महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.३) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ते लवकरच हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. पाटील यांनी पवार यांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन यांनी तुतारीचा स्टेटस ठेवल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या दिवसापासून ते शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. पाटील यांनी पवार यांची पुन्हा एकदा भेट घेतली. या भेटीत त्यांना इंदापूरची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपला राम राम करून हाती तुतारी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात इंदापूरची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. येथे आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. त्यामुळे या जागेवर इच्छुक असलेले हर्षवर्धन पाटील नाराज आहेत.