Home » Blog » बंडखोरी, जरांगे फॅक्टरमुळे दोन्ही आघाड्यांना समान संधी !

बंडखोरी, जरांगे फॅक्टरमुळे दोन्ही आघाड्यांना समान संधी !

बंडखोरी, जरांगे फॅक्टरमुळे दोन्ही आघाड्यांना समान संधी !

by प्रतिनिधी
0 comments
One Nation One Election

-जमीर काझी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय हवा एका दिशेने वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वागण्या बोलण्यातील अतिआत्मविश्वास, काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीचे प्रयत्न आणि जागा वाटपात तुटेपर्यंत ताणलेल्या हटवादामुळे आघाडी बॅकफूटवर जात असल्याचे जाणवत होते. त्याउलट लोकसभेतील दारूण पराभवाचा विचार करून  महायुती सरकारने अखेरच्या दोन-तीन महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण  निर्णय घेतले, पंतप्रधानांच्या उपस्थितीत विकास प्रकल्पाची पायाभरणी, उद्घाटने  आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांचा धडाका लावला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि सर्व स्तरातील जनतेपर्यंत त्याची माहिती पोहोचावी, यासाठी हजारो कोटींच्या जाहिराती सर्वच प्रकारची प्रसारमाध्यमे, डिजिटल व्यासपीठावरून करण्यात आल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जात असल्याचे चित्र काही प्रमाणात उभे राहिले होते. मात्र राजकारणात कधीच काही स्थिर नसते याची प्रचिती तिकीट वाटप व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होऊ लागली. दोन्हीं आघाड्यांत प्रमुख सहा पक्षांतील  निवडणूक लढवण्यासाठी लंगोट बांधून तयार असलेल्या इच्छुकांना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर, शिस्त, मर्यादा याचा विचार करण्यासही वेळ नसल्याचे त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारीवरून दिसून आले आहे. नाराजीचा फटका महाविकास आघाडीपेक्षा सत्ताधारी महायुतीमध्ये अधिक प्रमाणात जाणवत राहिला आहे. त्यामुळे त्यांना काही ठिकाणी मैत्रीपूर्ण तर २५वर  ठिकाणी मित्रपक्षातील बंडखोरांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

मनोज जरांगेंचा सस्पेन्स

विदर्भ, मराठवाडा, खानदेश ,पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मुंबई या सर्व विभागात बंडखोरांची लागण झाली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे गेल्या दोन वर्षांत मराठा आंदोलनाच्या माध्यमातून उभे राहिलेले मनोज जरांगे -पाटील या नेतृत्वाने अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला होता. त्याचा फटका महाविकास आघाडीला तुलनेत जास्त बसणार होता. मात्र अखेरच्या दिवशी जरांगे-पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट करीत आपण कोणाला पाठिंबा देणार नाही, किंवा कोणाला पाडा असे सांगणार नसल्याचे जाहीर केले. त्याचा अप्रत्यक्षपणे मोठा लाभ महाविकास आघाडीला होणार आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवार आणि जरांगे फॅक्टर यांच्यामुळे महाविकास आघाडीला प्रचाराच्या लढाईत बरोबरीत आणून ठेवले आहे. प्रचारातील मुद्दे आणि मते मिळवण्याची आणि फोडण्याची गणिते यावर सत्तेचा लंबक निश्चित होणार आहे. बहुतेक मतदारसंघात तिरंगी- चौरंगी लढती चुरशीच्या होणार असून विजयाचे गणित अवघ्या काही मतावर निश्चित होणार आहे

चार हजारावर उमेदवार

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४ हजार १४० उमेदवार रिंगणात आहेत.. त्यामध्ये महायुतीतील  मोठा पक्ष असलेला भाजप १५२, शिवसेना एकनाथ शिंदे ८६ व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-५५ जागा लढवत आहे. महाविकास आघाडीमधून काँग्रेसने सर्वाधिक १०१ ठिकाणी उमेदवार दिले आहेत तर उद्धव ठाकरे गट ९६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ८७ जागी उमेदवार दिले आहेत. समाजवादी पक्षाला दोन आणि शेतकरी कामगार पक्षाला तीन जागा दिल्या आहेत.

