Home » Blog » बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूड हादरले

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूड हादरले

Baba Siddiqui यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

by प्रतिनिधी
0 comments
Baba Siddique

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर रविवारी रात्री मरीन लाईन्सजवळील बडा कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाऊस असतानाही त्यांचे चाहते व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह सेलिब्रेटी व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी बाबा सिद्दिकी यांना अखेरचा निरोप दिला. हत्येच्या निषेधार्थ  वांद्रे परिसरात आज बंद पाळण्यात आला.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूडही हादरून गेले आहे. त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच शनिवारी रात्री अनेकांनी त्यांना दाखल करण्यात आलेल्या लीलावती रुग्णालयाकडे संजय दत्त, सलमान खानसह अनेकांनी धाव घेतली. त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी, कन्या डॉक्टर अर्शिया सिद्दिकी व पत्नी शाहजिन सिद्दिकी यांच्यासह त्यांचे नातेवाईक व कार्यकर्तेही पोहोचले होते. रात्री साडे दहाच्या सुमारास डॉक्टरांनी बाबा सिद्दिकी यांना मृत घोषित केल्यानंतर उपस्थितांना शोक अनावर झाला. अभिनेता सलमान खान व संजय दत्त रात्री उशिरापर्यंत लीलावती रुग्णालयात थांबून होते.

सकाळी साडे अकराच्या सुमारास मृतदेह सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी नेण्यात आला. याठिकाणी राजकारण्यांसह बॉलीवूड व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन घेतले. रात्री आठच्या सुमारास मरीन लाईन्स येतील बडा कब्रस्तान मध्ये विधिवत दफनविधी करण्यात आला. बाबा सिद्दिकी यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींनी अंत्यदर्शन घेतले.

हत्येची घटना  समजल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री पुण्याहून मुंबईला निघाले होते आज सकाळी अमरावती दौरा व आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून  कूपर रुग्णालयात झीशान सिद्दीकींसह कुटुंबीयांचं सांत्वन केले.

फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असून सत्ताधारी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने विरोधकांनी राज्य सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र आता सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला असून सत्ताधारी पक्षाचे नेते सुरक्षित नाहीत तेथे सामान्य जनतेची सुरक्षा कशी करणार? अशी टीका करून गृह विभागाची धुरा सांभाळत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदींनी टीका केली आहे.

सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग!

माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करुन लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली असून या पोस्टमध्ये अभिनेता सलमान खान याचाही उल्लेख करण्यात आला आहे. सलमानच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अनुज थापन याच्या मृत्यूचा बदला घेण्यात आला असल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या गुरमैल बलजित सिंह (वय २३ रा. हरियाणा) याला २१ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर दुसरा हल्लेखोर धर्मराव राजेश कश्यप हा १७ वर्षाचा असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केल्याने त्याच्या वयाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेत असल्याची पोस्ट शुभम लोणकर याने केली असून त्याची पडताळणी करण्यात येत असून अन्य दोन फरारी आरोपींना पकडण्यासाठी गुजरात, हरियाणा व दिल्लीला १० पथके रवाना करण्यात आली असल्याचे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.

हत्येबाबत विविध अंदाज शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शुभम लोणकर याने फेसबुकवर पोस्ट करून हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली असल्याचे म्हटले आहे.

शुभम लोणकरची पोस्ट

ओम जय श्रीराम, जय भारत. जीवनाचं मूल जाणतो. शरीर आणि संपत्ती माझ्यासाठी धुळीसमान आहे. सलमान खान… आम्हाला हे युद्ध नको होतं, मात्र तुझ्यामुळे आमच्या भावाचं नुकसान झालं. आज ज्या प्रकारे बाबा सिद्दिकी यांच्या प्रामाणिकतेचे पूल बांधले जात आहेत, ते एकेकाळी दाऊदसह मकोका अँक्टमध्ये होते. याच्या मृत्यूचं कारण अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डिलिंगशी जोडले होते. आमचे कोणाशी काहीही शत्रूत्व नाही, मात्र जो कोणी सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल त्याला आपल्या हिशेब तयार ठेवावा लागेल. आमच्या कोणत्याही भावाचा जीव घेतला, तर आम्ही प्रतिक्रिया देऊच. आम्ही सुरुवातीचा वार कधीच केला नाही. जय श्रीराम, जय भारत..

शुभम लोणकर याला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र पोलिसांनी अकोल्यातून अवैध शस्त्रांसह अटक केली होती. तपासात शुभम लोणकर याचे कनेक्शन लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचे समोर आले होते. या चौकशीत त्याने सांगितल्यानुसार, परदेशात असलेली लॉरेन्स बिश्नोई याच्या जवळची व्यक्ती अनमोल बिश्नोईसोबत तो संपर्कात होता. दोघे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत होते. शुभम लोणकर याने आपण व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लॉरेन्स गँगशी संपर्कात असल्याचे मान्य केले होते

हत्येसाठी चार लाखाची सुपारी

हत्येप्रकरणी अटक केलेल्या धर्मराव राजेश कश्यप हा उत्तर प्रदेशातील बहराई येथील रहिवासी आहे. तर गुरुमैल बलजित सिंह हरियाणाच्या कैथल इथला रहिवासी आहे.  त्यांच्याकडून २८ जिवंत काडतुसे, ९.९ एम एमचे पिस्तूल जप्त केले आहे. दोघेजण गेल्या दोन सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याची खोली घेऊन राहत होते. त्याच्यासह पुण्यात राहत असलेला शिवकुमार वर्मा व अनेक आरोपीला बाबा सिद्दिकी यांची हत्याची सुपारी देण्यात आली होती त्यासाठी त्यांना चार लाख रुपये व हत्यार पुरविण्यात आले होते. हप्त्याच्या एक दिवसापूर्वी डिलिव्हरी बॉय कडून त्यांना हत्यार पुरविण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी बिश्नोई गँग की एसआरए प्रकरण?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00