Home » Blog » ८० हजारांची लाच घेताना दोघांना अटक

८० हजारांची लाच घेताना दोघांना अटक

Kolhapur Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

by प्रतिनिधी
0 comments
ACB file photo

कोल्हापूर; प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे बिल मंजूर करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या  महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सचिन सिताराम कांबळे (वय ४५, रा. पंडीतराव जाधवनगर राम मंदिराजवळ पाचगाव ता. करवीर), आणि सहाय्यक सह नियंत्रण अधिकाऱ्याला उमेश बाळकृष्ण लिंगनूरकर (वय ४६, रा. सिद्धार्थ नगर) यांच्यावर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या दोघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

८० हजाराची लाच घेताना उमेश लिंगनूरकर याला सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. शनिवार पेठेतील पद्माराजे शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. या कारवाईतील तक्रारदार हा जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांना गणवेश तयार करुन देण्याचे काम करतो. तक्रारदाराला महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्हा परिषदेच्या १९ केंद्र शाळांना गणवेश पुरवठा करण्याचे काम मिळाले होते. तक्रारदाराच्या ओळखीच्या स्वयंसहाय्यता महिला समुहास गणवेश पुरवण्याचे काम मिळाले. काम पूर्ण झाल्यावर तक्रारदाराला बिल देण्याचे ठरले होते. त्यानंतर गणवेश पुरवण्याचे काम महिला समुहास देण्यात आले.

गणवेश तयार करण्याचे एकूण बिल १८ लाख ३५ हजार ८१४ रुपये इतके झाले. महिला आर्थिक विकास मंडळाने तक्रारदाराने केलेल्या पाठपुराव्यानंतर १४ लाख ३५ हजार रुपये बिल स्व्यंसहाय्यता महिला समुहाच्या बँकेच्या खात्यात जमा केले. त्यानंतर महिला समुहाने ते बिल तक्रारदाराला दिले. उर्वरित बिलाबाबत तक्रारदाराने महामंडळाच्या सहाय्यक सह नियंत्रण अधिकारी उमेश लिंगणुकर यांची भेट घेऊन विचारणा केली असता तुमचे १४ लाख ३५ हजाराचे बिल मंजूर केले आहे. शिल्लक बिल मंजूर करण्यासाठी लिंगणूकरने स्वत:ला आणि जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांना ८० हजार रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केली असता सचिन कांबळे आणि उमेश लिंगनूरकर यांनी ८० हजार रुपयांच् लाच मागितल्याने निष्पण झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शनिवार पेठेतील पद्माराजे शाळेजवळ तक्रारदारांकडून ८० हजार रुपयांची लाच घेताना उमेश लिंगनुरकर याला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील, यांचा कारवाईत सहभाग होता.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00