Home » Blog » प्रेमा तुझा रंग असा…

प्रेमा तुझा रंग असा…

प्रेमा तुझा रंग असा...

by प्रतिनिधी
0 comments
Love

प्रेम या अडीच अक्षरी शब्दाने अवघे विश्व व्यापले आहे. ते दिसते. जाणवते. खुणावते.दुरावते. खंतावते. दु णावते आणि उणावतेही. पण मुळात एखाद्यामध्ये ते का निर्माण होते, कसे निर्माण होते, ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट’ प्रकारातला चमत्कार कसा घडून येतो, प्रेमात माणसे वेडेपिशी का होतात, हिंसक का होतात, दुःखीकष्टी का होतात…असे नानाविध प्रश्न, प्रेमात पडणाऱ्यांना मात्र सहसा पडत नाहीत. अशा वेळी हेलेन फिशर नावाच्या जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र तज्ज्ञ असलेल्या संशोधिकेने प्रेमात पडलेल्यांच्या मेंदूतली गुंतागुंत उकलून मानवी ज्ञानात मोठीच भर घातली. अलीकडेच फिशरबाईंचे निधन झाले. ‘दी इकॉनॉमिस्ट’ने अलीकडे त्यांच्या या पाथब्रेकिंग संशोधनाची दखल घेत, या व्यक्तित्वाच्या समृद्ध कार्याचा स्मृतिगंध शब्दांतून वाचकांपर्यंत पोहोचवला. त्याचाच हा साभार स्वैर अनुवाद.

व्हॉट इज लव्ह? प्यार आखिर चीज क्या है? प्रेम ही नेमकी भानगड आहे तरी आहे? कोणत्याही भाषेत विचारा. प्रश्न म्हटला तर साधासरळ, पण भिडल्यानंतर प्रत्येकाच्या लेखी वेगळे उत्तर घेऊन येणारा. मुळात, प्रेम ही एक भव्योत्तम मानवी भावना. एक अशी शक्ती वा ऊर्जा, जी जगाला व्यापून आहे. प्रेम हा एक हवाहवासा वेडाचारही. एक असा अग्नि, जो तुमच्या हृदयाला ऊबही देतो आणि तुमचे घरही भस्मसात करतो. प्रेम हा तळाचा थांग न लागणारा समुद्र, प्रेम हे सर्वोच्च सुख, अनंत नि आंधळेदेखील. म्हणूनच प्रेमाचा प्रवाह कधीही एका लयीत झुळझुळ वाहात नाही. वाहिलेलाही नाही. म्हणूनही ज्याचे वचन उद्धृत करणे हेलेन फिशरना खासे आवडत असे त्या एका अलास्कन सज्जनाच्या म्हणण्यानुसार, प्रेम ही ‘उकळती नि प्रस्फोटीत’ होऊ पाहणारी एक असह्य वेदनाही आहे.

अर्थात, इतर कोणाहीप्रमाणेच (की सगळ्यांप्रमाणेच ?) हेलेन फिशरबाईंच्या वाट्याला प्रेमाचे सुखही आले नि दुःखही. समाधानही आले नि वेदनाही. परंतु एक जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र तज्ज्ञ या नात्याने त्या या भाववस्थांना तिथेच सोडून पुढच्या कामाला लागू या म्हणणाऱ्याही त्या नव्हत्या. नव्हे, त्यांचा तसा स्वभावही नव्हता. म्हणूनच, तब्बल २० वर्ष या बाईंनी जगभरातल्या विभिन्न संस्कृतीत नांदणाऱ्या माणसांच्या लैंगिक वर्तनाचा अभ्यास केला. त्यातून अखिल मानवी जातीची प्रजननाची तीव्रेच्छा सहजपणे पुढे आलीच. पण, माणसे कशामुळे नाचतात-डोलतात, कशासाठी नि कशामुळे कविता करतात, अश्रू ढाळतात, विरहवेदना अनुभवतात, व्याकुळतात, मारले जातात-मरतात ते सारे काही भलतेच होते. त्यातून जाणवले ते असे की- प्रणयोत्सुक प्रेम हे गूढरम्य होते. भयावह होते, जेव्हा ते चुकीच्या मार्गाने चालले होते. पण जेव्हा ते योग्य मार्गाने मार्गक्रमण करीत होते, तेव्हा ते लोभसही होते. ते असे असे का होते, याला खरे तर काही कारण दिसत नव्हते. परंतु मेंदू विज्ञानाच्या जाणकार म्हणून एक दिवस हेलेन फिशर यांच्या हे डोक्यात आले की, वरवर आपल्याला काही कारण दिसत नसले, तरीही कारणांना जन्म देणारे घटक मानव जातीत अत्यंत बळकटपणे गुंफलेले आहेत.

