सादिक सय्यद
पाचगणी; जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या महाबळेश्वर नगरपालिकेची प्रशासकीय इमारत पाच वर्षांपासून रखडली आहे. मात्र, या रखडलेल्या इमारतीला ना निधी मिळाला ना आरखडा मंजुर करण्यात लोकप्रतिनीधीना यश आले. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेची सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत आता मुख्याधिकारी निवासस्थानामध्ये स्थलातरीत केली आहे. हे शहराच्या वैभवाला शोभणारे नाही.
मकरंद पाटील वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदार संघाचे नेतृत्व करत असताना महाबळेश्वर शहराच्या मूलभूत विकासाला चालना देण्यास ते कमी पडले असल्याची लोकांची भावना आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे काम आजही रखडल्याचे लपून राहीले नाही. स्थानिक नागरिकांनी याबाबत खूप वेळा मागणी करुनदेखील मकरंद पाटील नगरपालिकेची सुसज्ज इमारत बांधण्याकरीता काही करु शकले नाहीत.
महाबळेश्वर तालुक्याचा विकास केला म्हणून डांगोरा पिटणारे मकरंद पाटील महाबळेश्वर शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासकीय इमारतीला निधी आणू शकले नाहीत. त्यामुळे जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या शहराच्या नगरपालिकेला सुसज्ज इमारत मिळू शकली नाही, त्यामुळे सर्वसामान्य याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. मकरंद पाटील यांनी पक्ष बदलताना विकासाचे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरीता जात असल्याचे कारण सांगितले. मात्र तालुक्याचा विकास तर सोडाच पण महाबळेश्वर शहराच्या नगरपालिकेच्या इमारतीला न्याय देऊ शकले नसल्याची टीका विरोधक करीत आहेत. जागतिक पर्यटन स्थळाला सुंदर नगरपालिका वास्तू असावी अशी सर्वसामान्याची मागणी असताना मकरंद पाटील महाबळेश्वर शहराला मुलभुत सुविधा देण्याकरीता पाच वर्षात कमी पडले आहेत हे मात्र नक्की.