कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, शुक्रवारी, ता. ८ सांगली जिल्ह्यातील शिराळा, सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली शहर आणि इचलकरंजी येथे त्यांच्या सभा होणार आहेत. शहा यांच्या सभा यशस्वी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असून, पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. महायुतीने मंगळवारी कोल्हापुरात प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केला होता. महायुतीने यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या सभा होणार असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी दक्षिण महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. गुरुवारी रात्री अमित शहा यांचे दिल्लीहून कोल्हापूरला आगमन झाले. रात्री ते कोल्हापुरात मुक्कामाला होते. शुक्रवारी कोल्हापूर विमानतळावरून खास हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. शिराळ्याच्या विश्वासराव नाईक महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सकाळी साडेअकरा वाजता सभा होणार आहे.
शिराळ्यातील सभा संपवून शहा हेलिकॉप्टरने कराड येथे जाणार आहेत. कराड दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ दुपारी एक वाजता आदर्श विद्यालय, विंग येथील मैदानावर सभा होणार आहे. या सभेनंतर ते हेलिकॉप्टरने सांगलीला रवाना होणार आहेत. सांगलीतील कवलापूर येथे येणार आहेत. दुपारी तीन वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर शहा यांची भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ आणि मंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहेत. सांगलीतील सभा संपवून हेलिकॉप्टरने हुपरीतील जवाहर साखर कारखाना स्थळी येणार आहेत. कारखाना साइटवरून ते इचलकरंजीला वाहनाने जाणार आहेत दुपारी साडेचार वाजता घोरपडे चौक मैदानात त्यांची भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. ही सभा संपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने उजळाईवाडी विमानतळावर येणार आहेत. तिथून ते खास विमानाने सायंकाळी सहा वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत.