Home » Blog » आर. आर. पाटील यांच्याबाबत ते वक्तव्य औचित्यपूर्ण नव्हते

आर. आर. पाटील यांच्याबाबत ते वक्तव्य औचित्यपूर्ण नव्हते

अजितदादा पवार यांचे स्पष्टीकरण 

by प्रतिनिधी
0 comments
ajit pawar file photo

– विजय चोरमारे

मुंबई : 

तासगावमधील एका कार्यक्रमात दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. `महाराष्ट्र दिनमान`ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यासंदर्भात विचारले असता अजितदादा म्हणाले, आर. आर. पाटील यांच्याशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पंचवीस वर्षे आम्ही सोबत काम केले. एकमेकांना साथ दिली. तासगावच्या परवाच्या कार्यक्रमात त्यांच्यासंदर्भात मी काही बोललो, मला नंतर असं वाटलं की त्याठिकाणी ते बोलायला नको होतं. तिथं ते बोलणं औचित्यपूर्ण नव्हतं.

`लोकसभा निवडणुकीवेळी जे वातावरण होते ते आता पूर्ण बदलले असून सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे महायुतीच्या बाजूने वारे वाहू लागले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वासही अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात अजित पवार यांनी `महाराष्ट्र दिनमान`ला विशेष मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सध्याचे राजकारण, निवडणुकीतील आव्हाने, मधल्या काळात निर्माण झालेले अनेक प्रश्न तसेच बारामतीच्या लढतीसंदर्भातील प्रश्नांवर सविस्तर उत्तरे दिली.

अजितदादा पवार म्हणाले, लोकसभेच्यावेळचं वातावरण आता राहिलेलं नाही. यंदा सुदैवानं पाऊसकाळ चांगला झालाय. पण काही ठिकाणी नुकसानपण झालंय. पिकविम्याचे पैसेपण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. इतरही काही निर्णय आम्ही घेतले. तीन, पाच, साडेसात मोटारची वीजमाफी… दुधाला एक तारखेपासून सात रुपये अनुदान चाललंय.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली. गेल्या ३५ वर्षांमध्ये मी अनेक निवडणुका पाहिल्या, त्यापेक्षा एक वेगळा आगळा अशा प्रकारचा उत्साह महिलांच्यामध्ये दिसतोय,. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान मला पाहायला मिळालं.

लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने `अबकी बार चारसौ पार` वगैरे गोष्टी झाल्या, त्याचा फटका बसल्याचे सांगून अजितदादा म्हणाले, त्यावेळी एक वेगळे नरेटिव्ह सेट करण्यात आले. संविधान बदलणार, आरक्षण काढणार, वगैरे. आमच्यातील काही लोकांनी मुस्लिम समाजाला वेदना होतील अशा प्रकारची काही वक्तव्यं केली. त्यामुळं तोही वर्ग दुखावला. ती परिस्थिती आता कुठं दिसत नाही. कारण, ती निवडणूक झाल्यानंतर महायुतीच्या सरकारच्या मार्फत देत असताना त्याच्यात फार विचारपूर्वक या योजना दिल्या. आणि आजतरी जे काही वातावरण आम्ही पाहतोय, त्याच्यात आम्ही आमच्यामध्ये कमीत कमी नाराजी होऊ न देण्याचा प्रयत्न केलेला आहे.  बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला. अशा सगळ्या गोष्टी पाहाता आम्हाला म्हणजे महायुतीला पूर्ण बहुमत मिळण्याच्याकरीता कुठली अडचण येईल, असं मला अजिबात वाटत नाही. 

प्रश्नः आतापर्यंत कर्तव्य कठोर अर्थमंत्री अशी तुमची ओळख आहे. आपल्याकडे खर्चाला पैसा किती आहे आणि खर्च किती करायचा याचं भान ठेवणारे अर्थमंत्री, म्हणून तुम्हाला ओळखले जाते. विरोधकांच्याकडून टीका होते की, तुमच्या योजना महाराष्ट्राला झेपणा-या नाहीत. तुम्ही काय सांगाल ? 

अजित पवारः आपलं राज्य आर्थिक बाबतीमध्ये सक्षम आहे. साडेसहा लाख कोटींचा अर्थसंकल्प मी सादर केला. दरवर्षी दहा टक्क्यांनी साधारण वाढ होते. पुढचा अर्थसंकल्प सात लाख कोटींचा असेल. तो असताना आपण त्याकडे साधारण पगारावर, पेन्शनवर घेतलेल्या कर्जाचे व्याज, त्या त्या वेळेस जावं लागतं. या सगळ्याला साधारण तीनेक लाख कोटी रुपये आरामात लागतील. तेवढीच रक्कम ही विकासाच्या करीता, आपल्या योजना राबवण्याच्या करता, आपल्याकडं चालू असलेली कामं, जलसंपदा विभाग, पीडब्ल्यूडी विभाग, हे असे जे वेगवेगळे महत्त्वाचे विभाग आहेत, त्या – त्या विभागालापण कुठे अडचण येऊ नये. विकास जर त्यांना फिल्डवर दिसला नाही तर त्याचे दुःष्परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून या सगळ्याचा साकल्याने विचार करून आम्ही योजना राबवतोय. तुम्हाला एकंदरीत केंद्र सरकारने घालून दिलेली जी चौकट आहे, त्याच्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही. एकंदरीत तुमचं जे काही उत्पन्न आहे, ते समजा ४२-४३ लाख कोटी आहे आणि त्याच्यामध्ये कितीपर्यंत तुम्हाला जाता येतं, किती टक्क्यांपर्यंत तुम्ही जाऊ शकता, इथं किती टक्क्यापर्यंत तुम्ही लोन काढू शकता, या सगळ्याच्या चौकटीत आपण आज आहोत. त्यापेक्षा जास्त तुम्हाला करताच येत नाही. आम्ही त्या सगळ्याचं तारतम्य ठेवलेलं आहे आणि हे तारतम्य ठेवत असताना सात लाख कोटींमध्ये तुम्ही बचत केली, पाच टक्के बचत करायला तुम्ही यशस्वी झाला तर ३५ हजार कोटी वाचतात. आणि केंद्र सरकार आज आमच्या विचाराचं आहे. त्याच्यावर केंद्राकडूनदेखील आम्ही हक्काने काही अधिकचा निधी मागू शकतो, जसा चंद्रबाबू नायडूंनी कालच्या अर्थसंकल्पामध्ये मिळवला. नितीश कुमार यांना मिळाला तसा, आम्हाला विश्वास आहे आम्हालादेखील मिळेल. कारण केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे.

प्रश्नः लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर, तुम्ही तिघे भाऊ देवाभाऊ, अजितदादा, मुख्यमंत्री भाऊ असे श्रेय घेणअयाचा प्रयत्न करताना दिसता..

अजित पवार : नाही, नाही. सगळ्यांना माहिती आहे, आम्ही तिघांनी मिळून योजना आणली. कुठली योजना मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणतो, त्यावेळेस ती फाईल देवेंद्रांकडंपण जाती, ती सीएमकडेपण जाते. ते त्या ठिकाणी बघतात, चर्चा होते आणि योजना होते. आता पहिल्यांदा मी माझ्या जनसन्मान यात्रेच्यानिमित्ताने निघालो. एक वेगळ्या पद्धतीने त्याचं वातावरण आम्ही केलं. मग ह्यांनी सांगितलं की आपण सरकारच्यातर्फे जाऊया. आम्ही सरकारच्यातर्फे गेलो, जिल्हा निहाय. अनेक जिल्ह्यांत गेलो आणि आम्ही तिघांनी भाषण करून सांगितलं की कशा पद्धतीची योजना आहे आणि हे तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला महायुतीचे सरकार पुन्हा आणावं लागेल, तर तुम्हाला घड्याळ जिथे चिन्ह असेल तिथे घड्याळ, जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण आणि जिथे कमळ असेल, तिथं कमळ असंतुम्हाला बटन दाबावं लागेल, असं आम्ही स्पष्टपणे सांगितलं आम्ही. ताकाला जायचं आणि भांड लपवायचं अशा प्रकारची माझी प्रवृत्ती नाही. आणि या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी केलं आणि ती योजना लोकप्रिय झाली. ज्या महिलांना असे कधी पैसे, त्यांच्या स्वतःच्या मर्जीमध्ये जे काही त्यांच्या मनात येतं, ते कधीच घेण्याचे धारिष्ट्य त्यांना दाखवता आलं नाही, ते आता त्यांना दाखवता येतं, त्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. नंतर आता फिरताना कधी-कधी त्यांनी मी माझी भूमिका मांडतो, ते त्यांची भूमिका मांडतात. प्रत्येकजण आपापल्या परीने हे करतो. पण महायुती म्हणूनच ते त्या ठिकाणी करतोय. यात श्रेयवादाचा प्रश्न नाही.

शिव, शाहू, फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही

प्रश्नः आतापर्यंत जे सर्व्हे आतापर्यंत येताहेत, त्या सर्व्हेमध्ये महायुती थोडी पाठीमागे असल्याची स्थिती दिसतेय…

अजित पवारः  सर्व्हे आपण हरयाणाचा बघितला. सगळ्यांचे सर्व्हे टोटली वेगळे होते. आणि नंतर निकाल लागल्यानंतर सगळे अवाक झाले. ही फॅक्ट आहे. मी नंतर त्यांच्या शपथविधीला, सैनी म्हणून मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या शपथविधीस गेलो त्यावेळेस मी त्यांना विचारलं की काय केलं? कारण शेवटच्या सहा खट्टरांना काढून त्यांना मुख्यमंत्री केलं होतं. त्यांनी जनतेशी संपर्क ठेवला. लोकांना ते भेटायचे. तिथं जाट कम्युनिटी, आपल्याला जशी मराठा कम्युनिटी स्ट्राँग आहे, तशी जाट कम्युनिटी स्ट्राँग आहे. त्यांचाही आदर त्यांनी केला. परंतु त्याचबरोबर एससी, ओबीसी या सगळ्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं. आज तुम्ही पाहा. मी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, मी विकासाच्या करीता सरकारमध्ये गेलेलो आहे. मी शिव, शाहू, फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आणि तुम्ही बघा ना या दीड वर्षामध्ये आम्ही जे काही निर्णय घेतलेत, त्याच्यामध्ये मायनॉरिटी, ओबीसी अशा सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. आणि त्याच्यामुळं आम्ही करताना कुठलाही जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार केलेला नाही. आणि जातीय सलोखा राहून  या राज्याचं भलं व्हावं असा विचार केला. केंद्राचं सरकार साडेचार वर्षे तिथं थांबणार आहे, तिथनं मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजनांच्याकरीता निधी मिळावा आणि त्यांचं सहकार्य व्हावं ही आमची भावना. आम्ही कांदा निर्यातबंदी उठवली. कांदा उत्पादक शेतकरी, आमचा सोलापूर, पुणे, सातारा, नगर, नाशिक हा जो बेल्ट आहे, इथले लोक समाधानी आहेत. या सगळ्या फॅक्ट नाकारता येत नाहीत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता इथून पुढं बोलताना पण आम्ही तारतम्य ठेवलं पाहिजे. कुठंही समोरच्यांच्या एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या नेत्याबद्दल, समाजामध्ये आदराचं स्थान असताना त्यांना काहीतरी वेगळं बोलून, त्यांच्या पाठिराख्यांना, त्यांना समर्थन देणाऱ्यांच्या भावना दुखावता कामा नये. मी जनसन्मान यात्रा सुरू केल्यापासून आजपर्यंत मी कधी, कोणावर टीका केलेली  नाही. त्या प्रकारे आम्ही पुढं चाललोय. 

लाडकी बहीण योजना

प्रश्नः तुम्ही अर्थसंकल्प मांडलात. त्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, त्या योजनेची अंमलबजावणी केली. त्या योजनेनंतर तुमच्या पक्षाचा एकूण रंग गुलाबी झाला, या योजनेची कल्पना आणि अंमलबजावणी… याची सुरुवात कशी झालीय़

अजित पवारः मी ज्यावेळेस सरकारमध्ये काम करत असतो, जेवढ्यास तेवढं बोलत असतो. परंतु मला तुमच्या वेगवेगळ्या जशा कमिट्या असतात, जशा जीएसटी काउन्सिल आहे किंवा दिल्लीला काही कामाच्या निमित्तानं जाता येतं, किंवा माझे काही विश्वासू अधिकारी… मी आता खूप वर्षे काम करतो, तुम्ही मंत्रालयातपण बघा, माझ्यावरपण मनापासून साथ देणारे अधिकारी आहेत,  मी अधिकाऱ्यांनापण रिस्पेक्ट देऊन त्याठिकाणी हे करतो. हे डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे, आपल्याला हे काम करायचंय. कसं करायचं, कसं बसवायचं हे तुमचं काम आहे. पण आपल्याला चौकटीत बसवून ते द्या. अधिकारी त्या पद्धतीनं करतात. अजिबातच बसत नसेल, तर सांगतात…. दादा हे काही बसणार नाही. मला तुम्ही आग्रह करू नका. सरळ सोडून द्या. चला पुढचा विषय. अशा पद्धतीनं माझी कामाची पद्धत आहे. हे सगळं करताना… मी जरा आंध्र प्रदेशमध्ये काय चाललंय, तिकडं तामिळनाडूत कुठली योजना चाललीय, इकडं केजरीवाल साहेबांनी काय केलंय, इकडं ममता बॅनर्जींनी काय केलंय, योगी आदित्यनाथ यांनी काय केलंय, मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहानांनी काय केलंय असं साधारण बघत असतो. त्याच्यातून बऱ्याच जणांशी चर्चा करून, चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं  की ही योजना चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. ही मध्य प्रदेशमध्ये पॉप्युलर झाली. मध्य प्रदेशमध्ये त्या योजनेने… तिथंही कुणाच्या ध्यानी मनी नसताना, मध्य प्रदेशमध्ये ते भाजपचं सरकार पुन्हा आलं. त्यामुळं योजना चांगली आहे, एक गरीब घटकाला आहे, सगळ्या जाती-धर्माला आहे. भेदभाव कुणाचा नाही. लाभ देतानापण, तुम्ही ठराविकच घटकच डोळ्यासमोर ठेऊन लाभ दिला तर बाकीचापण गरीब वर्ग म्हणतो, अरे आम्ही त्या समाजात नाही, म्हणून आम्हाला नाही ? आणि ते त्या समाजात आहे, म्हणून त्यांना आहे ? हे मी होऊन दिलं नाही. तुम्ही ४४ लाख शेतकऱ्यांना वीजमाफी देत असताना… ३, ५, साडेसात… सगळ्या समाजाचे शेतकरी आले. असे दोन कोटी तीस लाख महिलांना देत असताना, सगळ्या महिला त्याच्यात आल्या. मग आम्ही काहीजणांना विश्वासात घेतलं. आमचं आयटीचं क्षेत्र आहे, त्या सचिवांना, आमच्या महिला बालविकासच्या सचिवांना, मंत्रीमहोदय आदिती तटकरेंना. की आपल्याला हे करायचंय. आणि हे सगळं करत असताना कशा पद्धतीनं करायचं, कसं लिंकअप करायचं, कसं आधारकार्डशी हे जोडायचं, आणि याच्यातून लिकेजेस राहता कामा नयेत याबद्दलची सगळी काळजी आम्ही घेतली आणि आणि तुम्ही पहा पाच जुलैपासून लगेचच पैसे आम्ही सुरू केले. त्यांनी आरोप केले हे बंद पडेल. कोर्टात गेले. काय काय केलं. परंतु त्याला आम्ही फार महत्त्व दिलं नाही. त्यांच्या अकाउंटला पैसे जुलै, ऑगस्टचे दिले. सप्टेंबरचे दिले. आचारसंहितेच्या अगोदरच ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. त्यामुळे महिलांना त्यांचे पैसे मिळायला लागले. डायरेक्ट डीबीटी. बँक अकाउंटला गेले आणि या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एक त्यांच्यात समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं. आणि ज्या दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी चूल पेटते अशी महिला तर जास्त समाधानी झाली. राज्य सरकारच्यावतीने सीएम आणि दोन्ही डीसीएमनी जाऊन कार्यक्रम घेतलेले आहेत. प्रचंड मोठी गर्दी आणि काही ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं गेलो. त्यालाही मला प्रतिसाद चांगला मिळाला. 

एकनाथ शिंदेंशी संघर्ष नाही

प्रश्न – तुम्ही महायुतीच उशिरा आल्यामुळे तुमच्या पक्षावर काही अन्याय होतोय, असं तुम्हाला वाटतं का ? लोकसभेला ठीक आहे. तुम्हाला चार जागा मिळाल्या. विधानसभेला एकनाथ शिंदेंच्या आणि तुमच्या आमदारांची संख्या तेवढीच असतानासुद्धा त्यांना मिळालेल्या जागा जास्त आहेत… 

अजित पवारः असं मला काही वाटत नाही. जागा घेत असताना साधारण निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या जादा मी घेतल्या. फापट पसारा वाढवत बसायचा नाही. जिथं भांडून जागा जास्ती घ्यायच्या आणि नंतर तिथं तुमच्याकडं तेवढ्या ताकदीचा, तोलामोलाचा उमेदवार नाही. आज कितीतरी जणांनी जागा घेतली, पण उमेदवार आयात केले. त्यांच्याकडच्या पक्षाकडे उमेदवार नाही,  सगळ्यांची नाव घेऊन सांगू शकतो. पण मला काही कोणाला उघडं पाडायचं नाही.

प्रश्नः तुमचा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही संघर्ष असल्याचे चित्र अधून-मधून समोर येत आहे.

अजित पवारः कारण नसताना तशा प्रकारच्या, काही वेळेला बातम्या आल्या. वास्तविक काही नाही, त्यांनाही माहीत आहे, अजित पवारलाही माहीत आहे आणि देवेंद्रजींनापण माहीत आहे, की आपण एकोपा टिकवला तरच आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्टस् दाखवता येणार आहेत. आणि म्हणून आम्ही तशा पद्धतीनेच पुढे चाललेलो आहोत.

प्रश्न – देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमची फार चांगली केमिस्ट्री जुळते, असं वेळोवेळी दिसून आलेलं आहे तशी एकनाथ शिंदेंशी नाही दिसत जुळताना ?

अजित पवारः असं काही नाहीये. शेवटी काम करत असताना आपण आपलं काम करत राहायचं आणि त्याच्यातून कसं महाराष्ट्रातल्या जनतेला समाधानी करता येईल, याबद्दलचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करायचा. मी कुठलीही गोष्ट करताना उगीचच ज्याच्यातून आपल्या राज्याचे नुकसान होईल, ज्याच्यातून आर्थिक शिस्त बिघडेल, अशा भानगडी मी काही करत बसत नाही. त्याच्यामुळं कधी कधी तुम्हाला पेपरला वाचायलाही मिळत असेल की या योजनेच्या संदर्भात अर्थ विभागाने अशी अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली. कारण मी लाँग टर्मचा विचार करून पुढे जात असतो.  औट घटकेचा विचार करून उद्याच्याला आपल्या राज्याचं नुकसान करण्याचा अधिकार हा जनतेने आपल्याला दिलेला नाही, ही माझी त्याच्यामागची भावना असते.

काळाबरोबर राहण्यासाठी ब्रँडिंग

प्रश्न – अजितदादा पवार हा एक स्वतंत्र ब्रँड म्हणून गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखला जातो. पण हा एक स्वतंत्र ब्रँड असताना या ब्रँडला पुन्हा ब्रॅण्डिंगची गरज का वाटली अलीकडच्या काळात ?

उत्तरः मागच्या काळात मीडियाच्यापासून चार हात लांब राहायचो. त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस… आम्ही सगळे एकत्र होतो.  त्या त्या त्यावेळेस ती जबाबदारी काही पक्षांमध्ये मी कुठली घ्यायचो कुणाशी घ्यायचो, काय बोलायचो तुम्हाला माहित आहे. कोणाला वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना आणायचो, त्यांना तिकीट द्यायचो… वगैरे वगैरे. आता तेव्हा पवारसाहेब तिथे प्रमुख होते, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करायचो. आज आता ४४ आमदारांनी, मेजॉरिटी आमदारांनी आणि बाहेरच्या पण राज्यातल्या बहुतेक आमदारांनी मला तिथं बसवलं. तिथं बसवल्यानंतर तुमची जबाबदारी वाढते. जबाबदारी वाढल्यानंतर आज एवढी लोकं आणि बऱ्याच जिल्ह्यांचे अध्यक्ष आणि बऱ्याच जिल्ह्यातले कार्यकर्ते तुम्हाला एफिडेविट करून देतात, काही लाख आणि ते सगळं तिथं दिसतं चित्र, ते बघितल्यानंतर आपल्याला नेहमीसारखं काम करून चालत नाही. तुम्हाला एक स्वतःचं, एक वेगळ्या प्रकारचं, इमेज तयार करावी लागते की जी पाहिल्यानंतर, समाजातल्या घटकालाही ती पटली पाहिजे आणि तुमच्या कार्यकर्त्यांलाही पटली पाहिजे. आता मार्केटमध्ये सगळेच राजकीय पक्ष त्या गोष्टीचा उपयोग करून घ्यायला लागलेत. काहींचा बोभाटा होतो, काहींचा न बोभाटा होता काम चालतं.

प्रश्नः पण ते जे आधीचे मोकळे ढाकळे अजितदादा झब्बा-विजारीतले, ते गुलाबी जॅकेटात गुदमरल्यासारखं वगैरे काही वाटतं का ?

उत्तरः  नाही. अजिबात नाही. आता तुमच्या इथे पांढरेच कपडे घालून बसलोय. तसं काय नाही ते गुलाबी… गुलाबी. ते गुलाबी जॅकेट नाहीच आहे. जांभळ. जांभळ जे असतं, ते खाल्ल्यानंतर बियांचा जो रंग असतो, बीचा तशा प्रकारचं ते आहे. आणि मला अनेकजण म्हणतात की दादा ते तुमच्या अंगाला शोभून दिसतं. शेवटी कसं असतं, कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य माणूस, एखाद्या व्यक्तीकडे बघत असताना त्या लीडरला बघितल्यानंतर, त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये त्या लीडरबद्दल एक आपलेपणाची भावनापण निर्माण व्हायला पाहिजे. अलीकडं सोशल मीडिया इतका अॅक्टिव्ह झालाय. लगेच काहीतरी ट्रोल करायला सुरुवात करतात आणि आपल्याला ते होऊन द्यायचं नाहीये, ही माझी भावना आहे.

प्रश्नः आपण एखाद्या पक्षाचा प्रमुख असणे. सर्वोच्च नेते असणे आणि मग आपण एखाद्या पक्षात दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर असणे, यातला फरक तुम्हाला काय जाणवतो ? 

उत्तरः यामध्ये तुम्हाला तिथे काम करत असताना फार तोलून-मापून बोलावं लागतं. इतर वेळेस तुम्ही बोललात तर तुम्हाला बाकीची खालची टीम सावरायला असते. तसं मी बोलताना मला पुन्हा सावरण्याचं काम कोणी करू शकत नाही. त्यामुळं मला फार जबाबदारीचं भान ठेवूनच बोलावं लागतं. आणि बोलत असताना फार सिन्सियर, अगदी गंभीर चेहरा करून बोललं तर ते लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळं जरा हसत खेळत. मुलाखतपण झाली, सभा झाली तर त्याच्यातून एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. 

प्रश्नः तुम्ही महायुतीत आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्यासोबत आहे. तुमचं फडणवीसांशी म्हणजे देवेंद्र फडणवीसांशी चांगलं ट्युनिंग आहेच. पण त्याव्यतिरिक्त अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यापैकी कोणाशी तुमचं अधिक चांगलं ट्युनिंग आहे  ?

उत्तरः त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्याबरोबरपण आमचे अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने संबंध येतात. मिटींगच्या निमित्ताने येतात. पीएम साहेबांचं व्हिजन काय आहे, ते कळतं. पण आम्हाला जास्त संबंध येतो ते अमितभाईंचा. अमितभाईंचा स्वभाव असा आहे की जर एखादी गोष्ट हातामध्ये घेतली तर ती तडीस नेण्याची. उगीच मध्येच घोळत ठेवायचं नाही. आणि त्याच्यामुळं माझाही स्वभाव थोडाबहुत तसाच आहे. याकरिता आम्ही त्यांच्याशी बोलतो, ते आमच्याशी बोलतात आणि त्याच्यातून आम्ही पुढे जातो.

प्रश्नः काही महिन्यांपूर्वी तुम्हाला राष्ट्रीय राजकारणात रस नाही, असं तुम्ही म्हणायचात. आता तो रस निर्माण व्हायला लागलाय?

उत्तर: जबाबदारी एकदा आल्यानंतर त्या जबाबदारीतनं तुम्हाला बाजूला होता येत नाही. त्याकरिता शेवटी एवढा मोठा समाज, एवढा मोठा घटक… बरं सगळे मान्यवर लोक आहेत. म्हणजे भुजबळसाहेब, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, तुमचे हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील… किती मी मान्यवरांची नाव घेऊ की जे आज ताकदीचे, अनेक वर्षं हे राजकारणात. त्यांच्यासोबत काम करताना राष्ट्रीय राजकारणही आता परकं वाटत नाही.

प्रश्न : भारतीय जनता पक्षासंदर्भात असं म्हणतात की, भारतीय जनता पक्ष ज्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेतो, तो त्यांना संपवतो. आता तर अमित शहांनी २०२९ साली भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्तेत आणायची घोषणा केलीय. अशा परिस्थितीत तुम्हाला आता या तुमच्या स्वतंत्र पक्षाचं भवितव्य काय दिसतं ?

उत्तरः प्रत्येक पक्षाला, काँग्रेसलाही वाटतं… आपल्या एकट्याच्या ताकदीवर सरकार यावं. तसं भाजपलाही वाटतं. तसं इतरांनाही वाटतं. वाटण्यात काय चूक काय आहे ? उद्या मलाही वाटतं की माझा पक्ष ताकदीने महाराष्ट्रामध्ये पुढे यावा. पण आमच्या सगळ्यांच्या मनात कितीही असलं तरी आम्ही जोपर्यंत जनतेच्या मनात उतरून, जनतेला आम्हा लोकांच्याबद्दल एक विश्वास… की नाही राज्याचा गाडा ही लोकं पुढं मजबुतीने नेऊ शकतात, हा एक कॉन्फिडन्स असतो, तो त्यांच्यात निर्माण करण्याच्याकरिता प्रत्येक जण प्रयत्न करतच असतो. तसा मी पण करतो.

चर्चा होईल असं काही बोलणार नाही

प्रश्नः भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची काही शक्यता दिसते का या टप्प्यावर तुम्हाला ?

उत्तर : आमची भूमिका आम्ही लोकांच्यासमोर मांडली. आता निवडणुकीच्या वेळेस याच्याबद्दल काही उत्तर दिलं तर त्यातून वेगळे गैरसमज निर्माण होतात. अजित पवारांच्या मनात असं आहे… अजित पवारांच्या मनात तसं आहे… मी ठरवलेलं आहे, काही झालं तरी आपण प्रेस कॉन्फरन्स घेत असताना, मुलाखती देत असताना, त्याच्यातून उत्तर देताना काही नवीन प्रसंग उद्भवतील, समस्या उद्भवतील, असं मला होऊनच द्यायचं नाही.

प्रश्नः पण आता गुलाबी जॅकेटातले दादा शरद पवारांच्या पक्षाच्या विरोधात ताकदीने मैदानात उतरलेत. का तर तुमच्या दोघांचा सामना अधिक ठिकाणी आहे आणि त्यासाठी अगदी भारतीय जनता पक्षाची लोकं… इस्लामपूरचे उदाहरण असेल, तासगावचे उदाहरण असेल… हे आपल्या चिन्हावर घेऊन तिथे ताकद लावली आहे.

उत्तरः ज्यावेळी राष्ट्रवादीच्या हा एक प्रसंग घडला, त्यावेळेस जयंतराव पाटलांनी सांगितलेलं होतं की आम्ही हे आता गेलेले आहेत, काही आम्हाला शब्द वापरले… याच्यातला कोणीही परत आम्ही घेणार नाही. आणि आमच्यातल्यापण बहुतेकांना, चार-दोन सोडले तर ते फोन करायचे, तुम्ही इकडे या… तुम्ही इकडे या… तुला इकडे आम्ही संधी देतो. तिकडे थांबू नका. म्हणजे मग एकीकडे तुम्ही बोलताय, कृती करताय दुसरी. असं नाही ना चालत. तुम्ही जे काही आहे ते तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं पाहिजे. आम्हीदेखील काम करत असताना, आम्ही हेच बघतो. बरेचसे राजकीय पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघतात आणि एक-एक जागा महत्त्वाची असते. शेवटी जागा ताकदीने निवडून आणणारी कोण व्यक्ती आहे, त्याला झुकतं माप मिळतंच.  

