टोरंटोः वृत्तसंस्था : कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारत-कॅनडाचे संबंध गेल्या आठवड्यात बिघडले. कॅनडात सततच्या पेचप्रसंगानंतर कॅनडाचे पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करत आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक केली आहे. त्याचे नाव इंद्रजित गोसल आहे. हिंदू मंदिर हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला गोसल हा खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नूचा जवळचा असून संशयास्पद परिस्थितीत मारला गेलेला हरदीप सिंग निज्जर याच्यासोबत काम करत होता.
ग्रेटर टोरंटो येथील हिंदू मंदिरावर हल्ला करण्याची योजना इंद्रजितने तयार केली होती, असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आश्चर्यकारक बाब म्हणजे गोसल या खलिस्तान समर्थकाला अटक करण्यात आली होती; मात्र काही काळानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. इंद्रजीत गोसल हा पूर्वी ‘शीख फॉर जस्टिस’ (एसएफजे)चा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याचा उजवा हात मानला जात होता. इंद्रजीत हा हा निज्जरचे काम पाहतो. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंह निज्जरच्या मृत्यूनंतर इंद्रजीत गोसल खलिस्तान सार्वमताचे सर्व काम पाहत होता, असा दावाही केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गोसल याला ८ नोव्हेंबर रोजी अटक केली; मात्र आता त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे सांगितले आहे. भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडानेही आपल्या व्हिसा धोरणात बदल केला. ४ नोव्हेंबर रोजी खलिस्तानींनी कॅनडातील अनेक मंदिरांना लक्ष्य केले होते आणि त्यांची मोडतोडही केली होती. ज्याच्या प्रत्युत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला होता आणि कॅनडाच्या सरकारला कठोर कारवाई करण्यास सांगितले होते. या प्रकरणी कॅनडाच्या पोलिसांचे म्हणणे आहे की, घटनेच्या तपासासाठी एक टीम तयार करण्यात आली असून तपासानंतर संपूर्ण प्रकरणातील आरोपींवर कारवाई केली जाईल. पोलिसांनी सांगितले की, अपघाताच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे, जेणेकरून आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करता येतील.