे.

इस्रोच्या यापूर्वीच्या मोहिमांमध्ये मंगळयान मोहिमेनेही साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. ५ नोव्हेंबर १९१३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात इस्रोने मंगळावर यशस्वीपणे यान धाडले. ते साडेसात वर्षे कार्यरत राहिले. आदित्य एल-१ हा उपग्रह यापूर्वीच सूर्य मोहिमेवर असून तो या वर्षाच्या सुरवातीसच सूर्याच्या चारही बाजूंना आपल्या नियोजित कक्षेत पोहोचला आहे. त्याला नेमून दिलेले कार्य तो करत आहे. आता पुढच्या टप्प्यात आणखी एक उपग्रह सूर्य मोहिमेवर पाठवला जाणार आहे. तो युरोपीय अंतराळ एजन्सीच्या वाहनातून पाठविला जाईल. शुक्र या ग्रहाचा अभ्यास करणयासाठीही इस्रोचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून मार्च २०२८ मध्ये शुक्र यान प्रक्षेपणाचे नियोजन आहे. शुक्रावरची ही मोहीम चार वर्षे चालेल. एकूणच अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत भविष्यात नववने टप्पे यशस्वी करून देशाची पताका केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर अंतराळातही फ़डकवत ठेवणार आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00