महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ती अद्याप सुरूच आहे. सोमवारी इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली कन्या अंकिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करीत हाती तुतारी घेतली. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. (Harshvardhan Patil)
इंदापूरमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूरमधून पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली. तसेच खा. पवार यांनी, हर्षवर्धन पाटील बारामतीचे जावई आहेत. त्यांना विधानसभेत पाठवा. आम्ही त्यांना राज्याची जबाबदारी देतो, असे सांगत पाटील यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. या प्रवेशाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
यावेळी पवार यांनी आ. दत्ता भरणे यांच्यावर नाव घेता बोचरी टीका केली. पवार म्हणाले, ‘शंकरराव पाटील यांनी आमच्यासमोर आदर्श ठेवला. हर्षवर्धन पाटील यांनी तो वारसा चालविला. इंदापूरकडे माझे लक्ष होते. राज्यातील सर्वांना सोबत घेण्याच्या हेतूने आम्ही इंदापुरातून एका सहकाऱ्याला संधी दिली. जिल्हा परिषद, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्षपद दिले. आमदार, मंत्रिपदी वर्णी लावली. यामुळे कारखानदारी वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र येथे आल्यानंतर पूर्ण परिस्थिती वेगळी असल्याचे समजले. येथील राजकारणाला काही जणांनी वेगळी दिशा देण्याचे काम सुरु केले आहे. बारामतीनंतर मला येथेही ‘मलिदा गँग’ दिसली. प्रशासनातील काही अधिकारीही याबाबत मला बोलले आहेत.’ (Harshvardhan Patil)
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत खा. सुळे यांच्यासाठी काम केल्याचे सांगितले. यावेळी विजयिसंह मोहीते-पाटील, खा. सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहीते- पाटील, उत्तमराव जाणकर, खा. अमोल कोल्हे यांच्यासह मातब्बर नेत्यांची उपस्थिती होती.
रामराजेही घेणार तुतारी; पवारांकडून संकेत
खा. पवार म्हणाले, ‘या कार्यक्रमाला येण्यापूर्वी कुठूनतरी फोन आला. ‘आज ज्या कार्यक्रमासाठी निघाला आहात. अशाच कार्यक्रमासाठी १४ तारखेला यायलाच लागतंय.’ मी म्हणालो, ‘कुठे’? तर त्यांनी सांगितले फलटणला… फलटणनंतर आता १ महिन्याचे कार्यक्रम बुक झाले आहेत, असे सांगत खा. पवार यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले.
हेही वाचा :
- जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर?
- पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा शानदार विजय
- ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड