Home » Blog » श्री अंबाबाईची सिंहासनारूढ रुपात सालंकृत पूजा

श्री अंबाबाईची सिंहासनारूढ रुपात सालंकृत पूजा

Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

by प्रतिनिधी
0 comments
Shardiya Navratri 2024

कोल्हापूर; प्रतिनिधी : आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वास प्रारंभ झाला. आठ वाजून ४० मिनिटांनी श्रीपूजकांचे मूळ घराणे वसंत मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना झाली. त्यानंतर तोफेची सलामी देण्यात आली. छत्रपतींच्या देव्हार घरातील श्री तुळजाभवानी मंदिरातही परंपरेनुसार घटस्थापना करून नवरात्र उत्सवात सुरुवात झाली. त्यानंतर देवीला शासकीय अभिषेक घालण्यात आला. अंबाबाई मंदिर परिसर पहाटेपासूनच भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. (Shardiya Navratri 2024)

आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला दुपारी साडेबाराच्या आरतीनंतर सिंहासनारूढ रुपात देवीची सालंकृत रुपातील पूजा बांधण्यात आली. श्री अंबाबाईची महालक्ष्मीस्वरूपात बैठी पूजा बांधली आहे. श्रीसूक्तातील श्री महालक्ष्मी ही आदिजननी आहे. तिने आपल्या तपोबळावर बिल्ववृक्ष निर्माण केला ज्याची फळे तिला प्रिय आहेत. तिने सृष्टी निर्माण केली. सर्वांना धन, धान्य, पशू, पुत्र, कन्या, भरपूर प्रमाणात पाणी, शेणखत, फळे, फुले, निर्मितीची, सृजन क्षमता असे सर्वकाही दिले. श्रीसूक्तामधील श्रीमहालक्ष्मी ही हत्ती, घोडे, गाई यांसारख्या पशूंच्या सान्निध्याने प्रफुल्लित होते. आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे पुत्रवत ऋषी सदैव तिच्या सेवेत असतात. ही पूजा श्रीपूजक संजीव मुनीश्वर, सुशील कुलकर्णी, रवि माईनकर,आशुतोष जोशी यांनी बांधली.

देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत असलेल्या तीन हजारांहून अधिक मंदिरात आणि शहरातील नऊ दुर्गांच्या मंदिरातही विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अंबाबाई मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. गरूड मंडपाच्या जागी प्रतिगरुड मंडप आकर्षक सजावटीने सजला आहे. पुण्याच्या हिडदुगी यांच्या वतीने अंबाबाई मंदिराला चार ट्रक आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. झेंडू फुलांच्या माळा, देशी-विदेशी जातींचा फुलोत्सव येथे रंगला आहे. मंदिराची शिखरे, भवानी मंडप, प्रवेशद्वाराच्या कमानी, दगडी भिंती यावरील आकर्षक रंगसंगतीने मंदिर अधिकच खुलले आहे.  (Shardiya Navratri 2024)

भाविकांना अंबाबाईचे थेट दर्शन व्हावे यासाठी मोठा एलईडी स्क्रीन बसविण्यात आला आहे. परिसरावर सीसीटीव्हींचा वॉच आहे. भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. महालक्ष्मी धर्मशाळेच्या वतीने सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अन्नछत्र सेवा देण्यात येणार आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00