आर.आर. पाटील यांच्याशी चांगले संबंध

प्रश्न – तुम्ही आणि आर. आर. पाटलांनी साधारण २४ वर्षे तुम्ही एकत्रित काम केलं. काय, कसे संबंध होते तुमचे आणि आर. आर. पाटलांचे ?

उत्तरः एकदम चांगले होते. आर. आर.ला एका सर्वसामान्य कुटुंबातनं पुढे आलेल्या, आर. आर. पाटील यांच्याबद्दल… वक्तृत्व होतं, कर्तृत्व होतं. सगळे काही गुण होते. ते गुण असल्यामुळे मीपण त्यांना मनापासून त्या ठिकाणी साथ दिली. त्यांनीपण मनापासून मला सगळ्या गोष्टीचं सहकार्य केलं. आमचं ट्युनिंग जमलेलं होतं. आमचं अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी जमलेलं होतं. ते अनेकदा पार्टीचे अध्यक्ष असायचे. आम्ही लोक त्यांना पार्टीचे अध्यक्ष करायचो… एवढं केल्यानंतर ते माझा रिस्पेक्ट ठेवायचे, मी त्यांचा रिस्पेक्ट ठेवायचो. कधी अशा पद्धतीने आमच्यामध्ये दुरावा कधीच झाला नाही, ही फॅक्ट आहे. ही कोणी नाकारू शकत नाही. २००४ ला त्यांना उपमुख्यमंत्री करायला मीच पुढाकार घेतला होता.

प्रश्नः नवाब मलिक यांच्यासंदर्भात… हे कसं काय ताणलं गेलं आणि हे पुन्हा कसं तुम्ही ते कसं अधिकृत उमेदवारीपर्यंत आणलं. भारतीय जनता पक्षाचा इतका सगळा विरोध असताना…

उत्तरः  त्याबद्दल जे काही प्रत्येकाची भूमिका असती, ती प्रत्येकाची भूमिका प्रत्येकजण मांडत असतो. एखाद्या गोष्टीवर, तुमच्यावर असे काही आरोप झाले ते आरोप सिद्ध न होता, तुम्हाला त्याची किंमत मोजायला लावायची, हे आमच्यासारख्याला पटत नाही. आम्हीपण तुमच्याबरोबर ९० पासून काम करतोय. समजा आणि ९० पासून काम करत असताना एकदम २०१४, १५, १६… मध्ये वेगळ्या पद्धतीचे आरोप त्या ठिकाणी झाले आणि त्याच्यातून तुम्हाला गोवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तुम्हाला जवळून ओळखतो ना. आज एकदम कुठलं तरी ९० चं,  ९२ चं प्रकरण त्या ठिकाणी काढायचं आणि यांनी असं केलं, यांनी तसं केलं… शेवटी माणसाला एक वेगळी प्रतिमा करण्याच्या करता, अनेक वर्षं कष्ट करावे लागतात. प्रयत्न करावे लागतात. लोकांचा पाठिंबा मिळवावा लागतो. पण, एखाद्या वेगळ्या प्रकारे लोक उल्लेख करून… त्यांची बदनामी व्हायला..

बारामतीच्या लढतीबद्दल…

प्रश्नः तुम्ही बारामतीच्या लढतीकडे कसं बघता आता.

उत्तर : मी पहिल्यापासूनच कार्यकर्त्यांना सांगत असतो, कसल्याही प्रकारची निवडणूक असली तर समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे, हे समजूनच आपण आपलं काम केलं पाहिजे. आपण मतदारांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मतदारांना कुठे नाराजी असेल तर ते कन्विन्स करण्याचं काम केलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.

प्रश्नः तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांनी किंवा महाराष्ट्राने भावनाविवश झालेलं फार कमीवेळा पाहिलं आलं. त्यातला एक प्रसंग होता, बारामतीला अर्ज भरायला जातानाचा.

उत्तरः आपण सगळी माणसं आहोत, हाडामासाची. तुमचे तरुण वयामध्ये, तुमचे वडील गेलेले असतील आणि वडिलांचं आणि आईचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला त्या वेळेपासूनच काही आठवणी एकदम मनात आलेल्या असतील, तर मी काही रुमाल काढून डोळे पुसले नाहीत. मी कुठे हुंदके दिलेले नाहीत. मन भरून आलं, फॅक्ट आहे. मन भरून येताना कंठ दाटून येतो, वस्तुस्थिती आहे. पाणी मागितलं. पाणी पिलो. विषय तो तिथं थांबवला. मी पुढचा विषय सुरू केला. एवढंच माझ्याकडं त्या ठिकाणी घडलं. पण, शेवटी मला याच्यातून कुठं स्वार्थ साधायचा नव्हता. बोलण्याच्या ओघात ते होऊन गेलं आणि माझी आई… आजही आता माझ्या घरीच आहे. तिला जे काही वाटत होतं, ते मी त्या ठिकाणी बोलून दाखवलं. 

शरद पवार यांच्याबद्दल….

