भोपाळ : बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी दिवाळीच्या फटाक्यांबाबत वक्तव्य केले आहे. दिवाळीच्या सणाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली असून बकरी ईदच्या दिवशी होणाऱ्या उपक्रमांवरही त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर काही लोक फटाके वाजवण्याची चिंता करतात आणि त्यामुळे प्रदूषण वाढल्याची चर्चा होते. दिवाळीत कोणी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या तोंडात सुतळी बाँब घालून त्याचा स्फोट करू, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. (Dhirendra Shastri)
ते म्हणाले, की असे लोक दिवे लावण्यासाठी तेल आणि तूप वाया जाण्याची चिंता व्यक्त करतात. या चिंतेची त्यांनी खिल्ली उडवली आणि हे ज्ञान दिवाळीला नाही, तर बकरी ईदला द्यायला हवे, असे सांगितले. बकरी ईदच्या वेळी लाखो बकरी मारली जातात. त्यावर कोणतीही चर्चा होत नाही. बकरी ईद संपवण्यासाठी कायदा करावा, अशी सूचना पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी केली. या दिवशी खर्च होणारी रक्कम गरिबांमध्ये वाटल्यास समाजाला फायदा होईल, असे ते म्हणाले.
हिंदू सण आला की त्यावर भाषणबाजी होते, असे सांगून धीरेंद्रशास्त्री म्हणाले, की होळीच्या वेळी पाण्याचा अपव्यय होत असल्याबाबत अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात; मात्र बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांच्या हत्येवर कोणी आवाज उठवत नाही. या दुटप्पीपणामुळे समाजात असमानता आणि भेदभाव वाढतो. नववर्षानिमित्त जेव्हा संपूर्ण जग फटाके फोडते, तेव्हा कोणालाही कोणतीही अडचण येत नाही; परंतु हिंदूंच्या सणांवर ते चुकीचे मानले जाते.
हेही वाचा :
- सिंचन घोटाळा चौकशी फाइलवर आबांनी सही केली : अजित पवार
- मॅथ्यू वेडची क्रिकेटमधून निवृत्ती
- आयसीसी वन-डे क्रमवारीत दीप्ती शर्माची दुसऱ्या स्थानावर झेप