-स्मृति मल्लपटी
शोध-संशोधन आणि ज्ञान-विज्ञान ही दोन्ही क्षेत्रे पाश्चात्य देशांच्या प्रभावाने व्यापलेली आहेत. मात्र नितांत गरज आणि पर्यायाचा उपलब्ध नसलेला अवकाश या निकडीतून आता भारतानेसुद्धा कर्करोग विज्ञानात आपला ठसा उमटवण्यात प्रारंभ केला आहे. अलीकडे नेक्स कार १९ ( NexCAR 19) ही आधुनिक कर्करोगविरोधी उपचारपद्धती विकसित करण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आले आहे. या यशाचा लाभ भारतासारख्या कर्करोगप्रवण देशाला होणार आहेच, परंतु जगातले जे गरीब देश आहेत, त्यांनासुद्धा ही उपचारपद्धती एकप्रकारे वरदान ठरणार आहे. याच नव्या उपचारपद्धतीच्या निर्मितीची प्रक्रियेचा ऊहापोह.
ही सगळी भागनड पाहता नेक्स कार १९ या उपचारपद्धतीला आकार देताना अलका द्विवेदी आणि त्यांच्या संशोधक सहकाऱ्यांनी काय केले, तर उंदिरापासून मिळवलेल्या प्रतिपिंडाच्या अग्राला परक्या नव्हे तर आप्तस्वकीय भासणाऱ्या मानवी प्रथिनांची जोड दिली. यामुळे माणसाच्या शरीरातल्या प्रतिकारक्षम पेशींकडून होणाऱ्या हल्ल्याच्या शक्यता मावळल्या. प्रयोगशाळा संशोधनात असेही आढळून आले की, मानवीकरण झालेल्या ‘कार’ पेशींचे कर्कपेशी गाठनिर्मितीविरोधी कार्य उंदरापासून मिळवलेल्या कार पेशींपेक्षा अधिक प्रभावी आहे. याच सोबत साइटोकाइन्स नावाच्या कर्कपेशीविरोधी अत्यंत महत्त्वाच्या निम्नस्तरीय प्रथिनांच्या निर्मितीतही कार पेशी उत्तम साथ देताहेत. ही प्रक्रिया यासाठीदेखील महत्त्वाची आहे कारण, कार-टी उपचारपद्धतीचा लाभ झालेल्या काही रुग्णांमध्ये साइटोकाइन-रिलिज सिंड्रोम ( इम्युनोथेरपीचा दुष्प्रभाव काही प्रतिकारक्षम पेशींवर पडणे आणि त्या प्रतिकारक्षम पेशींनी रक्तांमध्ये अमाप संख्येने साइटोकाइन्स सोडल्याने गुंतागुंत निर्माण होणे.) नावाचे टोकाचे दाहकेंद्री दुष्परिणाम नजरेस आलेले आहेत, आणि प्रतिकारक्षम पेशींपासून या दुष्परिणांमुळे रुग्णांचा जीव जाण्याचाही धोका कायम राहिला आहे.
आहे यशस्वी तरीही…
तर अशा प्रकारे नेक्स कार १९ चे महत्त्व कर्कविज्ञानाने अनेक अंगाने जोखले आहे, हे खरेच. अलीकडेच जेव्हा क्लिनिकल ट्रायल भाग म्हणून लिम्फोमा आणि ल्युकेमिया झालेल्या ३३ रुग्णांना ही उपचारपद्धती देण्यात आली, तेव्हा असे लक्षात आले की, उपचारानंतरच्या एका महिन्यात १९ रुग्णांमधल्या कर्करोगाच्या गाठी पूर्णपणे नामशेष झालेल्या आहेत. इतर ४ जणांमधल्या गाठी आकाराने अर्ध्याने आक्रसल्या आहेत. म्हणजेच, इथे यशाची सरासरी टक्केवारी ७० इतकी नोंदली गेली आहे. आणि जे रुग्ण या ट्रायलमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांच्या दुष्परिणामांची नोंदही पुढची पाच वर्षे घेतली जाणार आहे. त्याने उपचारपद्धती अधिकाधिक परिणामकारक होण्यास हातभार लागणार आहे.
