Home » Blog » हलकं फुलकं : पांडू पोर्टरची परमेश्वराशी भेट

हलकं फुलकं : पांडू पोर्टरची परमेश्वराशी भेट

हलकं फुलकं : पांडू पोर्टरची परमेश्वराशी भेट

by प्रतिनिधी
0 comments
Coolie file photo

मुकेश माचकर

पांडू पोर्टरचा जन्म कुठे झाला, ते त्यालाही माहिती नव्हतं. त्याच्या  कळत्या वयापासूनच तो मिरज जंक्शनवरच हमाली करत होता. त्याला आईबापभाऊबहीण कोणी नव्हते. दिवसभर जंक्शनवर हमाली करायची, त्यातून मिळालेल्या पैशातून रात्री मित्रांबरोबर थोडी दारू प्यायची, जेवायचं आणि स्टेशनवरच्याच एका कोपऱ्यात मुटकुळं करून झोपून जायचं, हेच त्याचं रोजचं आयुष्य होतं. येत्या-जात्या गाड्यांचे आवाज, इंजिनांची हिस्स फिस्स, प्रवाशांचा गलका, फेरीवाल्यांच्या हाळ्या, रेल्वेच्या उद्घोषणा यांच्या संमिश्र कोलाहलातच तो २४ तास वावरायचा.

मात्र, त्याने कधी कोणाचं नुकसान केलं नाही. अडल्यानडल्याला मदत केली. अधूनमधून तो लोकांच्या नादाने देवाचं नाव घ्यायचा, कधी भजनाबिजनांना जाऊन बसायचा, कधी कीर्तनं ऐकायचा. या साधेपणामुळेच त्यापलीकडे कसलाही देवधर्म केलेला नसताना त्याला मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळालं.

स्वर्गात पोहोचल्यावर पांडूने कावरंबावरं होऊन विचारलं, इथे काही रेल्वेबिल्वे, स्टेशनबिशन आहे की नाही?

देवदूत म्हणाला, वत्सा, तिकडे तुम्ही पृथ्वीवर जी काही धावाधाव करता ती इथे येण्यासाठी. इथून कोणी कुठे जात नाही. इथे कोणालाही रेल्वेची गरज भासत नाही.

पांडू डोक्याला हात लावून म्हणाला, अरे देवा, मग करायचं काय? पोट कसं भरायचं इथं?

देवदूत म्हणाला, त्याचं टेन्शन तुला नाही. इथे कोणत्याही झाडाची फळं तोड, सगळी रसाळ एक नंबरची फळं. कोणत्याही झऱ्याचं पाणी पी, एकदम मिनरल वॉटर. थोड्या दूरवर दुधाचे झरे आहेत, तुमचं गोकुळ, वारणा, कृष्णा दूध झक् मारेल अशी गोडी. बाकी तुला 

बसल्या जागीच सगळं हवं असेल तर फक्त डोळे मिटून इच्छा व्यक्त करायची, जे हवं ते समोर हजर.

आयला हे लय अवघड काम झालं राव, पांडू म्हणाला, अंगमेहनतीबिगर एक घासही अंगाला लागायचा नाही माझ्या. रेल्वे जंक्शनच्या आवाजाबिगर मला झोप लागायची नाही. इथं कसलं कामच करायचं नाही, तर दिवसभर करायचं काय?

देवदूत म्हणाला, एक छानसा गुबगुबीत ढग निवड. त्यावर बस आणि परमेश्वराच्या नामाचा जप कर.

पांडू नाईलाजानेच नामजपाला बसला आणि पुढच्या दोन तासांतच साक्षात परमेश्वर त्याच्यापुढे येऊन हजर झाला.

परमेश्वराचे सगळे सहायक अधिकारी हजर झाले. पांडू बावरून ढगावरून खाली उतरला. अधिकाऱ्यांनी परमेश्वराला विचारलं, साहेब, आपण स्वत: आलात. याने काही गडबड केली का?

परमेश्वर म्हणाला, हा माझ्या नावाचा जप करतोय पण फारच वेगळ्या पद्धतीने. तो ‘देवा देवा देवा देवा, आयची कटकट, देवा देवा देवा देवा, काय ही बिलामत, देवा देवा देवा देवा, कसली ही आफत, देवा देवा देवा देवा, झक मारली अन् मेलो, देवा देवा देवा देवा’ असा जप करतोय. 

असा जप मी आयुष्यात कधी ऐकला नव्हता.

थरथरत उभ्या पांडूला त्याने अतिशय प्रेमाने विचारलं, बाबारे, तू असा जप का करतोस?

पांडूने त्याला आपली सगळी ष्टोरी सांगितली आणि म्हणाला, परमेश्वर महाराज, तुमचा स्वर्ग एकदम ब्येस आहे, पण माझी हयात रेल्वे स्टेशनावर गेली आहे, मला या स्वर्गाची गोडी नाही, तुमच्या अशा नामजपाचीही गोडी नाही. माझा जीव तळमळतोय. मला सोडवा.

परमेश्वराने चित्रगुप्ताला बोलावून सांगितलं, याला परत मिरज जंक्शनला पाठवा. हा इथे माझ्या नावाचा जप करतोय. पण, त्याला काही अर्थ नाही. तो तिथे जेव्हा दारू पिऊन, अभक्ष्य भक्षून अर्धवट झोपेतही माझं नाव कण्हत घ्यायचा, तेव्हा त्यात असोशी होती, सच्ची भावना होती. ती या बळजबरीच्या नामजपात नाही. त्याला स्वर्गच द्यायचाय ना. त्याला तिथेच पाठवा.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00