प्रश्न – बरं, आत्ताच्या घडीला तरी राजकारणात तुमचा रस्ता वेगळा आहे, पवार साहेबांचा रस्ता वेगळा आहे. तुम्ही दोघं दोन टोकावर आहात. अशा या टप्प्यावर पवारसाहेबांच्या संदर्भात तुमच्या मनात काय भावना आहेत ?

उत्तरः हे बघा, मी मागंही सांगितलं की आमचे वडील लवकर गेले. आमच्या घरामध्ये जे काही काका लोक होते… त्याच्यामधले एक महत्त्वाची व्यक्ती होती. आज दोन काका आमचे आहेत. एक म्हणजे पवारसाहेब आणि एक प्रतापकाका. यात वयात, सगळ्यात मोठे शरदकाका, स्वतः साहेब आहेत आणि माझी आई त्यांच्यापेक्षा मोठी आहे. इतकी वर्षे आम्ही एकत्र काम केलेले आहे. आम्ही त्यांच्या हाताखाली लहानाचे मोठे झालो. त्यांचं काम बघून आम्ही बरंच काही शिकलो आणि इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे प्रत्येकाला इतकी वर्षं तुम्ही जर सहवासात राहिला तर एक आपलेपणाची भावना त्या ठिकाणी असतेच, हे आपण नाकारू शकत नाही..

प्रश्नः म्हणजे राजकारणामुळे तुम्ही राजकीय रस्ते वेगळे झाले. मतं वेगळी झाली, पण मन दुभंगलेली नाहीत असं.

उत्तर : आता या असणाऱ्या धामधुमीमध्ये त्याबद्दल मला जास्त काही वक्तव्य करायचंच नाही. काय होतं, पुन्हा शब्दांनी शब्द वाढतो. पण, मला याच्यात कुठं, कुणालाच दुखवायचंपण नाही, नाराजपण करायचं नाही आणि नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत.

प्रश्नः शरद पवारांचं खच्चीकरण करण्यासाठी तुमचा वापर भारतीय जनता पक्षाला करून घ्यायचा असतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असते. तुम्हाला असं कधी वाटतं?

उत्तरः हे बघा, कुठलाच पक्ष कुणालाच खच्ची करू शकत नाही. प्रत्येकाच्यामध्ये कर्तृत्व, नेतृत्व सगळे काही गुण असतात. असं राजकारणात कुणी खच्ची होऊच शकत नाही, हे माझं स्वतःचं ठाम मत आहे. कोणाला खच्ची करायचं, वगैरे हे माझ्याही मनात नाही आणि मला त्या अँगलने कधी कोणी सांगितलंपण नाही. आणि तसं कोणी सांगितलं तर मी ऐकूनपण घेणार नाही. नकारात्मक राजकारण माझ्या रक्तामध्ये नाही. जे काही आहे, ते सकारात्मक आहे.

आर.आर. पाटलांसंदर्भात बोलणं औचित्यपूर्ण नव्हतं

प्रश्नः परवा तासगावच्या सभेत तुम्ही आर. आर. पाटलांच्याबद्दल एक विधान केलं की बाबा सिंचन घोटाळ्याच्या त्या फाईलसंदर्भातल्या खुल्या चौकशीच्या मागणीच्या फाईलवर आर. आर. पाटलांनी सही केली. या टप्प्यावर या परिस्थितीत हे विधान करायला पाहिजे होतं ? करायला नको होतं ? गेल्या चार दिवसात तुम्हाला त्यासंदर्भात काय जाणवलं?

उत्तरः त्या काळामध्ये ते विधान करायला नको होतं, या मताशी मी आलेलो आहे.  

प्रश्न – पण त्यावेळी बोलताना तुमचा निर्देश काय दुसरीकडे होता… बाबा की आर. आर. पाटलांच्या निमित्ताने..

उत्तरः नाही… नाही… त्या संदर्भात काय झालं की जेव्हा एखादी गोष्ट काही झाली, आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम करत असतो. मनापासून आम्ही तुम्हाला साथ दिली. मनापासून वर पाठविण्याच्या करता, जेवढा काही मागनं काही सपोर्ट द्यायला पाहिजे, तेवढा तो सगळा दिला आणि हे सगळं निस्सीम म्हणजे माझं वागणं छक्क्या पंजाच नसतं. आता तात्पुरतं बोलायचं, आणि पाठ फिरल्यावर तिसरंच काहीतरी बोलायचं. तो माझा स्वभाव नाही. मी तोंडावरही तेच बोलतो, पाठीवरही तेच बोलतो. पण बोलण्याच्या ओघात हे बरेच दिवस एक मनाला … असं हे झालं होतं. पण ती वेळ तिथे नव्हती, असं काही बोलताना. त्या काळात ते बोलायला नको होतं. मी नेहमी म्हणतो, जो माणूस काम करतो, तो चुकतो आणि बोलता बोलता ती चूक… चूक नाही म्हणता येणार ते. त्यावेळेस तिथं बोलणं औचित्यपूर्ण नव्हतं.

(ही मुलाखत  @DinmanMarathi (दिनमान मराठी) यू ट्यूब चॅनलवर पाहू शकता.)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00