Home » Blog » नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस!

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस!

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस!

by प्रतिनिधी
0 comments
Chhatrapati Pratap Singh High School file photo

-अरूण जावळे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यात झाला नसला तरी त्यांचे बालपण मात्र सातारच्या मातीला गेले. त्यांची खेळण्या-बागडण्याची ८ ते ९ वर्षे साताऱ्यात गेली. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ साताऱ्यातून झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे इयत्ता पहिलीत इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. त्यांचा हा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून सर्व शाळा-महाविद्यालयांतून दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्त…

७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून आम्ही साजरा करत आलो आहोत. सातारच्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये २००१ सालापासून आंबेडकरी अनुयांयाच्या सहकार्याने हा उपक्रम होतो. हा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा व्हावा, यासाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरत आलो. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र शासन त्याबाबत फारसे गंभीर दिसत नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त तरी या आग्रहाला दाद द्यावी आणि विद्यार्थी दिवस घोषित करावा, यासंबंधाने मंत्रालस्तरावर बैठका-चर्चा सुरू होत्या. परंतु यश येत नव्हते. त्यामुळे चैत्यभूमी येथील समुद्रात १२५ विद्यार्थी घेऊन जलसमर्पण करण्याची भूमिका घ्यावी लागली. अखेर राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने हा विद्यार्थी दिवस घोषित केला.

आता हा विद्यार्थी दिवस भारतातील सर्व शाळा-महाविद्यालयांतून साजरा होणे महत्वाचे असल्याने दिल्लीदरबारी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन आणि डॉ. एपीजे कलाम यांच्या नावाने वाचक दिन साजरा केला जातो. तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा व्हायला हवा, यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून १ लाख २५ हजार पत्रे दिल्लीला पाठविण्याची मोहीम तीन वर्षांपूर्वी सुरू केली. या मोहिमेची सुरूवात ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे, पार्थ पोळके, इ. झेड. खोब्रागडे आणि डॉ. अलोक जत्राटकर यांच्या पत्रांनी केली. आतापर्यंत पन्नास हजारापेक्षा अधिक पत्रे दिल्लीला पाठवली आहेत. या मोहिमेची दखल घेत दीड वर्षापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन देशभर साजरा करण्याचे सूतोवाच केले. तथापि त्यासंबंधी केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना निघण्यापूर्वीच कोविंद त्यांचा कार्यकाल संपला. या पार्श्वभूमीवर हा विषय विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी नव्याने ७५ लाख पत्रे पाठविण्याची भूमिका घेतली आहे. त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करताना ‘शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे विधान केले होते. या विधानाला ७५ वर्षे होत आहेत. याचे औचित्य साधून ७५ लाख पत्रे पाठविण्याची मोहीम विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबवत आहे.

सातारचे छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल डॉ. आंबेडकरांच्या शाळाप्रवेशाने चर्चेत आले आहे. या हायस्कूलमध्ये भव्यदिव्य स्वरुपातील ग्रंथदालन निर्माण करण्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त ५० लाखाचा निधी मिळाला. अलिकडेच नव्याने एक कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध झाले. शाळेच्या व्यवस्थापन, प्रशासन स्तरावर हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी हायस्कूलला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. दोन अंकी पटसंख्या असणाऱ्या या हायस्कूलची पटसंख्या दीडशेच्या पुढे नेली. गुणवत्ता विकासाबरोबरच शिक्षकांची कार्यक्षमता वाढवली. लेखन-वाचन प्रकल्प, अध्ययन समृद्धी असे अनेकविध कल्पक उपक्रम राबवून हायस्कूलचा चेहरा बदलून टाकला. नवीन इमारत, शाळेच्या शेती फार्मची जागा नावावर करून घेणे अशा कार्यात या ऐतिहासिक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले.

आज देशविदेशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही शाळा पहायला पर्यटक, अभ्यासक येतात. शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी आता सर्वस्तरांतून होत आहे. जुलै २०१८ मध्ये काही मंत्र्यांशी यासंबंधाने चर्चाही झाली. त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती स्थापन केली गेली. मात्र या समितीला काही मर्यादा आल्याने ती ठप्प झाली. असे असले तरी हायस्कूलस्तरावर होत असलेली प्रगती आणि विकास कौतुकास्पद आहे.

अफाट अन् अचाट बुद्धिमत्ता लाभलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलच्या रजिस्टरला भिवा रामजी आंबेडकर असे नाव आहे. १९१४ क्रमांकाला तशी नोंद आहे. या शाळेत बाबासाहेबांचे पाऊल पडले. याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुद्धा त्यांना प्राप्त झाले. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नाही तर या जगाचे प्रेरणास्थान ठरलेले आहे. म्हणूनच बाबासाहेबांचा शाळा प्रवेश हा भारताच्या दृष्टीने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू आणि मनगटात सळसळत ठेवणारा दिवस आहे. या दिवसाचे स्मरण चिरंतन ठेवायला हवे. उद्याचा नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबांच्या, दलित- वंचितांच्या आणि एकूणच समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे पाहण्याची आवश्यकता आहे. यातून समाजाला शिक्षणाची जबरदस्त प्रेरणा आणि चालना मिळणार आहे. व्यापक स्तरावर शालेय शिक्षण चळवळ गतिमान होणार आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00