मुंबई; प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी सांगितले, की त्यांचे चिरंजीव आ. झिशान सिद्दीकी हेदेखील शूटर्सच्या निशाण्यावर होते. चौकशीत आरोपीने हे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. (Zeeshan Siddique)
आरोपीने सांगितले, की त्याला दोघांनाही गोळ्या घालण्याचे आदेश मिळाले होते. जो सापडेल त्याला ठार मारण्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी झिशान यांनाही धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स टोळीने सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या ४ हल्लेखोरांपैकी २ उच्चरक प्रदेशचे, एक हरियाणाचा आणि एक पंजाबचा आहे. हरियाणाचा गुरमेल आणि उत्तर प्रदेशच्या धर्मराज यांना घटनास्थळी अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील शिव आणि पंजाबमधील झिशानचा शोध सुरू आहे. मुंबई न्यायालयाने गुरमेलला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. धर्मराजने स्वतःला अल्पवयीन घोषित केले. दंडाधिकाऱ्यांसमोर त्याच्या हाडांची चाचणी करण्यात आली. याला ‘बोन ओसिफिकेशन टेस्ट’ म्हणतात. यामध्ये शरीराच्या काही भागांच्या हाडांचा एक्स-रे केला जातो. एखाद्या व्यक्तीचे वय त्यांची रचना, ताकद आणि घनता यावर अवलंबून असते. चाचणीत धर्मराजचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. (Zeeshan Siddique)
शुभम लोणकर याने ‘शुभम लोणकर महाराष्ट्र’ नावाच्या आयडीने पोस्ट टाकली होती. शुभमचा भाऊ प्रवीण लोणकर (वय २८) याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. बाबांच्या हत्येच्या कटात दोन्ही भावांचा सहभाग आहे. लॉरेन्सचे नाव समोर आल्यानंतर सलमान खानच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये लॉरेन्स टोळीने सलमानच्या घरावर गोळीबार केला होता.
हेही वाचा :
- उद्धव ठाकरेंवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी
- ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड
- कांबळे, पाटोळे, सुकन्या, सबाने यांना दया पवार पुरस्कार