Home » Blog » ज्योत निमाली..

ज्योत निमाली..

व्यक्तिवेध – डॉ. वीणा देव

by प्रतिनिधी
0 comments
Veena Dev

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात तेवणारी एक ज्योत निमाली आहे. गेले काही दिवस  त्या आजारी होत्या, आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वीणा देव या दिवंगत साहित्यिक आणि इतिहास अभ्यासक गोनीदा उर्फ गो. नी. दांडेकर यांच्या कन्या तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षे मराठीचे अध्यापन केले. ‘मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे’ या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली होती. ललितलेखन, संकलन, संपादन अशी विविध प्रकारची पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. लेखनाबरोबरच अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्याच्या प्रचारामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते.  ‘कधीकधी‘, ‘परतोनी पाहे‘, ‘स्त्रीरंग‘, ‘विभ्रम‘, ‘स्वान्सीचे दिवस‘ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. गो. नी.दांडेकर यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर‘ या पुस्तकाला राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. राज्य शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

मोठ्या वृक्षाखाली अनेक छोट्या वृक्षांचे आयुष्य खुरटून जाते. गोनीदा यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या कन्या म्हणून त्यांची ओळख होती. परंतु त्यांनी त्यापलीकडे स्वतःची ओळख निर्माण केली. अत्यंत ऋजू स्वभावाच्या डॉ. वीणा देव या साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात आपल्या परीने कार्यरत राहिल्या आणि सास्कृतिक प्रवाह खळाळता ठेवण्याचा प्रयत्न केला. गोनीदांच्या संस्कारामुळेच त्या साहित्य-संस्कृतीशी समरस होऊन जगल्या आणि मराठी साहित्याच्या उत्तम अध्यापक म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळवला. अनेकांना आपल्या मर्यादांची जाणीव नसते आणि वारशाचा रुबाब मिरवण्यात धन्यता मानतात. डॉ. वीणा देव यांच्याकडे गोनीदांचा समृद्ध वारसा होता आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्याचमुळे गोनीदा आजच्या पिढीतल्या वाचकांनाही समकालीन लेखक वाटतात. साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात असे छोटे प्रयोग खूप महत्त्वाचे असतात. आणि डॉ. वीणा देव यांनी आपल्या मर्यादा ओळखून त्याच चौकटीत आपले भाषा आणि साहित्यासाठी आपले योगदान दिले.

वीणा देव यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला. वडिल गो. नी. दांडेकर ख्यातनाम साहित्यिक असल्यामुळे त्यांच्याद्वारे त्यांच्यावर घरातच मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. श्री शाहू मंदिर महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या. पती डॉ. विजय देव, मृणाल आणि मधुरा या कन्या आणि जावई रुचिर कुलकर्णी यांच्यासमवेत वीणा देव यांनी गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे साडेसहाशेहून अधिक प्रयोग केले. गोनीदांच्या स्मरण जागरणासाठी त्यांनी मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन असे उपक्रम राबविले होते. मृण्मयी प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी गोनीदा यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केल्या. ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मुलाखतकार, सूत्रसंचालन या माध्यमातून त्यांचा आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमात सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रातील एक कृतीशील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00