कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरचा शाही दसरा प्रथेप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला. दसरा चौकात आज (दि.१२) सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी शमिपूजनाचा सोहळा खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आणि संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे यशराजराजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. करवीरकर हजारोंच्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित होते. (Kolhapur Dasara)
दसरा मैदानात लकडकोट उभारून त्यावर शमिपूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मैदानाच्या पूर्वेकडे स्वराज्याचा भगवा ध्वज आणि जरीपटका उभारलेला डौलात फडकत होता. हुजूर स्वाऱ्यांसह सरदार, जहांगीरदार, मानकरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी यांच्या बैठक व्यवस्थेसाठी मैदानाच्या पश्चिम व उत्तर बाजूस मंडप (शामियाना) उभारण्यात आला होता.
दसरा चौक मैदानात लकडकोट उभारून त्यावरील शमीपूजन खासदार शाहू महाराज यांच्या शुभहस्ते तर संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सीमोल्लंघनानंतर शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्यांनी नागरिकांकडून आपट्याची पाने आणि शुभेच्छा स्वीकारल्या. (Kolhapur Dasara)
हिल रायडर्सचे नगारखान्यास तोरण
दरम्यान, हिल रायडर्स ग्रुपतर्फे विजयादशमीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे जुना राजवाड्याच्या नगारखाना या मुख्य प्रवेशद्वारास तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम पार पडला. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, आपला शौर्यशाली इतिहास युवा पिढीला माहिती व्हावा, कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
हेही वाचा :
- दसऱ्यानिमित्त अंबाबाईची रथातील पूजा
- खुन्नस द्याल तर उलथवून टाकू; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- मतदानाचे शस्त्र वापरून क्रांती घडवा