प्रेमवीरांवर वैज्ञानिक प्रयोग

अर्थातच कारणांच्या मुळांशी जाण्यासाठी फिशर बाईंनी आपल्या दोन सहकारी संशोधकांच्या मदतीने १७ विद्यार्थी निवडले. हे सगळे ताजेताजे प्रेमात पडलेले मजनू, फरहाद किंवा रोमिओ होते. फिशर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या १७ प्रेमवीरांच्या मेंदूचा उभा आडवा छेद टिपला. म्हणजेच मेंदूचे स्कॅनिंग केले. फिशरनी या सतरांची निवड करण्याआधी पहिला प्रश्न विचारला. रोज कितीदा वा कितीवेळा हे प्रेमकैदी आपल्या लाडक्या प्रियेची आठवण काढतात. अपेक्षित म्हणता येईल असे उत्तर आले, “सारा दिवस, सारी रात्र”, वा “ दिवस नाही रात्र नाही. सदान कदा”. प्रश्न पुढचा. मग या प्रियेसाठी तुम्ही जीवही द्याल का? प्रत्येकाकडून एका सुरात उत्तर आले- “हो!!” जणू प्रत्येकाच्या प्रियतमेने त्यांच्याकडून ही अग्निपरीक्षा पार करण्याचे वचनच घेतले होते. याचा सगळ्याचा थोडक्यात अर्थ असा होता की, हे सारे प्रेमवीर संशोधनासाठी एकदम सहीसही विषयवस्तू ठरले होते.

जसे हे प्रयोगासाठी निवडलेले प्रेमवीर तपासणीसाठी एमआरआय मशीनमध्ये सरकवले गेले, तसे फिशरबाईंनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रेमप्रकरणाचे फोटो दाखवले. यासोबत काही परिचित चेहरेही समोर धरले. जेव्हा प्रियतमांचे फोटो दाखवले, तेव्हा मेंदूतला ‘व्हेंट्रल टॅगमेंटल एरिया’ म्हणजेच मेंदूचा खालच्या अंगाला असलेला मध्यप्रदेश उजळून निघाला. याच मध्य भागात डोपामाइन संप्रेरकाची निर्मिती होत असते. हा भाग बोधन प्रक्रियेच्या केंद्रस्थानापासून बराच खालच्या स्तराला असतो. अशा वेळी घडते असे की, विशिष्ट अशा १० पेशी कार्यन्वित होतात, म्हणजे एखादा बेहद्द आवडीचा पदार्थ पोटात गेला किंवा अंमली पदार्थ शरीरात गेला की, या विशिष्ट पेशी ताडकन उद्दिपित होतात, तसेच याही वेळी घडले.

फिशरबाईंनी दुसरा अधिक कठोर वा क्रूर भासेल असा प्रयोग प्रेयसीने टाकून दिलेल्या १५ प्रियकारांवर केला. त्यांनी या ‘प्यार में धोका खाए हुए’ प्रेमवीरांचे मेंदू स्कॅनरखाली ठेवले. त्यांना त्यांच्या सोडून गेलेल्या प्रेयसींचे फोटो दाखवले आणि काय चमत्कार या सगळ्या १५ प्रेमवीरांच्या मेंदूचा मध्यप्रदेश पूर्वीच्या प्रयोगापेक्षा अधिक तेजाने उजळला. आपल्या प्रेयसीला कसेही करून परत मिळवायचे आहे, अशी तीव्रता त्या उजळण्यामागे फिशरबाईंना जाणवली.

या सगळ्या प्रयोगांत प्रेमवीरांच्या वाट्याला आलेल्या वेदना नक्कीच असह्य होत्या. पण हे सगळे घडवून आणले होते कशासाठी ? आणि का म्हणून हा प्रयोग फिशरबाईंसाठी खासमखास होता ? एखाद्या गजबज असलेल्या रात्रीच्या पार्टीमध्ये सामील झालेला प्रत्येक जण एकाच पार्श्वभूमीचा आणि साधारणपणे एकसारखीच बौद्धिक क्षमता असलेला असताना, त्यातल्या एखाद्याचेच मन कोणाला बाहुपाशात घेण्यासाठी आतुरते, किंवा एखादी निळ्या डोळ्यांची रुपगर्विता पाहून एखाद्याच्या पोटात फुलपाखरे का उडू लागतात ? आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, का एखाद्याबद्दलची प्रेमभावना नादिष्ट रुप घेते, जणू कोणीतरी तुमच्या मनात कायमस्वरुपी तंबू ठोकून बसले असावे. फिशरबाईंच्या मते, रोमॅण्टिक लव्ह अर्थात प्रणयी प्रेम ही मूलभूत प्रेरकशक्ती आहे या मागे कारणीभूत आहे. हे प्रणयी प्रेम माणसाच्या मेंदूत गुंफलेले आहे. कारण, ती व्यक्ती सुयोग्य असो वा अयोग्य आदर्श जोडीदार किंवा जोडीदारीण शोधण्यासाठी माणसाला एकाच व्यक्तीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. आणि एकदा का या भावनेला धग मिळाली की, ते व्यसन होऊन बसते. हेच व्यसन या पृथ्वीवरची सगळ्यात ताकदवान गोष्ट असते. असा हा सगळा प्रेमाचा प्रेमळ मामला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00