कोल्हापूर; प्रतिनिधी : सलग दोन दिवसाच्या सुट्ट्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला राज्यभरातून भाविकांचा मोठा ओघ वाढल्याने मंदिर परिसराला महापुराचे स्वरुप प्राप्त झाले होते. सायंकाळी सातपर्यंत पावणे तीन लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मतदारसंघातील भाविकांच्या जथ्थ्यांनी मंदिर परिसर फुलुन गेला होता. धारशिव, बीड, नासिक, पुणे, बारामती, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी भाविकांना अंबाबाईचे दर्शन घडवत प्रचाराची नांदी दिल्याचे चित्र पहायला मिळाले. (Navratri Ustav 2024)
शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला रविवारी पहाटे चार वाजल्यापासून मंदिर भाविकांनी फुलुन गेले. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने सकाळपासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भाविकांचे जथ्थे दिसू लागले. अंबाबाई मंदिरात जाण्यासाठी असलेलेली मुख्य दर्शन रांगेत सकाळपासून गर्दी होती. पूर्व दरवाजाजवळील दर्शन मंडप पूर्ण भरला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी संघातील दर्शन रांगेचा हॉल हाऊसफुल्ल झाल्यावर भाविकांची दर्शन रांग भवानी मंडप, नगारखाना, वसंत मेडिकल्स, गुजरी मार्गे शिवाजी चौकात पोहचली होती. तर एरव्ही मुखदर्शनाची गर्दी मंदिराच्या आवारात असते. पण आज मुखदर्शनाची रांग गरुड मंडप, तुळजाभवानी मंदिर, दक्षिण दरवाजा, विद्यापीठ हायस्कूलपासून महालक्ष्मी बँकेपर्यंत पोहचली होती. (Navratri Ustav 2024)
सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अंबाबाईच्या दर्शनाला गर्दी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मतदारांनी देवदर्शन घडवण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे पहायला मिळाले. लक्झरी बसेसची संख्या मोठी होती. खानविलकर पेट्रोल पंप शंभरफुटी रस्ता, दसरा चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मैदान, रेणुका मंदिर, हॉकी स्टेडियम, निर्माण चौक, गांधी मैदान, शाहू स्टेडियम, पेटाळा मैदान परिसरात चारचाकी वाहनांचे पार्किंग हाऊसफुल्ल झाले होते. इच्छुक उमेदवारांनी आयोजित केलेल्या दर्शन उपक्रमात महिलांची संख्या लक्षणीय होती. अंबाबाई मंदिर, जोतिबा, बाळूमामा आदमापूर अशा सहलींचे आयोजन केल्याचे पहायला मिळाले. परगांवाहून आलेल्या भाविकांना दिलेल्या बिल्ल्यावर इच्छुक उमेदवारांचे नाव, मतदारसंघ ठळकपणे पहायला मिळाले. दुपारी अर्धा तास जोरदार पावसाची सर आली असतानाही गर्दीवर परिणाम झाला नाही.
हेही वाचा :
- ‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार
- ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
- धक्कादायक! महिलेच्या पोटातून काढले दोन किलो केस!!