-अमोल उदगीरकर
रोमान्स आणि हॉरर हे दुभत्या गाईसारखे जॉनर आहेत. कायम फायदा मिळवून देणारे हे जॉनर अनेक भाषांमधल्या दिग्दर्शकांनी इतके पिळून काढले आहेत की यात आत नवीन काही करण्यासारखं उरलं नाही असं अनेकदा बोललं जातं. पण याची खासियत अशी की जेंव्हा जेंव्हा असा सॅच्युरेशन पॉइंट येतो तेंव्हा एक असा चित्रपट येतो जो टीकाकारांना शंका मागे घ्यायला लावतो आणि प्रेक्षकांना चित्रपट गृहाकडे पुन्हा वळवतो. भारतीय रोमान्स जॉनर आता संपला अशी टीका जोर पकडू लागताच इम्तियाज अलीचा ‘जब वुई मेट’ आला आणि पुढचा इतिहास तर सगळ्यांनाच माहित आहे. हॉरर जॉनरच्या बाबतीत पण असे अनेकदा घडले आहे. हॉरर जॉनरमध्ये आता काही राम राहिला नाही अशी टीका व्हायला लागली की एखादा ‘इनसीडियस’ सारखा चित्रपट येतो आणि निर्माता दिग्दर्शकांना आपली प्रेक्षकांच्या आवडीनिवडीची समीकरणं पुन्हा तपासुन बघायला लागतात.
‘द व्हॅटिकन टेप्स’ हा चित्रपटपण हॉरर जॉनरला एक नवीन दिशा देईल अशी अपेक्षा त्याचा ‘प्रोमो ‘ पाहुन निर्माण होते पण ट्रेलरमुळे निर्माण झालेली ही उत्कंठा म्हणजे अळवावरचं पाणीच होती हे चित्रपट पाहिल्यावर सिद्ध होतं.
‘द व्हॅटिकन टेप्स’ चित्रपटात नवीन असं काहीही नाही. मागे येऊन गेलेल्या असंख्य हॉरर चित्रपटाचे संदर्भ आणि स्टिरियोटाइप्सच पुन्हा पुन्हा या चित्रपटात येतात. चांगल्या भयपटात तीन चार प्रसंग असे असतात की जे प्रेक्षकाला जबरदस्त घाबरवतात. दुर्दैवाने ‘द व्हॅटिकन टेप्स’ मध्ये असा एकपण प्रसंग नाही जो प्रेक्षकाला घाबरवू शकेल. व्हॅटिकन चर्चने रेकॉर्ड केलेले भयानक ‘फुटेज ‘ सत्याचा आभास निर्माण करून प्रेक्षकांना पडद्यावर दाखवण्याची कल्पना संकल्पनेच्या पातळीवर नक्कीच आकर्षक होती. पण पडद्यावर ही संकल्पना आणताना पटकथा, संकलन, दिग्दर्शन या सगळ्याच आघाडयांवर ती फसली आहे. वास्तविक पाहता हीच संकल्पना थोड्याफार फरकाने वापरून तयार केलेले ‘द ब्लेयर विच प्रोजेक्ट’ आणि ‘ पॅरानॉर्मल अॅक्टिविटी’ चित्रपट त्यांच्या स्मार्ट फिल्ममेकिंगने खूप गाजले होते मात्र ‘द व्हॅटिकन टेप्स’ ला मात्र ही संकल्पना राबवताना दारूण अपयश आले आहे.
चित्रपटाच्या कहाणीत काहीही नाविन्य नाही. चित्रपटाची कहाणी अँजेला (ओलिविया डुडली) च्या आजुबाजुने फिरते. आपला प्रियकर पिट (जॉन पॅट्रिक) आणि वडिल (दोग्रे स्कॉट ) यांच्यासोबत अँजेलाचे सुखी आणि सुरक्षित आयुष्य सुरळीत चालू असतं. पण नियतीला हे फार काळ चालण मंजूर नसतं. अँजेला ‘पझेशन ‘ची (झपाटलं गेल्याची )लक्षण दाखवायला लागते. कुठल्याही डॉक्टरला आणि मानसोपचारतज्ञाला तिच्या विचित्र कृतींचं आणि तिच्या आजुबाजूला घडणाऱ्या खुनी खेळाचं निदान करता येत नाही. मात्र स्थानिक प्रिस्ट फादर लुझानो (मायकेल पेना ) याचं अँजेलाकडे लक्ष असतं. अँजेलाला भुताटकीने झपाटले आहे हे त्याच्या लक्षात येतं. तो लगेच ही बातमी सर्वोच्च धार्मिक व्यासपीठ असणाऱ्या व्हॅटिकन सिटीला कळवतो. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून तिथून लगेच एक मोठे धर्मगुरू परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पाठवले जातात. अँजेलाची स्थिती पाहिल्यावर आपल्याला वाटली त्यापेक्षा परिस्थिती गंभीर आहे याची त्यांना जाणीव होते. अँजेलाच्या शरीरात साक्षात परमेश्वराला आव्हान देणारा सैतान वास्तव्यास आला आहे असे ते फादर लुझानोला बोलून दाखवतात. सैतानाला पुन्हा नरकात पाठवण्यासाठी धार्मिक विधी करायच्या तयारीला ते लागतात. मात्र त्याला आता फार उशीर झालेला असतो.
दिग्दर्शक मार्क नेवेल्डीनने यापूर्वी ‘गेमर’ सारखा वेगळा चित्रपट दिला आहे. पण इथे त्याला आपली लय सापडलेली नाही. चित्रपटाचा शेवट ही एक मोठी उणी बाजू आहे. अतिशय संदिग्ध टोकावर चित्रपट संपतो. चित्रपटाचा ‘सिक्वल ‘ येणार आहे का याची कल्पना नाही. चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्मात्यांनी तशी घोषणा पण केल्याचे आढळले नाही. पण इतका संदिग्ध शेवट पाहुन ‘हेचि फळ काय मम तपास ‘ असं प्रेक्षकांना वाटू शकतं. हा शेवट इतका फसला आहे की चित्रपट संपला आहे हेच बऱ्याच प्रेक्षकांना कळत नाही. जर चित्रपटाचा पार्ट टू किंवा सिक्वल येणार नसेल तर या फसलेल्या शेवटाची मोठी जबाबदारी दिग्दर्शक म्हणून मार्क नेवेल्डीनवर येते. अभिनयाच्या आघाडीवर फादर लुझानोच्या भूमिकेत मायकेल पेनाने चांगली कामगीरी केली आहे . छायाचित्रणाचा चित्रपटात वापरलेला साचा यापूर्वीच वापरून जुना झाला असल्याने त्यात फारसे नाविन्य नाही. चित्रपटाची कमी लांबी ही एकमेव जमेची बाजू (प्रेक्षकांसाठी).
एड्वर्ड डेविस उर्फ ‘एड’ वुड ज्युनियर हा हॉलीवूडमधला निर्माता आणि दिग्दर्शक. सत्तरच्या दशकात याने परग्रहवासीयांची आक्रमणं, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. हॉलिवुडमध्ये गोल्डन टर्की अवॉर्ड्स नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटांना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे हीसुद्धा एक कला आहे. तर या गोल्डन टर्की अवॉर्डने एड वुड ला ‘सर्वकालीन वाईट दिग्दर्शक’ या पुरस्काराने सम्मानित केले. यावर्षीच्या गोल्डन टर्की अवॉर्ड्ससाठी ‘द व्हॅटिकन टेप्स’ हा प्रबळ उमेदवार असेल हे नक्की. दिग्दर्शक मार्क नेवेल्डीनची ओळख या पिढीचा ‘एड’ वुड ज्युनियर अशी होऊ नये ही सदिच्छा.