अर्थात, ‘यशाचा हा आलेख असाच चढता राहील किंवा नाही, हे येणारा काळच ठरवणार आहे,’ असे काहीसे सावध नि वस्तुस्थितीदर्शन विधान या संबंधाने डॉ. हसमुख जैन यांनी केले आहे. जैन हे मुंबईतल्या प्रसिद्ध टाटा मेमोरिअल सेंटरचे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. कॅनडातल्या ओटावा हॉस्पिटलमधल्या हॅमटोलॉजिस्ट नताशा केकरे यांनीदेखील अशीच वास्तवाचा आरसा दाखवणारी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, नेक्स कार १९ उपचारपद्धतीचे जे निष्कर्ष आले आहेत, ते मुळात अत्यंत तोकड्या रुग्णसंख्येवर आणि तेही सर्वसाधारण रक्ताच्या कर्करोग झालेल्या रुग्णांवर आधारलेले आहेत. त्यामुळे विशिष्ट प्रकारचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर ही उपचारपद्धती किती यशस्वी ठरेल, याचा ठाव घेणे आताच खूप घाईचे ठरेल. ज्यांच्यावर ट्रायल घेतली गेली, त्यातल्या केवळ दोघांना सायटोकाइन रिलिज सिंड्रोमच्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागले आहे. यातल्या एकालाही कार-टीचा साइड इफेक्ट म्हणता येईल अशा न्युरो टॉक्सिसिटी अर्थात चेतासंस्थेशी निगडित गुंतागुंतीला सामोरे जावे लागलेले नाही. थोडक्यात , जे काही मिळवले आहे, ते पुरेसे नाही. यात अधिक सुस्पष्टता येणे आवश्यक आहे. असे असले तरीही एफडीएने मान्यता दिलेल्या यासंबंधांतल्या काही उपचारपद्धतींपेक्षा नेक्स कार १९ च्या सुरक्षा बाजू उत्तम आहेत, अशी पुष्टी जोडण्यास नताशा केकरे विसरलेल्या नाहीत.
याचा अर्थ, ही नवी उपचारपद्धती अधिक दर्जेदार, अधिक सक्षम आहे, यासंबंधातले उत्पादनही दर्जेदार आहे. हा मुख्यतः वैद्यक आणि वैज्ञानिकांच्या अनेक वर्षांच्या अथक परीश्रमाचा, रुग्णांना उत्तमोत्तम सेवा मिळावी यासाठी नवनवे शिकत राहण्याच्या संशोधकांच्या अभ्यासूवृत्तीचा परिणाम आहे, हेही त्यांना इथे आवर्जून नमूद करायचे आहे.
परिस्थितीवर स्वार
या ‘कार१९’ उपचारपद्धतीचे लौकरात लौकर मानवीकरण होणे याचा अर्थ, ती अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचणे यातच पद्धतीची सुरक्षा बाजू मजबूत होण्याचे मर्म दडले आहे, अशी प्रतिक्रिया आयआयटी-बॉम्बे इथे कार्यरत आणि इम्युनो अॅक्टचे संस्थापक राहुल परवर यांनी दिली आहे. मात्र इतरांचे म्हणणे आहे की, अजूनही बरेच दुवे जोडणे बाकी आहेत. त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे.
ही उपचारपद्धती वरदान खरी परंतु, अजूनही याची किंमत, ज्यांची वार्षिक मिळकत जेमतेम २ लाख ८ हजार म्हणजेच महिना १७ हजारांच्या आसपास मामुली आहे, अशा सर्वसामान्य भारतीय रुग्णांना परवडणारी नाही. मात्र, आता जी किमत आहे, त्याहून ती कमी होण्याच्या आशा उपचारपद्धतीच्या निर्मात्यांना नक्कीच आहेत. मुळात, या उपचारांची किमत वाजवी राहावी, याच प्रमुख उद्देशाने निर्मात्यांनी तुलनेने स्वस्त श्रममूल्य असलेल्या भारतातच ती विकसित केली, परीक्षिली केली आणि अंतिमतः निर्मिलीदेखील आहे.
