पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ विकेट गमावून १९८ धावा केल्या. टॉम ब्लंडेल ३० तर ग्लेन फिलिप्स ९ धावांवर नाबाद आहेत. सामन्यात न्यूझीलंडने ३०१ धावांची आघाडी घेतली आहे. (IND vs NZ)
पहिल्या डावात मिचेल सॅटनरच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघ पत्त्याच्या घरासारखा कोसळला. सँटनरने ५३ धावांत ७ बळी घेतले. डावाच्या तिसऱ्याच षटकात टीम साऊदीच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितने ९ चेंडूंचा सामना केला यात त्याला खातेही उघडता आले नाही.
यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या दिवशी दमदार सुरुवात केली. भारतीय संघाला ५० धावांवर शुभमन गिलच्या रूपाने दुसरा धक्का बसला, गिलला (३०) मिचेल सॅटनरने एलबीडब्ल्यू केले. यानंतर विराट कोहली अवघी एक धावकरून तंबूत परतला.
यानंतर यशस्वी जैस्वाल ३० धावांवर ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर डॅरिल मिशेलकडे झेलबाद झाला. जैस्वाल बाद झाल्यानंतर ऋषभ पंतला (१८) ग्लेन फिलिप्सने क्लीन बोल्ड केले. पंत बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ८३/५ होती. यानंतर काही वेळातच सँटनरच्या चेंडूवर आक्रमक शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना सर्फराज खान (११) झेलबाद झाला. यानंतर अश्विन बाद झाला. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या १०३/७ होती. यानंतर रवींद्र जडेजाने संघर्ष केला. पण, तो ३८ धावाकरून बाद झाला. आकाश दीप (६) आणि बुमराह (०) हेही सॅन्टनरचे बळी ठरले. वॉशिंग्टन सुंदर १८ धावांवर नाबाद राहिला. (IND vs NZ)
न्यूझीलंडने दुसऱ्या डावाची संथ गतीने केली. ३६ धावांवर डेव्हॉन कॉनवेच्या (१७) रूपात न्यूझीलंडचा पहिला फलंदाज बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने त्याला बाद केले. ७८ धावांवर अश्विनने विल यंगला (२३) बाद करत न्यूझीलंडला दुसरा झटका दिला. त्यानंतर सुंदरने रचिन रवींद्रला (९) बोल्ड केले. रवींद्र बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ८९/३ अशी होती. यानंतर सुंदरने डॅरिल मिशेल (१८) यालाही बाद केले.
यानंतर कर्णधार टॉम लॅथम आणि यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. टॉम लॅथमला एलबीडब्ल्यू आऊट करून सुंदरने ही भागीदारी फोडली. टॉम लेथमने आपल्या खेळीत ८६ धावांची खेळी केली. यानंतर टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी संघाची धुरा सांभाळली. टॉम ब्लंडेल ३० तर ग्लेन फिलिप्स ९ धावांवर नाबाद खेळत आहेत.
हेही वाचा :
- पुणे कसोटीत सॅटनरची ‘शानदार’ कामिगरी
- दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत बदल
- अनिल देशमुखांचा ‘होम मिनिस्टर’, ऐन निवडणुकीत वाढविणार संशयकल्लोळ!