त्याशिवाय युवराज संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या तिस-या आघाडीने जवळपास दीडशे जागी तर मनसे १२५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही १७० वर ठिकाणी उमेदवार उभे केले असून एमआयएम, अपक्ष उमेदवारांचीही मोठी फौज रिंगणात आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीची जागांची समीकरणे अनेक ठिकाणी बिघडली असून युतीतील मित्र पक्षांनी महायुतीतील पक्षांच्या उमेदवाराच्या विरोधात एबी फॉर्म दिले आहेत.

राज्यात यावेळी सर्वात लक्षवेधी लढत लोकसभेप्रमाणेच बारामतीत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवारने दंड थोपटले आहेत. त्याच्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले असून लोकसभेप्रमाणे त्यांनीही लढत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यातील न करता अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या लढतीकडे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

बंडाचे वारे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्याने त्यांना महायुतीने पाठिंबा द्यावा अशी उघड भूमिका भाजपने घेतली. मात्र मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे उमेदवार सदा सरवणकर यांनी तो दबाव झुगारून मैदानात उतरले आहेत. तर मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अजित पवार गटाने भाजप व शिंदे गटाचा प्रखर विरोध डावलून नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला आहे. विदर्भात रामटेक मध्ये उध्दव ठाकरे यांच्या उमेदवाराने अर्ज कायम ठेवला आहे.  बडनेरा मतदार संघातून  रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे तुषार भारतीय यांनी बंड केले आहे.  पश्चिम महाराष्ट्रात सांगोल्यात तिहेरी लढत होत असून महाविकास आघाडीतील ठाकरे गट व शेकापचे उमेदवार परस्परविरोधात लढत आहेत. तर सांगलीतही काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात काँग्रेसच्या बंडखोर वैशाली पाटील रिंगणात आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृह जिल्हा असलेल्या ठाण्यात  काही प्रतिष्ठेच्या मतदारसंघांत बंडखोरी रोखण्यात शिंदे व  फडणवीस यांना अपयश आले. नवी मुंबईतील ऐरोली-बेलापूर व कल्याण पूर्व या जागी शिंदे  यांच्या समर्थकांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.  ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक यांच्याविरुद्ध  शिंदे गटाचे विजय चौगुले अपक्ष म्हणून रिंगणात राहीले आहेत. तर बेलापुरात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट होताच गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांनी हाती ‘तुतारी’ घेऊन उमेदवारी मिळविली तर  शिंदे गटाचे विजय नाहटा यांनीही दंड थोपटले आहेत.

कल्याण पूर्वेत विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली खरी, मात्र शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत आपला अर्ज कायम ठेवला आहे. भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना भाजपचे मोठे आव्हान आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे यांच्यासमोर कपिल पाटील समर्थक स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली आहे. कल्याण पश्चिम येथे शिवसेनेच्या विश्वनाथ भोईर यांच्यासमोर पाटील यांचे निकटवर्तीय वरुण पाटील यांनी बंडखोरी केली आहे

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार गीता जैन यांनी  बंडखोरी कायम ठेवली असून त्या सलग दुसऱ्यांदा भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात रिंगणात आहे. तर नाशिक जिल्ह्यात नांदगावमध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्या विरोधात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ अपक्ष उभे आहेत. मराठवाड्यात सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र आहे.

राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात बेबनाव

निवडणुका जाहीर होईपर्यंत मनसे प्रमुख राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात सलोख्याचे संबंध होते. मात्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीने लोकसभेतील बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात त्यांच्या मुलाला समर्थन द्यावे, अशी राज यांची इच्छा होती. मात्र शिंदे गटाने त्यापूर्वीच सदा सरवणकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. तरीही भाजपने त्याबाबत उघड भूमिका घेत दबाव वाढवला होता. मुख्यमंत्री शिंदे सुरुवातीला त्याबाबत सकारात्मक होते, मात्र एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पुढील मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे वक्तव्य केल्याने शिंदे नाराज झाले. त्यांनी सरवणकर यांना उमेदवारी कायम ठेवण्यास सांगितले. त्यामुळे राज हे शिंदे यांच्यावर नाराज आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00