एरवी, टी सेल्समध्ये कार सेलचा समावेश करण्यासाठी संशोधक सर्वसाधारणपणे उपलब्ध होण्यास अत्यंत महागड्या अशा लेंटिव्हायसेसचा वापर करतात. उदाहरणार्थ अमेरिकेत जर ५० जणांच्या ट्रायलसाठी लेन्टिव्हायसेस विकत घ्यायचे म्हटल्यास त्याचीच किंमत ८ लाख डॉलर्स इतकी प्रचंड असते, असे निरीक्षण अमेरिकी इम्युनॉजिस्ट स्टिव्हन हायफिल नोंदवतात. ते बेथेस्डा इथल्या यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ क्लिनिकल सेंटरमध्ये कार्यरत आहेत. हायफिल हे असे संशोधक आहेत, ज्यांनी इम्युनोअॅक्ट कंपनीला वेळोवेळी मोलाचा सल्ला दिला आहे. या सगळ्या संशोधकांच्या पाठिंब्यामुळेच इम्युनोअॅक्ट मधल्या वैज्ञानिकांनी स्वतःहून कर्करोग उपचारांना नवी दिशा देणारे हे जनुकीय प्रारुप आकारास आणले आहे. भारतीय टीमने उपचारांसाठी आवश्यक त्या जनुकीय पेशी घाऊक प्रमाणात निर्माण करण्यासाठी परदेशातून महागडी यंत्रे मागवण्यापेक्षा स्वतःहून चतुरस्रपणा दाखवत मार्ग शोधून काढले, हादेखील पैलू मला महत्त्वाचा वाटतो, असे हायफिल यांनी कौतुकाने म्हटले आहे.
भारतीय उपचार पद्धतीतल्या विकसित होत जाणाऱ्या सुरक्षा बाजूंमुळे एफडीए मान्यता असलेल्या पद्धतींच्या तुलनेत किंमत नक्कीच कमी होत जाणार आहे, याचा एक अर्थ, गरजू रुग्णांना यापुढे इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये अधिक काळ घालवण्याची आवश्यकता उरणार नाही, असा आशावाद नेक्स कार१९ चे प्रणेते परवर यांनी बोलून दाखवला आहे. इतकेच नव्हे, तर ही उपचारपद्धती मेक्सिकोला निर्यात करण्याचा, तसेच मल्टिपल मायलोमा नावाच्या कर्करोगावरही नवी उपचारपद्धती विकसित करण्याचा इम्युनो अॅक्टचा पुढचा इरादा आहे, हेही सांगायला ते विसरलेले नाहीत.
स्पर्धेचा तुल्यबळ अवकाश
हा भारत आहे, क्षेत्र कुठचेही असो स्पर्धा अपरिहार्य आहे. कर्कविज्ञानाचे देखील क्षेत्र यास अपवाद नाही. म्हणजेच आतापासूनच इम्युनो अॅक्टला देशात स्पर्धेला तोंड देणे भाग पडले आहे. या घडीला अनेक भारतीय कंपन्यांनी स्थानिक पातळीवर कार-टी ट्रायल्स घेण्यास सुरुवातही केली आहे. त्यात एक नाव बंगळुरूस्थित इम्युनिल थेरप्युटिक्सचेही आहे. या कंपनीकडे स्पॅनिश संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा परवाना आहे. याचा दुसरा अर्थ, डॉक्टर आणि रुग्णांना यापुढच्या काळात अधिक पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. अंतिमतः अधिक पर्याय आणि उत्तम दर्जा हेच तर कर्करोगविरोधी लढ्याचे इंगित असणार आहे.
(प्रस्तुत लेख २८ मार्च २०२४ रोजीच्या ‘नेचर’ मासिकाच्या खंड ६२७ मध्ये प्रकाशित झाला. त्या लेखाचा हा स्वैर अनुवाद आहे.)