– मुकेश माचकर
एका शेतकऱ्याकडे एक बैल होता आणि एक बोकड होता. बोकड आणि बैल एकमेकांचे फारच चांगले मित्र होते.एकदा बैल आजारी पडला आणि खंगू लागला.
शेतकऱ्याने डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरने सांगितलं, आजार गंभीर आहे. वाचला तर पाहूयात. पण, आता तो उठून उभा राहील आणि औताला, नांगराला जोतता येईल, अशी शक्यता मला कमी वाटते. काही औषधं देतो. त्यांचा असर होऊन हा एका आठवड्यात उभा राहिला तर ठीक. नाहीतर कसायाला विकून टाका. त्यापलीकडे त्याचा काहीच उपयोग नाही. त्याचीही सुटका होईल.
बोकडाने हे ऐकलं आणि तो हादरून गेला. काहीही करून आपल्या मित्राला जगवलं पाहिजे, असा निर्धार त्याच्या मनात दाटला. त्याने बैलाला सांगितलं, पवळ्या, लवकरात लवकर आपल्या पायांवर उभा राहा. त्यातच तुझं भलं आहे.
बैलाला आजाराने प्रचंड अशक्तपणा आला होता. ग्लानीत त्याला बोकडाचं बोलणंही कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशीही बोकडाने तेच केलं. शुद्धीत नसलेल्या आपल्या मित्राच्या जवळ जाऊन तो त्याला सारखा प्रोत्साहन देत होता, उठून बसायला सांगत होता, ताकद एकवटायला सांगत होता.
पण, बैलाला हे अशक्यप्राय होऊन बसलं होतं. एक दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला… आठवडा संपायला एक दिवस उरला… बोकडाने तहानभूक विसरून आपल्या मित्राला मरणाच्या खाईतून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालवले होते.
आठवड्याअखेरीला डॉक्टर पुन्हा आला. बैलाच्या प्रकृतीत काहीही सुधारणा नाही, म्हटल्यावर त्याने निराशेने मान हलवली. शेतकरी म्हणाला, कसाईही त्याला घ्यायचा नाही. उद्या तुम्ही विषाचं इंजेक्शन आणा. मलाही त्याच्या यातना बघवत नाहीत. सोडवा त्याला.
मालक आणि डॉक्टर गेल्यानंतर बोकडाने ढसढसा रडत आपल्या मित्राला त्याच्या पायावर उभं राहण्याची याचना केली, त्याला तो सांगू लागला, कमॉन पवळ्या, यू कॅन डू इट. यू हॅव इट इन यू. प्लीज. जागा हो. पायावर उभा राहा. प्लीज. तुला माझी शपथ.
दुसऱ्या दिवशी डॉक्टर इंजेक्शन घेऊन आला. मालक आणि डॉक्टर गोठ्यात आले, पाहतात तो पवळ्या उठून उभा राहून चारा खात होता. त्याच्या तब्येतीत आश्चर्यकारक सुधारणा झाली आहे आणि आता त्याला मारण्याची काहीही गरज नाही, असं डॉक्टरने जाहीर केलं आणि शेतकरी आनंदाने रडत रडत नाचू लागला.
डॉक्टरला हात जोडून म्हणाला, तुम्ही केवढी मोठी आनंदाची बातमी दिलीत हे तुम्हाला माहिती नाही. मी गरीब शेतकरी आहे. तुमच्यासाठी फार काही करू शकत नाही. पण, तुम्ही माझा बैल वाचवलात, म्हणून आज तुमच्यासाठी मी बोकड कापणार, मटणाची मेजवानी देणार.