कोल्हापूर; प्रतिनिधी : खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर आलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने शूटिंगमध्ये महाराष्ट्राला वैयक्तीक पदक मिळवून दिले. ऑलिंपिकमध्ये पदक पटकावून दोन महिने झाले तरी महाराष्ट्र राज्य शासनाकडून स्वप्नीलचा योग्य सन्मान अद्याप झालेला नाही, असा आरोप स्वप्निल कुसाळे यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत केला. (Swapnil Kusale)
राज्यसरकारने नुकतील ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीसांची वर्गवारी करण्यात आली. यात सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ पदक विजेत्यांसाठी अनुक्रमे पाच कोटी, तीन व दोन कोटी अशा बक्षीसांचा समावेश आहे. ही वर्गवारी कोणासाठी केली ? असा प्रश्न स्वप्निलच्या कुटंबियांनी केली. बक्षीसांची घोषणा ऑलिम्पिकपूर्वी होणे आवश्यक होती. २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक पटकावण्यासाठी स्वप्निलने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राज्यशासनाचे पाठबळ तोकडे असल्याचे कुसाळे यांनी सांगितले.(Swapnil Kusale)
भारतीय क्रिकेट संघाने नुकताच वर्ल्डकप जिंकला. या संघात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर राज्य शासनाने या खेळाडूंचा विधानभवनात सत्कार केला. तसेच संघाला तब्बल ११ कोटी रुपयांचे बक्षीसही दिले. मात्र असे भाग्य स्वप्निलच्या वाट्याला आले नाही, अशी खंत त्याच्या कुटुंबियांनी केली. राज्यसरकारने स्वप्नीलच्या पदकाबाबत चेष्ठा केल्याची भावना कुसाळे कुटूंबियांनी व्यक्त केली.
हरियाणा राज्य सरकारकडून तेथील ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी चार ते पाच कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. यात मनु भाकर, विनेश फोगाट, निरज चोप्रा यांचा समावेश आहे. हरियाणा राज्याच्या तिप्पट आर्थिक उत्पन्न महाराष्ट्राचे असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईही महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्र राज्याने इतर राज्यातील खेळाडूंनाही मदत दिली आहे. त्याच प्रमाणे इतर राज्यांकडूनही देशासाठी पदक आणणाऱ्या स्वप्निलला बक्षीस द्यायला पाहिजे होते असे कुसाळे यांनी सांगितले. (Swapnil Kusale)
इतर राज्यांप्रमाणे स्वप्निलला किमान पाच कोटींचे आर्थिक पाठबळ मिळावे. बालेवाडी क्रीडा संकुलजवळ फ्लॅट द्यावा आणि तो सराव करत असलेल्या केंद्राला त्याचे नाव द्यावे अशा मागण्या कुसाळे कुटूंबियांनी पत्रकार परिषदेत केल्या.
२०१३ मध्ये शूटिंग नेमबाजीच्या वर्ल्डकपसाठी त्यावेळच्या राज्य सरकारनं एक कोटी बक्षीस दिले होते. याचा आढावा घेवून मुख्यमंत्र्यांनी पदक विजेत्या स्वप्नीलचा उचित गौरव करावा यासाठी दोन दिवसांत कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. यापूर्वी स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून १२ ऑगस्ट रोजी मुख्यंमत्र्यांना याबाबतचे पत्र दिले आहे. शिवाय स्वत: स्वप्निलनेही मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस स्वप्नीलच्या आई व कांबळवाडी (ता. राधानगरी)च्या सरपंच अनिता कुसाळे, भाऊ रोहित कुसाळे, गौरव कुसाळे, युवराज हुबळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- ज्युनिअर हॉकी संघाच्या कर्णधारपदी अमीर अली
- हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी
- व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल जाहीर